सासुरास चालली लाडकी शकुंतला…

सौ.श्रावणी माईणकर

ज्यांच्या साहित्याचा अभ्यास केल्याशिवाय संस्कृत साहित्याचा अभ्यास पूर्ण होऊच शकत नाही असे  महाकवी कालिदास ! कविकुलगुरू,कविताकामिनीचा विलास अशा शब्दांत ज्यांचा गौरव केला जातो ते महाकवी कालिदास !भारतीय रसिकांबरोबरच परदेशी पंडितही ज्यांची मुक्तकंठाने स्तुती करतात असे महाकवी कालिदास ! इंडियन शेक्सपियर असा ज्यांचा गौरव केला आहे ते महाकवी कालिदास !

‘काव्येषु नाटकं रम्यं, तत्र रम्या शकुंतला’ …या शब्दांत ज्या नाटकाचा गौरव केला जातो ते नाटक म्हणजे अभिज्ञानशाकुंतलम् ! महाकविकालिदासाचे  शाकुंतल जेव्हा प्रथम हातात पडले तेव्हा खरं तर महाकवीआणि शाकुंतल नाटकाची अशा प्रकारे  महती अगोदरच कानावर पडली होती.

तो राजा दुष्यंत. ती साक्षात मेनकेची कन्या असणारी, अद्वितीय सौंदर्यांचं वरदान लाभलेली, कण्वमुनींच्या आश्रमात लहानाची मोठी झालेली आणि जणू निसर्गकन्याच म्हणावी अशी शकुंतला, अनसूया आणि प्रियंवदा ह्या तिच्या दोन जिवलग सख्या, शकुंतलेला पाहताक्षणीच तिच्या सौंदर्यांवर लुब्ध होऊन तिच्या प्रेमात पडणारा दुष्यंत, शकुंतलेनेही दुष्यंताच्या प्रेमाचा स्वीकार करून त्याच्याशी केलेला गांधर्वविवाह….ह्या घटनाक्रमांमधून शाकुंतलाची कथा पुढे सरकत जाते.

मग येतो तो शाकुंतलमधील चौथा अंक—तत्रापि चतुर्थाोSङ्क: म्हणून प्रसिद्ध असणारा. हा अंक प्रसिद्ध आहे तो शकुंतलेच्या विवाहानंतर तिच्या पतिगृही तिच्या पित्याने केलेल्या पाठवणीसाठी, आणि सासरी जाणार्या आपल्या लाडक्या लेकीला म्हणजेच शकुंतलेला तिच्या पित्याने म्हणजेच कण्वमुनींनी केलेल्या उपदेशासाठी!

खरं तर लाडक्या लेकीची पाठवणी करणे हा प्रसंगच मुळात इतका ह्रद्य की कोणत्याही कवीला तो प्रसंग आपल्या शब्दांमधून चितारावासा न वाटला तर नवलच. आजवर अनेक चित्रपटांमधून तो चित्रित झाला आहे, अनेक गीतांमधून गायला गेला आहे. पण तरीही त्यातील सहवेदना काही तसूभरही कमी होत नाही. अगदी कोणा परक्याच्या बाबतीत हा प्रसंग घडत असेल तरी आपल्या घशात क्षणभर आवंढा हा येतोच. आणि म्हणून रेल्वेफलाटावरच्या कोलाहलात एक मुलगी सासरी जातानाच प्रसंग बघून कवी पी. सावळाराम सहज लिहून जातात- गंगा जमुना डोळ्यात उभ्या का…जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा. असा मराठी माणूस विरळाच असेल जो शांताबाईंचे- दाटून कंठ येतो ..हे गीत डोळ्यात पाणी न आणता शेवटपर्यंत ऐकू शकत असेल. याच गीतात शेवटच्या कडव्यात शांताबाई लिहितात-

“धन आत्मजा दुजाचे , ज्याचे तयांस देणे. परक्यापरि आता मी येथे फिरून येणे” शांताबाईंच्या गाण्यातील या शब्दांचा  उगम मला इथे कवी कालिदासांच्या शब्दांत सापडला- ते म्हणतात- अर्थो हि कन्या परकीय एव , ताम् अद्य संप्रेष्य परिग्रहतु:। जातो ममायं विशद: प्रकामं पत्यर्पितन्यास इवान्तरात्मा॥

वडील आणि मुलगी यांच्या नात्याला स्थळाचे, काळाचे बंधन नाहीच. ते चिरंतन आहे. काळाच्या ओघात ती भावना  बदलणारी नाहीच मुळी आणि म्हणूनच आपल्या लाडक्या लेकीला तिच्या पतीच्या स्वाधीन करताना एका पित्याला होणार्या वेदनांचे चित्रण करून कालिदासांनी सामान्य रसिकाच्या ह्रदयालाच जणू हात घातला आहे. 

प्रवासाहून परत आलेल्या कण्वमुनींना आपल्या लाडक्या लेकीचा शकुंतलेचा विवाह दुष्यंताशी झाला असून ती गरोदर असल्याची वार्ता दैवीवाणी होऊन समजते.  तेव्हा , आपल्या लाडक्या लेकीसाठी दुष्यंत हाच योग्य वर आहे असे वाटून जणू काही आपली विद्या सत्पात्री शिष्याला अर्पण करावी त्याप्रमाणे शकुंतलेची आता पतिगृही पाठवणी करण्याची वेळ आली आहे हे ते समजून चुकतात. खरं तर, ज्या क्षणी मुलीचा जन्म होतो त्याक्षणापासूनच हा प्रसंग आपल्यावर कधीतरी येणार आहे या विचाराने कोणत्याही मुलीचा बाप मनातून हळवा होत असतोच.

शकुंतला आता सासरी जाणार ही गोष्ट लवकरच सार्या तपोवनाला समजते. एकीकडे शकुंतला आता सुखी होणार हा आनंद तर दुसरीकडे तिच्या सहवासाला आता आपण पारखे होणार हे दु:ख! संपूर्ण तपोवनाचीच अशी द्विधा अवस्था होते. शकुंतलेच्या मैत्रिणी तिला सासरी पाठवण्याची तयारी सुरू करतात. पाने, फुले, कळ्या यांच्या अलंकारांनी तिला सजवतात. हे करीत असताना मात्र आपली मैत्रीण आता आपल्याला दुरावणार या कल्पनेने सतत पाणावणारे डोळे पुसत राहतात! निसर्गाच्याच अंगाखांद्यावर वाढलेली शकुंतला म्हणजे खरं तर निसर्गकन्याच! तिची पाठवणी करताना निसर्गही सरसावतोच. वनदेवीने तिच्यासाठी फुलांचे सुंदर सुंदर दागिने दिले. शकुंतलेला पतिगृही जाताना बघून संपूर्ण तपोवनावरच विषादाची छाया पसरली. हरिणांनी दर्भाचे घास टाकून दिले, मोरांनी नृत्य करण्याचे थांबविले, ज्या मृगशावकाला शकुंतलेने लहानाचे मोठे केले तो शकुंतलेची वाट सोडेनासा झाला. खरं तर, शकुंतलेची पावलंही अडखळतच होती. गरोदर असलेल्या हरिणीमध्ये तिचेही मन गुंतलेलेच होते. डोळ्यांमधून सतत वाहत असणार्या पाण्यामुळे समोरचा मार्गही अंधुक झाला होता.

कण्वमुनींच्या मनाची होणारी घालमेल जाणून घेण्यासाठी मात्र पितृह्रदयच हवे. कण्वमुनी खरं तर अरण्यवासी. संसाराचा त्याग केलेले, ब्रह्मचर्याचा स्वीकार केलेले तपस्वी. पण मनाने मात्र कोमल. दुर्दैवाने पोरक्या झालेल्या शकुंतलेचे पालनपोषण त्यांनीच केले असते. म्हणूनच शकुंतलेची पाठवणी करण्याचा प्रसंग येताच एका गृहस्थाश्रमी पित्याप्रमाणे त्यांचाही कंठ दाटून येतो. पण तरीही, ती आता सुखी होणार आहे यातच समाधान शोधून एका कर्तव्यतत्त्पर, धीरगंभीर पित्याच्या भूमिकेत शिरून अश्रूंना आवर घालतात. शकुंतलेने चांगला संसार करावा, उत्तम गृहिणी व्हावे, सासरी सर्वांची मने जिंकून घ्यावीत आणि केवळ विसाव्याच्या क्षणांपुरताच माहेरचा विचार करावा असा एका सर्वसामान्य पित्याप्रमाणे शकुंतलेला उपदेश करतात.

तर असा हा पाठवणीचा प्रसंग. वत्सल रसाने चिंब भिजलेला. याला स्थळ, काळाचे बंधन नाहीच. आपल्या लाडक्या लेकीला निरोप देणार्या पित्याच्या भावना कोणत्याही काळात बदलणार नाहीत. अगदी आजच्या काळात Once a daughter is always a daughter असे कायदा सांगत असला तरीसुद्धा नाही. आणि म्हणूनच सर्वसामान्य मनुष्याच्या भावनांना हात घालणारा असा  … तत्रापि च चतुर्थोSङ्क:।

पाचव्या शतकातल्या या  महाकवीच्या शब्दांची भुरळ विसाव्या शतकातील महाकवीला पडली आणि याच प्रसंगाचे चित्रण करणारे एक अजरामर गीत जन्माला आले-

सासुरास चालली लाडकी शकुंतला

चाललो तिच्यासवे , तिच्यात जीव गुंतला॥

ढाळतात आसवे मोर-हरीण शावके

मूक आज जाहले सर्व पक्षी बोलके

यापुढे सखी नुरे, माधवी लते तुला !

पान  पान गाळुनी दु:ख दाविती तरू

गर्भिणी मृगी कुणी वाट ये तिची धरू

दंती धरून पल्लवा आडवी खुळी तिला !

भावमुक्त मी मुनी , मला न शोक आवरे

जन्मदांस सोसवे दु:ख हे कसे बरे?

कन्यका न कनककोष मी धन्यास अर्पिला!

सौ.श्रावणी माईणकर

shravanimainkar@gmail.com

सध्या संस्कृतच्या क्षेत्रात अध्यापनाचे काम करीत असून www.vruttavallari.com या संकेतस्थळाशी संबंधित सर्व कामकाज सांभाळत आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*