संवादकीय…

आज  11 जुलै  2021- आषाढ शुद्ध प्रतिपदा- अर्थात महाकवी कालिदास दिन . आजच्या दिवशी वृत्तवल्लरीच्या Online महाकविकालिदास विशेषांकाचे प्रकाशन डॉ. गौरी माहुलीकर यांच्या हस्ते होत आहे. आजचा दिवस आमच्यासाठी कसा आहे? ज्ञानेश्वरमाऊलींच्या शब्दात सांगायचे झाले तर…

“अजि सोनियाचा दिनु, वर्षे अमृताचा घनु” असा आहे.

मागच्या वर्षीच्या पावसाळ्यात माझ्याकडे वृत्तवल्लरीची जबाबदारी आली. संपूर्णपणे संस्कृत भाषेला वाहिलेले असे हे संकेतस्थळ. माझ्या हातात येईपर्यंत डॉ. अतुल ठाकुर यांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नांमुळे या संकेतस्थळाला एक विशेष दर्जा प्राप्त झाला होताच. संस्कृत मधील अनेक मान्यवरांनी लिहिलेल्या लेखांमुळे हे संकेतस्थळ सुशोभित होत होते.

संस्कृतभाषेला वाहिलेले हे संकेतस्थळ आणि म्हणूनच महाकविकालिदास दिनाच्या दिवशी इथे तर उत्सव साजरा व्हायला हवा हा विचार मनात पक्का झाला होता.  जर वृत्तवल्लरीचा Online कालिदासविशेषांक काढला तर जगभरातील सर्वच कालिदास प्रेमींना,संस्कृत प्रेमींना ह्या व्यासपीठावर एकत्र आणता येईल ह्या विचाराने त्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. यक्षाला त्याच्या पत्नीला निरोप देण्यासाठी मेघ प्राप्त झाला. पण माझ्याकडे अगदी मेघ नाही तर WhatsApp सारखा दूत तर होताच की! त्याने त्याचे काम यथायोग्य केले आणि लवकरच येऊ घातलेल्या महाकविकालिदास विशेषांकाची वार्ता आणि आम्ही केलेले आवाहन सर्वदूर पसरलेल्या संस्कृत प्रेमीजनांपर्यंत अतिशय वेगाने  जाऊन पोहोचलेसुद्धा! आम्ही केलेल्या या  आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत अनेकांनी महाकवी कालिदासांवरचे वैविध्यपूर्ण,अभ्यासपूर्ण लेख, काव्य, चित्र, संगीतमय श्लोक आमच्यापर्यंत शीघ्रगतीने पोचवले.   या सर्वच लेखकांचे कवींचे, चित्रकारांचे , गायकांचे  वृत्तवल्लरी परिवारातर्फे मनापासून आभार  आणि वृत्तवल्लरी परिवारात मनापासून स्वागत !

डॉ. गौरी माहुलीकर, डॉ. आसावरी बापट ह्या आमच्या गुरू ! महाकविकालिदास विशेषांकाची कल्पना त्यांच्या कानावर घातल्यावर केवळ कौतुकाने पाठ न थोपटता त्यांनी त्यांचे अभ्यासपूर्ण लिखाण देऊन आमच्या कामात प्रत्यक्ष सहभागही दिला. त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार !

डॉ. गौरी माहुलीकर आम्हाला देवी सरस्वतीप्रमाणेच वंदनीय आणि पूजनीय आहेत. “वृत्तवल्लरीच्या पहिल्या Online महाकविकालिदास विशेषांकाचे प्रकाशन आपल्या हस्ते व्हावे,अशी आमची इच्छा आहे” असे सांगताच  क्षणाचाही विलंब न करता अतिशय आनंदाने त्यांनी या विद्यार्थीहट्टाचा स्वीकार केला.

गीर्वाणवाणी शिकण्याकडे तरूणांचा कल वाढत आहे. कालिदास दिनाचे सर्वच माध्यमांनी केलेले उत्स्फूर्त स्वागत,त्या निमित्ताने होणारे वैविध्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन आणि त्याला मिळणारा उत्तम प्रतिसाद हे चित्र सर्वच संस्कृतप्रेमींसाठीअत्यंत आशादायक आहे. वृत्तवल्लरीच्या माध्यमातून आम्ही जे काम करीत आहोत त्याला या सकारात्मक वातावरणाने निश्चितच बळ मिळाले आहे.

यासंबंधी वाचकांकडून येणार्या सूचनांचे, नवनवीन कल्पनांचे स्वागतच आहे.

लोभ आहेच, तो वृद्धिंगत व्हावा.

श्रावणी मंदार माईणकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*