इन्द्र

इन्द्र

डॉ. विवेक भट

यो जात एव प्रथमो मनस्वान् देवो देवान् क्रतुना पर्यभूषत्  I

यस्य शुष्माद्रोदसी अभ्यसेतां नृम्णस्य मह्ना स जनास इन्द्र: II (ऋग्वेद 2.12.1)

लोकहो, देवांमधे प्रधानभूत आणि ज्ञानी अशा ज्या देवाने जन्म होताच आपल्या कर्तृत्वाने अन्य देवांना मागे सारले, ज्याच्या चण्डतेमुळे, पौरुषबलाच्या महानतेमुळे द्यावापृथिवीचा भीतीने थरकांप झाला, तो इन्द्र होय.

इन्द्र हा ऋग्वेदातील सर्वात महत्त्वाचा देव, देवांचा राजा म्हणून देवराज, देवेन्द्र, किंवा सुरेन्द्र – सर्व सूक्तकर्त्यांचा आवडता आणि सर्वांच्या स्तुतीचा विषय. महान् योद्धा, आणि स्वर्गाचा शास्ता म्हणून स्वर्गपति. मेरु पर्वतावर त्याचे राज्य. अमरावती ही त्याची राजधानी. ऋग्वेदाच्या एकंदर 1028 सूक्तांपैकी 250 सूक्तांत इन्द्राचे स्तवन केले गेले आहे. म्हणजे ऋग्वेदाचा जवळजवळ एक चतुर्थांश भाग एकटा इन्द्र व्यापून राहिला आहे. दुसर्‍या मण्डलातील इन्द्रसूक्त (2.12) अतिशय प्रसिद्ध आहे. त्यात पंधरा श्लोक असून ‘स जनास इन्द्र:’ असे त्याचे पालुपद आहे. ‘जनास:’ अर्थात् ‘लोकहो’ असे म्हणून गृत्समद ऋषींनी लोकांना उद्देशून इन्द्राची महत्त्वाची कृत्ये वर्णन करून सांगितली आणि अशी महत्कृत्ये ज्याने केली तो इन्द्र अशी त्याची ओळख करून दिली. बलाची देवता (बलपुत्र), वादळी देवता, दुष्काळ आणि अंधकाराचा नाश करणारा, जलांना (किंवा ग़ायींना) मुक्त करणारा, वृत्रहन्ता या दृष्टीने इन्द्राचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे.

इन्द्राची असंख्य नांवे त्याच्या पराक्रमाची आणि कर्तृत्वाची साक्ष देतात. ‘शक्र’ म्हणजेच महाशक्तिशाली. इन्द्राच्या महाशक्तिशाली शरीराचे वर्णन मानवी रूपात केले असले तरी अनेक दैवी शक्ति त्याला जोडल्या आहेत. त्याच्या सामर्थ्याची बरोबरी करेल असा मानवांत आणि देवांतही कोणी नाही. त्याच्या शरीराचा आकार अतिप्रचण्ड म्हणजे दहा पृथ्वी व्यापून उरेल असा वर्णिला आहे. पिंगट वर्ण, तशीच दाढी, वज्र धारण करणारे प्रचण्ड बाहू (म्हणून वज्रबाहु, वज्रपाणि, किंवा वज्रिन्) असे त्याचे स्वरूप सांगितले आहे. त्याला सोमपानाची सर्वाधिक आवड असल्याने तो ‘सोमप्रिय’ आहे, ‘सोमपा’ आहे, आणि त्यामुळे ‘महोदर’ आहे. सोमपानानंतर लवथवणार्‍या त्याच्या विक्राळ जबड्याचेही वर्णन आहे. वृत्रवधापूर्वी तो तीन तलाव भरून सोम प्याला (ऋग्वेद 5.29.7) आणि मोठ्या आवेशाने वृत्रावर चालून गेला असा उल्लेख आहे. ‘शम्बर राक्षसाला मारून त्याची शंभर पुरें (किल्ले) उद्ध्वस्त करण्यापूर्वी मी सोमपानाचा आनंद घेतला’ (ऋ 4.26) असे इन्द्र स्वत:च म्हणतो. सोमपानाच्या मदांत इन्द्राने स्वत:च्या शक्तीची जी प्रौढी सांगितली त्याने एक संपूर्ण सूक्त व्यापले आहे. इन्द्र म्हणतो, “हन्ताहम् पृथिवीम् इमां निदधानि इह वा इह वा I कुवित् सोमस्यापाम् II” (ऋ. 10.119.9) शंभर दिवस आणि शंभर रात्री चालणारा सोमयाग करून तो बलवान झाला आणि शंभर प्रकारच्या शक्ति त्याला प्राप्त झाल्या म्हणून तो ‘शतक्रतु’ आहे. वसूंचा स्वामी म्हणून तो ‘वासव’ आहे. पिंगट रंगाच्या दोन घोड्यांनी ओढलेल्या सोनेरी रथांत बसून तो लढतो म्हणून तो ‘रथेस्थ’ आहे. त्याचे ते घोडे आणि रथ तसेच त्याचे विशिष्ट अस्त्र जे वज्र (म्हणजे कडाडणार्‍या वीजेचा लोळ) ते त्वष्ट्याने खास त्याच्यासाठी निर्मिले आहेत. पांढरा शुभ्र, प्रचण्ड अशा आकाराचा हत्ती ऐरावत किंवा उच्चैश्रवा हा अश्व हाही त्याचे वाहन असल्याचे कधी म्हटले जाते. वज्राव्यतिरिक्त कधी धनुष्यबाण तर कधी अंकुशही त्याच्या हातांत असल्याचे म्हटले आहे. इन्द्राला पूर्व दिशेचा रक्षक (दिक्पाल) मानले आहे.

अदिती ही इन्द्राची माता. अदितीपासून झालेला इंद्राचा जन्मही मोठा विलक्षण. (ऋ. 4.18). असे सांग़तात की तो आईची कूस फोडून बाहेर आला. याचा अर्थ वीजेने ढगाची कूस फोडून बाहेर येणे असा असावा किंवा दैवी जन्माचे ते एक प्रतीक असावे. खुद्द इन्द्रजन्मावर दोन सूक्ते आहेत. कधी त्वष्टा तर कधी द्यौस् हा त्याचा पिता असल्याचे म्हटले आहे. अग्नि हा इन्द्राचा जुळा भाऊ, आणि पूषनही भाऊच. इन्द्राची पत्नी शची, किंवा इन्द्राणी, किंवा पौलोमी हिचाही उल्लेख येतो. तसा इतर अनेक देवतांच्याबरोबर इन्द्राचा जवळचा संबंध आहे. मरुत् हे (बहुवचनी प्रयोग) त्याच्याबरोबर युद्धात नेहमी मदतीला असतात, म्हणून तो ‘मरुत्वत्’ आहे. अग्नि, वरुण किंवा वात यांच्याबरोबर तसेच क्वचित् प्रसंगी सोम, बृहस्पति, पूषन्, विष्णु यांच्याबरोबर संयुक्तपणे इन्द्राचे स्तवन केले गेले आहे.

इन्द्राचा मुख्य पराक्रम जो वृत्र राक्षसाचे हनन तो थोड्याफार फरकाने पण पुन्हा पुन्हा वर्णन केला गेला आहे. इन्द्राने सोमप्राशनानंतर आवेशाने आणि मरुतांच्या सोबतीने दुष्काळाचे प्रतीक असणार्‍या वृत्र राक्षसावर हला चढविला. अनेक वर्षे चाललेल्या त्या घनघोर युद्धाने स्वर्ग आणि पृथ्वीचा थरकांप झाला. अखेरीस जलराशींना वेढून बसलेल्या वृत्राचा इन्द्राने आपल्या वज्राने वध केला. वृत्राचा वध केला म्ह्णून तो ‘वृत्रहन्’ तर पाण्यात विजय मिळविला म्हणून तो ‘अप्सुजित्’ झाला. पर्वताला भेदून, जखडून ठेवलेल्या गायींना मोकळे करावे त्याप्रमाणे ढगांना भेदून जलप्रपातांना त्याने मुक्त केले आणि जगाला दुष्काळापासून वाचविले. म्ह्णून इन्द्राला वृष्टीची देवताही मानले आहे. इन्द्राच्या या प्रमुख पराक्रमाचा अर्थ विविध प्रकारांनी लावला गेला आहे. एक महाप्रचंड सर्प (अहि) पर्वताला विळखा घालून बसला होता आणि जलप्रपातांना त्याने अडवून धरले होते, त्याचा वध करून इन्द्राने पाण्याच्या प्रवाहांना मुक्त केले असा एक अर्थ आहे. कोणी तर असेही म्हटले आहे की वृत्र हे उत्तर ध्रुव प्रदेशाजवळील हिमयुगातील बर्फाचे प्रतीक आहे कारण त्यामुळे पाणी अडकून राहिले होते. अशा वेळी सूर्याचे प्रतीक असणार्‍या इन्द्राने तो बर्फ वितळवून पाण्याला वाहते केले.

अंतरिक्षातील असुरांचे जे ‘आयसी’ म्हणजे पुरें अर्थात् किल्ले (त्यांचे प्रतीक ढग) ते उद्ध्वस्त करून इन्द्र ‘पुरभिद्’ किंवा ‘पुरन्दर’ झाला. वृत्रवध करून जलांना मुक्त करतांना, सूर्य सर्वांना दिसेल अशा रीतीने इन्द्राने त्याला अंतरिक्षात स्थान दिले आणि अशा तर्‍हेने अंधकारावर विजय मिळवून सूर्य, उषस्, प्रकाश यांना आपल्या बाजूने करून घेतले. अन्य एका कथेद्वारे, इन्द्राने सर्पाला (अर्थात् अहीला, म्हणजेच वृत्राला) अंतरिक्षातून उडवून लावले, त्यामूळे सूर्य अधिक प्रखर तेजाने दीप्तिमान झाला. अंधकारातून इन्द्राने सूर्यासाठी किवा उषस् साठी मार्ग करून दिला असाही अर्थ घेता येतो. त्यानुसार गायींना मुक्त केले याचा संदर्भ पहाटेच्या सूर्यकिरणांशी जोडला जातो. लोकमान्य टिळकांच्या मतें जलांना मुक्त करण्याचा इन्द्राचा हा पराक्रम केवळ ढगांतल्या पाण्याशी नव्हे तर वैष्विक जलाशी, ज्या बाष्पाने हे सर्व जग वेढले आहे त्याच्याशी संबंधित आहे. वृत्राव्यतिरिक्त शम्बर, रौहिण, उरण विश्वरूप, अर्बुद, बल, व्यंश (ह्या राक्षसाला दुष्काळाचे प्रतीक मानले आहे), शुष्ण, नमुचि इत्यादि राक्षसांचाही इन्द्राने वध केला. पर्वतातील गुहांमध्ये लपून बसलेल्या शम्बराला शोधून त्याचा वध करण्यासाठी तर इन्द्र चाळीस शरद ऋतु (किंवा शरदाचे चाळीस दिवस) तिथे राहिला.  

इन्द्राची इतरही अनेक वीरकर्मे आहेत. पूर्वी पर्वतांना पंख होते त्यामुळे ते इतस्तत: उडत असत आणि पृथ्वी अस्थिर होत असे. इन्द्राने पर्वतांचे पंख कापून त्यांना एका जागी बसवले आणि पृथ्वीला स्थिर केले. तसेच त्याने द्युलोकालाही स्थिर केले आणि अंतरिक्षाची निर्मिति केली. दोन दगडांच्या घर्षणाने उत्पन्न होणारा अग्नि आणि ढगांच्यामध्ये उत्पन्न होणारा वैद्युत् अग्नि  त्यांचा जनकही इन्द्रच आहे.

अशा या पराक्रमी इन्द्राला युयुत्सु आर्यांनी युद्धाची देवता बनविले, वेळोवेळी आपल्या शत्रूंच्या निर्दालनासाठी त्याचे स्तवन केले, त्याला आवाहन केले. आपल्या या भक्तांच्या प्रीतीला प्रतिसाद देऊन इन्द्रानेही स्वत: अवतीर्ण होऊन भक्तांना संकटमुक्त केले. कुत्साच्या वतीने शुष्णाचा वध केला, किंवा दिवोदासाच्या वतीने शम्बर, करंज, पर्णय इत्यादींचा वध केला, पन्नास हजार दस्यूंचा संहार केला म्हणून तो दस्युहन्ता झाला. दाशराज्ञ युद्धांत इन्द्राने राजा सुदासाला साहाय्य केले. भक्तसखा आणि भक्तांचा रक्षणकर्ता म्हणून इन्द्राचे महत्त्व फार मोठे आहे. विपुल संपत्तीचा धनी आणि मुक्तहस्ताने मित्रांना आणि भक्तांना देणारा म्हणून इन्द्राला ‘मघवन्’ (ऐश्वर्यवान्) म्हटले आहे.

काही पाश्चिमात्य विद्वान इन्द्र या शब्दाची व्युत्पत्ति ‘इन्दु’ म्हणजे पाण्याचा थेंब (बिन्दु) यावरून करतात, तर काही भारतीय विद्वानांच्या मतें या ठिकाणी इन्दु म्हणजे पाण्याचा किंवा इन्द्राला प्रिय अशा सोमाचाही थेंब नव्हे तर तो शब्द पुष्टता, समृद्धि अशा अर्थी आहे. काही जण या शब्दाची व्युत्पत्ति ‘इन्ध्’ (प्रज्वलित करणे) या धातूवरून तर इतर काही जण ‘इन’ (सामर्थ्यवान्) या शब्दावरून करतात.  

एकंदरीत ऋग्वेदांतील इन्द्राची प्रतिमा ही सामर्थ्याशी, युयुत्सु स्वभावाशी, मोठ्या उदार मनाशी आणि दातृत्वाशी जोडलेली आहे. मात्र काही ठिकाणी त्याला कौर्याची आणि अनैतिक संबंधांची जोडही आहे. आपले स्वर्गाचे राज्य आणि आपले आसन याबद्दल तो अतिशय जागरूक असे आणि ते डळमळीत होत आहे असे त्याला कधी वाटले तर ते संभाळण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची त्याची तयारी असे. एखाद्या राजाच्या मोठ्या पराक्रमामुळे इन्द्राला आपले इन्द्रपद धोक्यात आल्यासारखे वाटे. तसेच एखाद्या ऋषीची तपस्याही त्याला अस्वस्थ करी आणि मग त्या तपस्येचा भंग करण्यासाठी तो आपल्या राजसभेतील एखाद्या अप्सरेला पाठवून देई.  

पुरातन युरोभारतीय संस्कृतीशी वरुणाचा संबंध:

ग्रीक मिथककथांमधील ज्यूज, तसेच रोमन मिथककथांमधील जूपिटर यांच्याशी इन्द्राचे आणि त्याच्या सामर्थ्याचे वर्णन मिळतेजुळते आहे. त्यावरून पूर्व-युरोभारतीय मिथकांचे (proto Indo European mythology) मूळ एकच असावे असा अंदाज बांधता येईल. अति प्राचीन आणि अगदी पूर्व-युरोभारतीय भाषांचीही जी भाषाभगिनी त्या ‘हिटाईटी’ भाषेतसुद्धा ‘इन्र’ हा शब्द शक्तिशाली अशा अर्थाने आढळला आहे. प्रत्यक्ष ‘इन्द्र’ हे नांव मात्र निश्चितपणे बर्‍याच पुढील म्हणजे युरोभारतीय किंवा इराण-भारतीय काळांतील आहे. अवेस्तामध्ये इन्द्र हे नांव राक्षसाचे म्हणून येते. त्याउलट विजयदेवतेचे नांव म्हणून ‘वेरेथ्रघ्न’ (वृत्रघ्न) असा उल्लेख आढळतो.

वेदोत्तर काळात इन्द्र

वेदोत्तर काळात मात्र इन्द्राचे महत्त्व हळु हळु कमी होत गेले आणि ब्रह्मा, विष्णु, महेश या त्रिमूर्तीला अधिकाधिक महत्त्व येत गेले.

ते पाहतां मला असे म्हणावेसे वाटते की

देवो य: कालवशात् अगात् उत्तमपदम् I

स जनास इन्द्र: II

डॉ. विवेक भट

(Tel. 9870193649)

bhatvivekm@yahoo.co.in

संदर्भसूचि

ऋग्वेदातील इन्द्र सूक्त 2.12

https://en.wikipedia.org/wiki/Rigvedic_deities
https://theveda.org.in/rigveda/10/119
https://hi.wikipedia.org/wiki/%E0%A4%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0
https://www.sanskritdictionary.com/indra/722/40
https://en.wikipedia.org/wiki/Indra#:~:text=He%20is%20the%20king%20of,and%20the%20Devas%20(gods).&text=Indra%20is%20the%20most%20referred,obstructs%20human%20prosperity%20and%20happiness

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*