संस्कृत सुभाषिते आणि व्यसनमुक्ति

व्यसन म्हणजे व्यक्तीला लागलेली अशी एखादी सवय जिच्यामुळे संबंधित व्यक्तीचे मोठ्या प्रमाणावर शारीरिक, मानसिक व सामाजिक नुकसान होत असूनही आपल्या त्या सवयीत बदल करणे त्या व्यक्तीला शक्य होत नाही.

चन्दनम् शीतलम् लोके चंदनादपि चंद्रमा: |
चन्द्रचन्दनयोर्मध्ये शीतला साधुसंगति: ||

चंदन हे जगतात शीतल म्हणून ओळखलं गेलं आहे. त्याहून शीतल असतो तो चंद्राचा प्रकाश. पण सज्जनांची संगती ही या दोन्हीहून शीतल असते असे या सुभाषितकाराला म्हणायचे आहे. अनेकांच्या विद्वत्तेचा लोकांना ताप होत असतो. पण ज्ञानदेवमहाराजांनी अशावेळी “मार्तंड जे तापहीन” अशी सज्जनांसाठी दिलेली उपमा आठवते. सूर्य आहे पण तापहीन आहे. शेवटी छाया आणि शीतलता ही प्रत्येकालाच हवीहवीशी वाटते आणि ती सज्जनांकडेच मिळते. त्यामुळे सत्संगतीचे महत्त्व अपार आहे.

व्यसनाच्या संदर्भात या सुभाषिताकडे पाहायचं झाल्यास आपल्या असं लक्षात येतं की व्यसनाच्या दरम्यान माणूस दुर्जनांच्या म्हणजेच तापदायक लोकांच्या संगतीत असतो. व्यसन सोडायचं झाल्यास त्याला या दुर्जनांचा सहवासही सोडावाच लागतो. अन्यथा ते माणसाला पुन्हा व्यसनाकडे खेचू लागतात. व्यसनमुक्तीसाठीदेखिल सत्संगती ही अत्यावश्यक आहे हेच आपण या सुभाषितातून घेऊयात.

गते शोको न कर्तव्यो भविष्यं न चिन्तयेत्

व्यसनासारख्या आजारात प्रामुख्याने समुपदेशनाचा वापर केला जात असला तरी इतर गंभीर आजारांमध्येही औषधोपचारांसोबत समुपदेशन हे अतिशय परिणामकारक ठरत असते. काही विशिष्ट विचार हे समुपदेशनात सांगितले जातात. त्यांचा वारंवार वापर केला जातो. उदाहरण घ्यायचे झाल्यास व्यसनमुक्तीमध्ये “वन डे अ‍ॅट अ टाईम” हा विचार रुग्णाला दिला जातो. त्यामागचा उद्देश हा की त्याने फार पुढचा विचार आतापासून करून स्वतःचा ताण वाढवू नये. व्यसनमुक्तीसाठी छोट्या पायरीने सुरुवात करावी. आजच्या दिवसाचे नियोजन करावे. मी आज व्यसन करणार नाही असा विचार करावा. उद्याचे उद्या पाहु. उद्याचा विचार आजच करून डोक्याचा ताप वाढवू नये. व्यसनमुक्तीसाठी अशा तर्‍हेने वर्तमानकाळात राहणे अतिशय आवश्यक असते. अन्यथा रुग्णाला भविष्याचा विचार करून अस्वथता येते. आणि मानसिक अस्वास्थ्याचा परिणाम पुन्हा व्यसनाकडे वळण्यात होऊ शकतो.

आता याच पार्श्वभूमिवर पुढील संस्कृत सुभाषित पाहता असे लक्षात येते की जवळपास हाच विचार त्यात सांगितला आहे.

गते शोको न कर्तव्यो भविष्यं न चिन्तयेत् |
वर्तमानेन कालेन वर्तन्ते हि विचक्षणा: ||

होऊन गेलेल्या गोष्टीचा शोक करु नये. भविष्याची चिंता करु नये. चतुर, हुशार माणसे वर्तमानकाळात जगतात.

खरं तर “वन डे अ‍ॅट अ टाईम” पेक्षा कितीतरी जास्त अर्थ या सुभाषितात ठासून भरला आहे. व्यसनात किंवा नैराश्यासारख्या मानसिक आजारांमध्ये माणसे गतकाळात घडलेल्या गोष्टींचा विचार करीत राहतात. नैराश्यात हे बरेचदा आढळतं. घडून गेलेल्या गोष्टींबद्दल विचार करीत राहणे हे उदासीनतेला आमंत्रण देण्यासारखे असते. अनेकदा व्यसन आणि नैराश्य हे हातात हात घालून चालताना दिसतात. उदासीनता येते म्हणून पुन्हा व्यसनाकडे वळणे. गतकाळी केलेल्या गोष्टींचा विचार मनात येतो म्हणून त्यापासून पळण्यासाठी व्यसनाकडे वळणे आणि व्यसनाकडे वळल्यावर व्यसनाचा अपरिहार्य परिणाम म्हणून उदासीनता येणे असे विषारी वर्तुळ अनेकांच्या बाबतीत आढळते. असे असताना आता आपल्या हातात काय आहे, त्या उपलब्ध गोष्टींचा आपण कशा तर्‍हेने वापर करु शकतो याचा विचार होणे महत्त्वाचे असते. भूतकाळापेक्षा वर्तमानातील परिस्थिती बदललेली असु शकते. काही गोष्टी आपल्याला अनुकूल झालेल्या असु शकतात. पण गतकाळाचा विचार करणारी माणसे या सकारात्मक बाबींकडे नकळत दुर्लक्ष करीत असतात. आणि आपला आजार वाढवित असतात.

अशा तर्‍हेने या सुभाषितावर मानसिक स्वास्थ्य आणि समुपदेशनाच्या दृष्टीने बरेच काही बोलता येईल. किंबहूना आजारागणिक या सुभाषिताचा वेगळा विचार करता येईल. संस्कृत भाषेत अल्पाक्षरी असण्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. कारण त्यामुळे हे सुविचार किंवा एकंदरीत अनेक तर्‍हेचे ज्ञान हे सूत्रमय भाषेत साठवले गेले आणि मुखोद्गत झाले. संपूर्ण पातंजल योगसूत्र फक्त १९६ सूत्रांमध्येच सांगितले गेले आहे. आणि त्यातील एकेका सूत्रांवर प्रदीर्घ भाष्य होऊ शकते इतका ठासून अर्थ भरलेला आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे “वन डे अ‍ॅट अ टाईम” हे लक्षात राहायला जितकं सोपं तितकं वरील सुभाषित सोपं नाही हा पहिला आणि महत्त्वाचा आक्षेप असु शकतो. तो योग्यदेखिल आहे. पण येथे पाठांतरापेक्षा मला विचार महत्त्वाचा वाटतो. आजकाल मोबाईलमुळे ही सुभाषिते साठवली जाऊ शकतात. वारंवार वाचली जाऊ शकतात. त्यावर मन चिंतन घडू शकते. तसे अनेक वॉटसग्रुप्स आहेत ज्यावर सुभाषिते, सुविचारांचा नुसता पाऊस पडत असतो. सतत या गोष्टी फिरत असतात.

सूत्रमयता हा संस्कृत भाषेचा महत्त्वाचा गुणधर्म आहे. आणि एखादा शब्द एखाद्या ठिकाणी कवी का वापरतो याचेही येथे महत्त्व आहे. तेथे दुसरा शब्द चालणारच नाही. महाकवी कालिदास जेव्हा “कश्चित् कान्ता” म्हणतो तेव्हा “कान्ता” या शब्दाशिवाय दुसरा शब्द तेथे चालणारच नाही. कारण ती नुसती पत्नी नाही तर आवडती भार्या आहे. प्रिय आहे. आणि ते त्याला तेथे अधोरेखित करायचं आहे. त्यामुळे शब्दाचा चपखल वापर आणि अल्पाक्षरी असताना त्यात भरपूर आशय साठवण्याची शक्यता हा संस्कृत भाषेचा जो विशेष आहे त्याचा या कामासाठी वापर करता येईल अशी माझी समजूत आहे. व्यसनमुक्तीसाठी रूग्णांना संस्कृत येण्याची आवश्यकता नाही. कारण हे समुपदेशन त्यांना समजेल अशा भाषेतच करायचे आहे. मात्र या सुविचारांचा रुग्णासाठी वापर करणार्‍याला मात्र त्याचा अर्थ नीट समजावून घेऊन त्यावर समस्येप्रमाणे भाष्य करता आले पाहिजे. ह्या संस्कृत सुभाषितांचा वापर व्यसनमुक्तीसाठी आवश्यक असणार्या समुपदेशनासाठी नक्कीच करता येऊ शकतो.

20 Comments

    • खूप छान. विचार करायला भाग पाडणारा लेख आहे. समाजमाध्यामांवर यांचा वारंवार वापर झाला तरच त्यांचा प्रचार होईल ही संकल्पना आवडली.

  1. अतिशय योग्य शब्दात एका मोठ्या समस्येवर भाष्य केले आहे.जुनी,दुर्बोध म्हणून संस्कृत भाषेकडे दुर्लक्ष न करता त्याचा आधुनिक समस्या सोडविण्यासाठीही योग्य रितीने वापर होऊ शकतो हे सोदाहरण दाखविले आहे

  2. श्रावणी,संस्कृत सुभाषिते आणि व्यसनमुक्ती यांचा सुरेख असा मेळ लेखातून दिसून येतो.खर तर या सुभाषितांचा वापर व्यसनमुक्तीसाठी फार चांगल्या पद्धतीनी होऊ शकतो हे पटल.वाचताना आणखी आणखी असच छान वाचतच रहाव अस वाटल.तुला अनेकोत्तम शुभेच्छा.

  3. श्रावणी,संस्कृत सुभाषिते आणि व्यसनमुक्ती यांचा सुरेख असा मेळ लेखातून दिसून येतो.खर तर या सुभाषितांचा वापर व्यसनमुक्तीसाठी फार चांगल्या पद्धतीनी होऊ शकतो हे पटल.वाचताना आणखी आणखी असच छान वाचतच रहाव अस वाटल.तुला अनेकोत्तम शुभेच्छा.

    • मोजक्या शब्दात महत्वपूर्ण माहिती. संस्कृत सुभाषित,त्याचा व्यसनमुक्तीसाठी महत्वाचा उपयोग ही संकल्पना अप्रतिमरित्या
      स्पष्ट केली आहे.खूप अभिनंदन

  4. श्रावणी, छान लेख. संस्कृत भाषा शिकायला समजायला सोपी आहे पण तेवढीच गहन. सुभाषितांचा छान वापर करून व्यसनमुक्ती चा उद्देश साध्य करणे ही छान कल्पना…आम्हा सर्वांच्या खूप शुभेच्छा

  5. व्यसनमुक्तीसाठी सुभाषितांतील आशयघन विचार वापरण्याचा विचार खूपच चांगला आहे.

  6. व्यसनमुक्तीसाठी सुभाषितांतील आशयघन विचार वापरण्याचा विचार खूपच चांगला आहे. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!

  7. श्रावणी, सुष्टु भाषित असे सुभाषित मनावर उत्तम संस्कार घडवतात. शालेय जीवनातच नीती शतकं याचा अभ्यास करवला तर कदाचित लोकं व्यासंनांपासून परावृत्त होतील

  8. संस्कृत मध्ये व्यसन याचा अर्थ संकट! किती समर्पक आहे ना.

  9. खूप अर्थपूर्ण आणि वेगळा लेख आहे.
    आपल्या संस्कृत भाषेचं महत्व समजून घेणे आणि अभ्यास करून लोकांपर्यंत पोचवणे हे खूप कठीण आहे आणि तू आणि तुझे सहकारी हि कामगिरी सहजरित्या पेलत आहेत हे विशेष ! उशिरा का होईना पण तुमच्या या परिश्रमांचे नक्कीच फळ मिळेल आणि सर्व स्तरांवर योग्यरित्या दखल घेतली जाईल अशी मी प्रार्थना करतो.
    तुला खूप खूप शुभेच्छा !

  10. खूप छान लेख. विषय अतिशय सुंदर आहे. संस्कृत सुभाषिते आणि व्यसन मुक्ती साठी त्याचा वापर हा एक नाविन्यपूर्ण विषय आहे पण तितकाच कठिणही. श्रावणी तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी तुला अनेक शुभेच्छा

  11. अभ्यासपूर्ण लेख. खुप छान संकलन आणी योग्य शब्दात मांडणी.
    खुप खुप शुभेच्छा.

  12. संस्कृत भाषेच्या माध्यमातून एका महत्वाच्या विषयावर छान भाष्य केले आहे. हा खजिना आपण जपला पाहीजे.

  13. खूप छान, माहिती व अर्थपूर्ण लेख. संस्कृत भाषा आणि व्यसनमुक्ती दोन्हीचे महत्त्व पटवून देणारा.. मोजक्या अन् चपखल शब्दात वापर केल्या जाणाऱ्या आपाल्या संस्कृत भाषेविषयी चे प्रेम आणि आदर आपल्या मनात कायम राहील हे निश्चित..

Leave a Reply

Your email address will not be published.


*