मेघदूतातील पुष्पवैभव : एक आस्वाद

प्रा।गौरीमाहुलीकर, चिन्मयविश्वविद्यापीठ, एर्नाकुलम्, केरळ

आमुख: कालिदास हा कविताकामिनीचा विलास आहे हे सर्वश्रुत आहे। हा विलास अधिक मनोज्ञ होतो याचे कारण आहे कालिदासाचे निसर्गाशी असणारे तादात्म्य। हे तादात्म्य परिसरातील पशुपक्षी, वृक्षवेली आणि त्यांचा मानवी जीवनावर, भावनिक पातळीवर होणारा परिणाम अशा घटकांवर आधारित आहे। कालिदासाचे या विषयावरील प्रभुत्व आणि नैपुण्य वादातीत आहे। आदिकवी वाल्मीकिंचा आदर्श समोर ठेवून कालिदासाने त्याच्या काव्यनाटकांत नैसर्गिक संपदेची मुक्तपणे उधळण केलेली दिसते। प्रस्तुत लेखात केवळ मेघदूत या चिमुकल्या काव्यातील पुष्पवैभवाचा एक काव्यात्म आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे। ऋग्वेदातील एका सूक्तात वाग्देवता एखाद्या पत्नीप्रमाणे आहे व ती केवळ आस्वादक पतीलाच आपले अंतरंग उघडपणे दर्शविते असे सांगितले आहे। कवीच्या सर्जनशील प्रतिभेला अशा रसिक वाचकाची नितांत आवश्यकता असते।

उत त्वः पश्यन्न ददर्श वाचमुत त्वः‍ शृण्वन्न शृणोत्येनाम्।

उतो त्वस्मै तन्वं विसस्रे जायेव पत्य उशती सुवासाः॥ ऋग्वेद १०, १, ४

कालिदास अशा रसिक आस्वादक कवीच्या स्थानी आहे, त्यामुळे त्याच्यावर वाग्देवी प्रसन्न आहे यात शंकाच नाही, वानवा आहे, ती त्याच्या मनोभूमिकेतून केलेल्या रसिक वाचकाच्या आस्वादकतेची, याचसाठी केला हा लेखप्रपंच!

मेघदूतातील पुष्पवैभव: मेघदूतात साधारणपणे तीसेक वृक्षवेलींचे निर्देश आढळतात।हे उल्लेख निव्वळ वर्णनासाठी आले आहेत असे वाटत नाही, कालिदासाने त्यांचा अत्यंत कौशल्याने उपयोग केलेला दिसतो। पहिल्याच श्लोकात ‘स्निग्धच्छायातरुषु वसतिं चक्रे’ या ओळीतच मेघदूतातील स्नेहपूर्ण, भावनिक छाया आणि तिथेच रममाण होण्याची वृत्ती मनी निर्माण झाली तर आश्चर्य वाटायला नको। कुड्याची पांढरीशुभ्र फुले पावसाळ्याच्या सुरुवातीलाच उमलू लागतात, त्याच सहजलभ्य पुष्पांची अंजली अर्पण करून विरही यक्ष मेघाचे स्वागत करतो आणि मेघाशी सौहृद निर्माण करतो। म्हटलेच आहे, ‘आर्तवैर्हि कुसुमैर्देवतातिथिपूजनं कर्तव्यम्’ ऋतूद्भव कुसुमांनी देवतांचे व अतिथींचे स्वागत करावे। ‘बाह्योद्यान’ या शब्दाने यक्ष कुबेराच्या वैभ्राजवनाचा (पूर्वमेघ,७) उल्लेख करतो। त्याच्या मनी कदाचित् त्याचा मित्र चित्ररथ ज्याने त्या वनाची निर्मिती केली त्याची आठवण आली असेल, अलकानगरीतील त्याचे वैभवशाली आणि मंत्रभारले क्षण आठवले असतील आणि आत्ताच्या विरहावस्थेत त्याचे बाह्योद्यान खरंच खूप बाह्य ठरले म्हणून त्याच्या हृदयी सूक्ष्म कळ उठली असेल का? नक्कीच, कारण नंतर तो स्त्रियांच्या हृदयाची तुलना कोमल कुसुमांशी करतो। सुकुमार हृदय आशेच्या तरल पण चिवट धाग्याने बांधले नसते तर विरहवेदनेच्या भाराने कधीच तुटले असते (पूर्व,९)

पूर्व,११ ‘कर्तुं यच्च प्रभवति महीमुच्छिलीन्ध्रामवन्ध्याम्’- या श्लोकात मेघाच्या सर्जक गर्जिताचा उल्लेख करताना कालिदास लिहितो, भूमातेचे उदर फाडून उगविणारी भूच्छत्रे याचे निदर्शक आहेत।शिलीन्ध्र शब्दाचा सामान्य अर्थ कन्दलिका, कर्दळी असा अहे, परंतु एक अर्थ आहे केळफूल, विशेषतः रानटी केळ जी पाऊस पडताच हिरव्या पर्णभाराने सजते। केळफुलाच्या शुभसंकेताविषयी भारतीयांना सांगण्याची आवश्यकता नाही।मल्लीनाथ निमित्तनिदान या ग्रंथाच्या आधाराने भाष्यात लिहितो, महीम् अवन्ध्यां सफलां कर्तुं प्रभवति, शिलीन्ध्राणां भाविसस्यसंपत्तिसूचकत्वादिति भावः।यक्षाचा विरहकाल संपून लवकरच तो प्रियेला भेटेल असा आशीर्वादपूर्वक संकेतच जणू याने मिळतो असे वाटते। पूर्व,२१ या श्लोकात नीप म्हणजे कदंब, कन्दली, त्यांच्या अर्धोन्मीलित कलिका, त्यांचा दरवळ, त्याने सुरभित झालेले मार्ग यांचे मनोहारी वर्णन आहे। या वर्णनात यक्ष मनोमन त्याच्या अलकानगरीत पोचला आहे असे भासते। दशार्णदेशाच्या वर्णनात उपवनाच्या चोहोबाजूंना अर्धस्फुट केवड्याच्या कणसांचा उल्लेख आहे।केवड्याचा मादक गंध, त्याने वेडावलेले पक्षी, त्यांची घरटी बांधण्याची‍ लगबग यांचे प्रत्ययकारी चित्रण कालिदास करतो। नीचैः नामक पर्वतावर कदंब का फुलले हे सांगताना कालिदासाने केलेली उत्प्रेक्षा अत्यंत मनोरम आहे। पर्वत आणि मेघ यांचे मैत्र अनादिकाळापासूनचे आहे, फारा दिवसांनी, नव्हे महिन्यांनी मित्र भेटले, कडकडून मिठी‍ मारली की आनंदाने शरीर रोमांचित होणे स्वाभाविकच आहे नाही का? पावसाळी मेघ अनेक महिन्यांनी भेटल्यावर नीचैः पर्वताला (सध्याचा उदयगिरी असावा) प्रेमाचे भरते आले आणि तो पुलकित झाला, त्याच्या अंगांगावर कदंबरूपी काटा आला असे कालिदास लिहितो। कदंबाची फुले ज्यांनी पाहिली आहेत त्यांना यातील गमक लगेच समजेल।

मेघाच्या प्रवासाच्या पुढच्या टप्प्यात त्याला जाईजुईची फुले तोडणार्या तरुण मुली दिसतील असे यक्ष सांगतो, वननदीच्या तीरावर यूथिका (जुई) ची उपवने आहेत, ती फुले खुडताना घामेजलेल्या मुलींना मेघाची सावली क्षणिक विसावा देईल आणि मग त्यांच्या मुखावरील स्मितरेषा खूप काही सांगून जाईल (२७)असे सूक्ष्म अवलोकन कवी करतो। त्याकाळात फुलांची शेती होत होती असा सामाजिक संदर्भही याला जोडलेला आहे। उज्जयिनीला गेल्यानंतर संध्याप्रकाशाने उजळून जास्वंदीसारखा रक्तवर्ण प्राप्त झालेला मेघ महाकालास रक्तलांछित गजचर्माची आठवण करून देईल (३९)अशी अभिनव कल्पना केवळ कालिदासालाच सुचू‍ शकते।कमलिनीचे विरहाचे अश्रू (पाकळ्यांवरील दंवबिंदू) पुसण्यासाठी सज्ज झालेल्या सूर्याच्या मार्गात तू अडसर होऊ नकोस असे लिहिताना सूर्य आणि कमलिनीचे प्रियकर-प्रेयसीचे नाते ही कविकल्पना कालिदास मांडतो(४२)। सूर्यविकासी कमळे रात्री मिटतात आणि सूर्योदयाबरोबर उमलतात हा संकेत उत्तरमेघातील २० व्या श्लोकातही आढळतो।ज्याप्रमाणे सूर्याशिवाय कमळाला शोभा नाही त्याचप्रमाणे माझ्याविना माझ्या घराला शोभा नाही असे यक्षाला म्हणायचे आहे।निराळ्या शब्दांत हाच आशय शिशिरातील ध्वस्त कमलिनी(उत्तरमेघ २३) असा येतो, आणि ३० व्या श्लोकात साभ्रेऽह्नीव स्थलकमलिनी न प्रबुद्धां ‍न सुप्ताम् ह्या शब्दांतही येतो।  गंभीरा नदीचे जल स्फटिकासमान स्वच्छ व नितळ आहे, तिच्या पात्रातील शफरी नावाच्या पांढर्या मासोळ्या जणू तिचे नयन आहेत अशी उत्प्रेक्षा किती विलक्षण आहे! चर्मण्वतीच्या कटाक्षांना कुंदफुलांची पखरण म्हणताना अशीच उत्प्रेक्षा दिसते।(५०) कुमुद म्हणजे पांढरे कमळ, म्हणून जिथे जिथे पांढरा रंग, तिथे तिथे कुमुदाची उपमा या न्यायाने कैलासावरील बर्फही कुमुदासारखा , पर्यायाने शिवाच्या अट्टहासासारखा (६१) असे लिहिताना हास्य धवल मानले जाते हा कविसंकेत, कविप्रौढोक्ती आढळते।

मेघदूतातील मेघ इंद्राचा विशेष अधिकारी आहे, तो कामरूप, हवे ते रूप धारण करू शकणारा आहे असे सुरुवातीलाच सांगितल्यानंतर (६) त्याला पुष्पमेघीकृतात्मा होऊन देवगिरीवरील स्कंदावर पुष्पवृष्टी कर (४६) असे सांगून कालिदास त्याच्या आराध्यदेवतेच्या पुत्राचा सत्कार करताना दिसतो। मेघाने कमळांचा वर्षाव करावा तितक्याच सहजतेने कुरुक्षेत्राच्या रणभूमीत अर्जुनाने बाणंचा वर्षाव केला असेही लिहितो। (५१) ज्या कानांमधे कुंडले म्हणून कमलदले शोभावीत त्या कानांत भवानी पुत्रप्रेमामुळे मोराचे पीस घालते असे लिहून कालिदास आपला भक्तिभाव व्यक्त करतो आणि जणूकाही ‘जगतः पितरौ” विश्वाच्या आद्य पालकांची पूजा बांधतो।(४७)

उत्तरमेघात अलकानगरीचे सर्वऋतूंमधील पुष्पवैभव वर्णन करताना कालिदासाने अनेक फुलांचा उल्लेख केला आहे। वस्तुतः कमळ शरदात, कुंद हेमंतात, लोध्र शिशिरात, कुरबक वसंतात, शिरीष ग्रीष्मात आणि कदंब वर्षा ऋतूत बहरतात, मात्र कुबेराच्या ऐश्वर्यसंपन्न नगरीत ही सर्व फुले सदासर्वदा आढळतात (२) वृक्षवेली नेहमीच पुष्पभाराने लगडलेल्या, जलाशय सर्वदा कमळांनी उत्फुल्ल (३) यक्षाच्या प्रासादाजवळील वापी कायम हेमोत्पलांनी काठोकाठ भरलेली (१६) वापीची प्रत्येक पायरी पाचूप्रमाणे हिरव्यागार शैवालाने मंडित, क्रीडाशैल सुवर्णकर्दळींनी वेष्टित (१७) असे वैभवशाली व स्वप्नवत् भासणारे वर्णन करून मग यक्ष वास्तवाकडे वळतो। अभिसारिका जेव्हा लगबगीने पियकराला भेटायला जातात तेव्हा त्यांच्या गतीमुळे केसांत माळलेली मंदारपुष्पे गळून पडतात आणि त्यांची कर्णकुंडले झालेली कमलकुसुमे पाकळीपाकळीने विलग होतात (११)

यक्ष स्वतःच्या घराचे वर्णन करतो तेव्हा जणू त्या कल्पनाविश्वात हरवून जातो। मनःचक्षूंसमोर उभे असलेले भवन तो जसेच्या तसे मेघाला ओळख पटावी असे सांगतो। स्वभावोक्ती अलंकाराचे उदाहरण म्हणून हा श्लोक (१५) सांगता येईल। “कुबेराच्या प्रासादाच्या उत्तरेला आमचे भवन आहे बरं का मेघा, तुला ते दूरवरून ओळखता येईल कारण त्याची सप्तरंगी कमान! भवनाच्या निकट एक आटोपशीर मंदारवृक्ष आहे, तो पुष्पसंभाराने इतका वाकला आहे की फुले हाताने सहज तोडता येतील। या वृक्षाचे एक वैशिष्ट्य म्हणजे माझ्या प्रियेने त्याचे संवर्धन पुत्रस्नेहाने केले आहे। अजून एक खूण सांगतो। क्रीडाशैलावर एक रक्तवर्ण अशॊक आहे, प्रियेच्या अळता लावलेल्या पादाघाताने तो कैकदा बहरला आहे, त्याची कोवळी तांबूस पालवी याचा प्रत्यय देईल, शिवाय एक बकुळ आहे जो प्रियेने त्याच्या मुळांशी टाकलेल्या मदिरासेकाने मदिरेचाच वर्ण व मादक गंध घेऊन फुलतो।“संस्कृत साहित्याला परिचित अशा वनस्पतिदोहदाच्या (डोहाळे) कविसंकेताने परिपूर्ण असे हे श्लोक वाचताना रसिक वाचक निसर्गाशी एकरूप होतो, कालिदासाच्या रसिकतेने त्या त्या वृक्षांकडॆ पहायला शिकतो असे मला वाटते।

यक्षाचे पत्नीप्रेम संपूर्ण मेघदूतात दिसते, एका श्लोकात तो मेघाला सांगतो, “अलकानगरीत आमच्या भवनापाशी गेल्यावर क्षणकाल थांब, माझी प्रिया कदाचित झोपली असेल, तर तिला उठवताना मित्रा तू मालतीकुंजातून जा, मालतीच्या गंधाने सुवासित जलतुषारांनी, एखाद्या राजकन्येला हलकेच जागवावे, तसे तिला जागव”(३८)।मल्लीनाथ त्याच्या टीकेत भोजराजाचा एक श्लोक उद्धृत करतो व लिहितो, एतेन तस्याः प्रभुत्वाद्व्यजनानिलसमाधिर्व्यज्यते। तिचा तो अधिकारच आहे, उगा धसमुसळेपणाने तिला उठवू नकोस असे म्हणताना यक्ष किती विरहकातर झाला असेल याची कल्पना हृदयसंवादभाक् रसिकालाच येऊ शकते। पुरुषासारखा पुरुष यक्ष या विरहाने कृश झाला (कनकवलयभ्रंशरिक्तप्रकोष्ठः पूर्वमेघ २) तर ती कोमलांगी कोणत्या आशातंतूवर जगत असेल बरे! पहाट होताच कुंदाची फुले अलगद भूमीवर गळून पडावीत तसे तिचे जीवन अत्यंत शिथिल झाले असेल (५३) म्हणून तिला अगोदर आश्वस्त करायला हवेस असे यक्ष मेघाला सांगतो।

दांपत्यजीवनात प्रियकर-प्रेयसीचे नाते, त्यातील उत्कटता, ओढ, आतुरता परस्परांविषयीची काळजी, त्याने येणारी विह्वलता व कातरता या सर्व भावभावनांचा अनोखा मिलाफ मेघदूत या लघुकाव्यात पहायला मिळतो आणि त्याला साथ आहे यातील पुष्पवैभवाची। याचा एक उत्स्फूर्त आस्वाद घेण्यासाठी हा लेख!

जाता जाता, ‘दीपशिखी कालिदास’ या बिरुदाप्रमाणेच ‘सगन्धकालिदास’ असे बिरुद या महाकवीला मिळाले आहे चातकस्ते सगन्धः(१०), जग्ध्वाऽरण्येष्वधिकसुरभिं गन्धमाघ्राय चोर्व्याः (२१) कालक्षेपं ककुभसुरभौ पर्वते पर्वते ते (२३) हर्म्येष्वस्याः कुसुमसुरभिष्वध्वखेदं नयेथाः (३५), धूतोद्यानं कुवलयरजोगन्धिभिर्गन्धवत्याः (३६) कमळांच्या परागकणांनी सुरभित झालेल्या गंधवती नदीत तरुणींची जलक्रीडा। आसीनानां सुरभितशिलं नाभिगन्धैर्मृगाणां (५५) अशा अनेक पंक्तींतून कालिदासाची कुसुमकेली, त्याचे गंधवेड रसिकांपर्यंत पोचते यात शंका नाही।

डॉ. गौरी माहुलीकर
gauri.mahulikar@cvv.ac.in

Prof. Gauri Mahulikar
Professor & Dean of Faculty
Chinmaya Vishwavidyapeeth
Veliyanad, Ernakulam, Kerala – 682313

14 Comments

  1. सुगंधग्राही रसिकांच्या मानसांगणी आपण घातलेला फुलांचा सडा खूप भावला.

  2. Howdy

    I have just verified your SEO on vruttavallari.com for the current search visibility and saw that your website could use a push.

    We will enhance your ranks organically and safely, using only state of the art AI and whitehat methods, while providing monthly reports and outstanding support.

    More info:
    https://www.digital-x-press.com/unbeatable-seo/

    Regards
    Mike Day

    Digital X SEO Experts

Leave a Reply

Your email address will not be published.


*