अग्नि

अग्नि

डॉ. विवेक भट

ऋग्वेदांत अग्नि हा महत्त्वाचा देव आहे आणि इन्द्राच्या खालोखाल त्याचे महत्त्व आहे. किंबहुना त्याला इन्द्राचा जुळा भाऊ सुद्धा मानले आहे. ऋग्वेदाच्या 1028 सूक्तांपैकी जवळजवळ 200 सूक्तांत अग्नीचे स्तवन केले गेले आहे. ऋग्वेदातील पहिली ऋचाच मुळी अग्नि या शब्दाने सुरू होते. ‘अग्नीमीळे पुरोहितं यज्ञस्य देवमृत्विजम् I होतारं रत्नधातमम् II’ (ऋ. 1.1) या ऋचेद्वारे विश्वामित्रपुत्र ऋषि मधुच्छन्दा म्हणतात की ‘मी अग्नीची स्तुति करतो, जो यज्ञाचा पुरोहित (दैवी धर्मोपदेशक) आहे, जो देवांचे आवाहन करणारा आहे, जो योग्य समयी यजन करणारा आहे (ऋतु + इज् यावरून ऋत्विज म्हणजे योग्य समयी यजन करणारा), आणि जो उत्कृष्ट सम्पदा प्रदान करणारा आहे’.  पुरोहित हा राजाचा सर्वप्रथम आचार्य असतो आणि तो राजाचे सर्वतोपरी कल्याण करतो त्याप्रमाणे अग्नि यजमानाच्या सर्व कामना पूर्ण करतो.

यास्काचार्यांच्या आणि सायणाचार्यांच्या मते अग्नीची स्तुति सर्वप्रथम करण्याचे कारण म्हणजे अग्नि हा देवांमध्ये अग्रणी (अग्रे नयतीति). आहे आणि तो सर्वांच्या पुढे चालत असतो. युद्धामध्ये तो नेतृत्व करतो आणि त्याच्या नेतृत्वाखालीच अनेक युद्धे लढून देवांनी असुरांना पराजित केले आहे. अग्नि हा देवदेवतांचे मुख आहे आणि देवतांना दिलेली आहुति अग्नीच देवतांच्यापर्यंत नेऊन पोचवितो. म्हणून तो ‘हव्यवाहन’ आहे. ‘स्वाहा’ ही अग्नीची पत्नी आहे, आणि अग्नि तिच्याद्वारे हव्य ग्रहण करून पुढे तो ते देवांपर्यंत पोचवितो. म्हणून यज्ञात आहुति देते वेळी ‘स्वाहा’चे उच्चारण केले जाते. ऋग्वेदांत असेही म्हटले आहे की एकदा अग्निदेव आपल्या हातांत अन्न घेऊन गुहेत जाऊन बसले. त्यामुळे सर्व देव भयभीत झाले. (ऋ. 1.67). थकलेभागलेले देव कसेबसे ध्यानस्थ बसलेल्या अग्नीजवळ गेले आणि खाली बसून त्यांनी अग्नीची स्तुति केली. मरुतांनी तर तीन वर्षेपर्यंत अग्नीची स्तुति केली, तसेच अंगिरानेही अग्नीची स्तुति केली.   

अग्नीच्या उत्पत्तीसंबंधी वेदांच्या प्राचीन संहितांमध्ये, उदा. काठक संहितेत (6.1) आणि मैत्रायणी संहितेत (1.8.1) असे सांगितले आहे की विश्वाच्या सुरूवातीला काहीच अस्तित्वात नव्हते, केवळ प्रजापति (ब्रह्म) तेवढा होता. त्याच्या कपाळापासून अग्नि उत्पन्न झाला, त्याच्यापासून प्रकाश आणि नंतर दिवस-रात्रीची निर्मिति झाली. अशा रीतीने अग्नि हा ब्रह्मस्वरूपच आहे, तोच ‘सत्य’ आहे. नंतरच्या काही संहितांमध्ये असे म्हटले आहे की उत्पत्ति-स्थिति-लय दर्शविणार्‍या सर्वपुरातन त्रिमूर्तींपैकी अग्नि हा एक आहे, ज्याची पृथ्वीवर सत्ता आहे. दुसरा वादळ-वारा, वर्षा आणि युद्ध यांचा देव इन्द्र, त्याची सत्ता अंतरिक्षात आहे, आणि तिसरा सूर्य, त्याची सत्ता आकाशात तसेच स्वर्गात आहे. अशा प्रकारे सृष्टीमध्ये अग्नीचे अस्तित्व तिन्ही स्तरांवर आहे: पृथ्वीवर आगीच्या स्वरूपात, अंतरिक्षामध्ये वीजेच्या स्वरूपात आणि आकाशामध्ये सूर्याच्या स्वरूपात. असे त्याचे त्रिस्थळी अस्तित्व आहे. म्ह्णून ‘त्रिपात्स्य’ (ज्याची तीन घरे आहेत) असे त्याचे एक नांव आहे.

पृथ्वीवर अग्नीचा जन्म अरणींपासून (म्हणजे ज्यांच्या घर्षणाने अग्नीची निर्मिति होते अशा विशिष्ट लाकडी काड्या) होतो. अशा प्रकारे अग्नि चेतविण्यासाठी शक्ति लागते म्हणून तो ‘सहस: सूनु:’ आहे. चेतविलेला अग्नि सुरूवातीस अगदी सूक्ष्म, नाजूक असल्यामुळे त्याचे जतन काळजीपूर्वक करावे लागते, मोठा व्हायला लागला की ठिणगी, धूर अशी त्याची रूपे होतात. वाढता वाढता तो नंतर ज्वालेचे रूप धारण करतो आणि अधिक बलवान् झाला की शेवटी ज्यांनी त्याला निर्माण केले त्या अरणींनाही भक्षण करून टाकतो.    

यज्ञस्थळी देवांना घेऊन येणारा आणि मानवांनी दिलेल्या आहुती देवांपर्यंत पोचविणारा म्हणून अग्नि हा देव आणि मानव यांच्यामधला दुवा, खरे तर देवदूत बनला आहे. यज्ञीय अग्नि तर तो आहेच, परंतु प्राणिमात्रांमध्ये उदरस्थ असणारा, पाकशालेत आवश्यक असणारा, वनस्पतींमध्ये जैविक रस म्हणून असणारा, चितेवर दहनक्रियेमध्ये भाग घेणारा, तसेच पुनर्जन्मावेळी अवतरणारा ही सर्वही अग्नीचीच रूपे आहेत. अग्नी हा आग्नेय दिशेचा दिक्पाल आहे; खरे तर त्या दिशेचे नांवच अग्नीवरून घेतलेले आहे. हिंदु मंदिरांमध्ये अग्नि सामान्यत: आग्नेय दिशेलाच स्थापन केला जातो. आकाश, आप, वायु, पृथ्वी, यांच्याबरोबर अग्नि हा पंचमहाभूतांपैकी एक आहे.

अग्नीचे शरीर ज्वालारूपी, लाल रंगाचे असून त्याला तीन पाय, सात भुजा, सात जिभा, आणि तीक्ष्ण सोनेरी दांत आहेत. त्याचे डोळे काळे, केसही काळे आणि तूपाने माखलेले आहेत. त्याचे दोन चेहेरे त्याच्या लाभदायी आणि विनाशकारी गुणांचा निर्देश करतात. अग्नीचे वाहन मेंढा आहे, परंतु काही ठिकाणी तो रथारूढ असून त्याचा रथ बकरे आणि पोपट ओढतात असेही सांगितले आहे. अग्नि शीघ्रकोपी असून त्याला भूक सहन होत नाही असे म्हणतात, म्हणून त्याला नेहमी बलि किंवा आहुति देण्याची आवश्यकता असते.        

संस्कृतमधील ‘अज्’ (पुढे नेणे) या धातूपासून ‘अग्नि’ या शब्दाची व्युत्पत्ति दाखविता येते. निरुक्तामध्ये म्हटले आहे की या शब्दाची व्युत्पत्ति शाकपूणि ‘इ’ (जाणे), ‘अञ्ज्’ (दाह), आणि ‘नी’ (पुढे नेणे) अशा तीन वेगवेगळ्या धातूंपासून करतो. अग्नीची नांवे असंख्य आहेत. ‘जातानि सर्वाणि वेत्ति’ म्हणून ‘जातवेद’ हे त्याचे प्रसिद्ध अभिधान आहे. (‘सर्वै: जातै: वेद्य:’ किंवा ‘जाते जाते विद्यते’ अशा प्रकारेही त्याचा अर्थ लावता येतो).  त्या रूपाने तो प्रकाशाबरोबर ज्ञानाचेही प्रतीक झाला आहे, म्हणून तो ‘विप्र’ आहे. (प्रेताच्या दहनक्रियेमध्ये) क्रव्य अर्थात् मांस भक्षण करणारा म्हणून ‘क्रव्याद’ हेही अग्नीचेच दुसरे रूप आहे. तो स्वयंभू, स्वत:च स्वत:ला निर्माण करणारा आहे म्हणून त्याला ‘तनुनपात’ म्हटले आहे. त्याचा धूर आकाशापर्यंत पोहोचतो आणि जणू आकाशाला आधार देतो म्हणून तो ‘धूमकेतु’ आहे. पावन करणारा म्हणून त्याला ‘पावक’ म्हटले आहे. काली, कराली, मनोजवा, सुलोहिता, धूम्रवर्णी, स्फुलिंगी आणि विश्वरूचि अशा अग्नीच्या सात जिभा आहेत, म्हणून तो ‘सप्तजिव्ही’ आहे. या सात जिभा अग्नीच्या शरीरातून विकसित होणार्‍या सात प्रकारच्या प्रकाशकिरणांचे प्रतिनिधित्व करतात. वायूसह त्याची गति आहे म्हणून तो ‘वह्नि’ आहे. आहुति भक्षण करतो म्हणून ‘हुताशन’ किंवा ‘हुतभुक्’ आहे. त्याचा प्रकाश वैविध्यपूर्ण म्हणून तो ‘चित्रभानु’ आहे. त्याचा प्रकाश समृद्धीचे प्रतीक म्हणून तो ‘विभावसु’ आहे. सर्व लोकांकडून अग्नीची स्तुति केली जाते म्हणून तो ‘नाराशंस’ आहे. सूर्यासारखा तेजस्वी असल्यामुळे ‘भूरितेजस्’ तसेच ‘ज्वलन’ हीही त्याची नांवे आहेत. तो वसूंपैकी एक ‘अनल’ आहे. ‘वैश्वानर’ (सर्वांप्रति समभाव ठेवणारा) म्हणून तो सर्व प्राणिमात्रांच्यात सामावलेला आहे. त्याचा वर्ण लाल म्हणून तो ‘पिंगेश’ आहे. अत्यंत अभिमानी म्हणून तो ‘रुद्रगर्व’ सुद्धा आहे. उपासकांबरोबर तो घराचेही रक्षण करतो म्हणून त्याला ‘गृहपति’ मानले आहे, तसेच ‘दमूना:’ हेही त्याचे नांव आहे. (लॅटिन मध्ये ‘दमूनस्’ हा शब्द याच अर्थाने येतो हे लक्षणीय आहे).

वेदोत्तर काळात मात्र अग्नीचे महत्त्व काहीसे कमी झाल्यासारखे दिसते. तरी शतपथ ब्राह्मणामध्ये (5.2.3) अग्नि हा सर्व देवतांचा स्वरूपी असल्याचे म्हटले आहे. उपनिषदात अमरत्व, ऊर्जा, अज्ञानरूपी अंधकाराचा नाश करून ज्ञानाचा प्रकाश दाखविणारा यांचे तो प्रतीक बनला आहे. तसेच पुराणकालापासून ते अगदी थेट आजपर्यंत मानवी जीवनाच्या अनेक अंगांत अग्नीचे अस्तित्व टिकून राहिले आहे. यज्ञकार्यात, अग्निहोत्रात, विवाहविधीतील सप्तपदीमध्ये, एवढेच काय तर होळी आणि दीपावली सारख्या सणांमध्ये सुद्धा अग्निदेवाचीच आठवण केली जाते.

पुरातन युरोभारतीय संस्कृतीशी अग्नीचा संबंध:

केवळ अग्नि हा शब्दच नव्हे तर अग्निकथेची पूर्वपीठिका सुद्धा युरोभारतीय मिथककथांशी संबंधित असल्याचे दिसून येते.

अग्नि हा शब्दाचा उद्भव पूर्व युरोभारतीय भाषेमधून (Proto Indo European) झाल्याचे स्पष्टपणे दिसते. लॅटिनमध्ये ‘इग्निस’, लिथुआनिअन भाषेत ‘उग्निस’, प्राचीन प्रशियाच्या काही भागामधील भाषेत ‘ओग्नि’, रशियनमध्ये ‘ओगोन’ अशी या शब्दाची रूपे सापडतात. त्यावरून पूर्व-युरोभारतीय मिथकांचे (proto Indo European mythology) मूळ एकच असावे या तर्काला पुष्टि मिळते.

इराणमधील ज̣रथुष्ट्रानुयायी अग्निपूजक होते आणि ते अग्नि सतत प्रज्ज्वलित ठेवण्याचे काम करीत असत. त्यांचा देव ‘अतर’ हा वेदिकांच्या अग्निदेवाशी विलक्षण साम्य दर्शवितो. प्रामुख्याने तो स्वर्ग आणि पृथ्वी यांच्यातील तसेच देव आणि मानव यांच्यातील दुवा म्हणून काम करीत असे. ही एका अर्थाने वेदातील ‘हव्यवाहन’ याच्याशी समांतर भूमिका होय.

डॉ. विवेक भट

(Tel. 9870193649)

bhatvivekm@yahoo.co.in

संदर्भसूचि

ऋग्वेदामधील अग्निसूक्त 1.1

https://drive.google.com/file/d/12MAR8f15vc-I5ZjcHFGhcpoqFY5Ybg70/view
http://sanskritsamagri.blogspot.com/2017/11/rigveda-1.html
https://en.wikipedia.org/wiki/Ancient_Iranian_religion
https://en.wikipedia.org/wiki/Agni

https://archive.org/details/rigvedapenguincl00anon/page/n7/mode/2up (An important source: ‘The Rig Veda An anthology’ by Wendy Doniger, Penguin Books, 1981)

https://m.bharatdiscovery.org/india/%E0%A4%85%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5 (भारतकोश)

https://www.naidunia.com/spiritual/vrat-tyohar-fire-is-god-of-civilizations-2855930

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*