मेघदूत- निसर्गसौंदर्य आस्वाद

अन्वय

कवी शंकर रामाणी यांचं एक प्रसिद्ध भावगीत आहे- “रंध्रात पेरली मी आषाढ दर्द गाणी, उन्मादल्या सरींची उमजून घे कहाणी.” या गीतातील आषाढ, दर्द, उन्माद या उल्लेखांमधून सरळ मेघदूताचा संदर्भ आपल्याला जाणवतो. तसं म्हटलं तर मेघदूत हे कालिदासाचं खंडकाव्य पण सर्वाधिक प्रसिद्ध असं हे काव्य आहे.  या काव्याची भुरळ गेली कित्येक वर्षे मराठी आणि संस्कृत भाषेतील विद्वानांना पडलेली दिसते. संस्कृत मधील अनेक टीकाकारांनी मेघदूतावर विविध लेखांमधून भाष्य केलेले दिसते.  मराठी भाषेतीतल विविध साहित्यिक जसे कवी कुसुमाग्रज, कवी वसंत बापट, कवयत्री शांता शेळके यांनीही मेघदूताची समश्लोकी भाषांतरे केलेली आहेत. निव्वळ साहित्यिकच नव्हेत तर विविध क्षेत्रातील लोक जसे न्यायाधीश गणेश कात्रे, डॉ. श्रीखंडे,भारताचे पहिले अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख, बँक ऑफ महाराष्ट्रचे चेअरमन वसंत पटवर्धन अशा अनेकांनी मेघदूताचे भाषांतर करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. फक्त मराठीतच मेघदूताची जवळ पंचवीस ते तीस भाषांतरे झालेली दिसतात.

” एखाद्या निर्जन बेटावर जाताना जर एखादेच काव्य माझ्याबरोबर नेण्याचे बंधन जर माझ्यावर घालण्यात आले तर मी मेघदूत या  काव्याचीच निवड करेन.” असं एकदा कवी कुसुमाग्रज यांनी म्हटलं होतं. शांता शेळके यांच्यावर एम. ए. ला असताना शिकलेल्या मेघदूताचा एवढा प्रभाव होता की आपल्या पहिल्या काव्यसंग्रहाला त्यांनी वर्षा असेच नाव दिले होते. त्या कवितांवर मेघदूताचा प्रभाव खूप जास्त आहे असे त्यांनी स्वत:च सांगितले होते.

मेघदूताबद्दल कुसुमाग्रज म्हणतात- “रसिकांच्या मनाला अथपासून इतिपर्यंत मंत्रमुग्ध करण्याचे एक वेगळे भावविश्व त्यांच्यासमोर विणून त्याला उन्मनावस्थेपर्यंत पोहोचवण्याचे सामर्थ्य जितके मेघदूतात आहे तितके अन्यत्र आढळणे फार कठीण आहे. सर्व निष्ठा कायम राखून , सौंदर्य आणि निष्ठा जागी ठेवून ऐहिक सुखाचा पुरेपूर आस्वाद घेण्याच्या प्रवृत्तीतून या दीर्घ भावकाव्याचा जन्म झाला आहे. कालिदासाच्या रसिकतेचे आणि विविध प्रकारच्या सौंदर्याचा आस्वाद घेण्याच्या सामर्थ्याचे सर्वोत्कृष्ट स्वरूप या काव्यात व्यक्त झाले आहे हे सर्वांना कबूल करावेच लागेल. “

मेघदूतात प्रामुख्याने तीन गोष्टी आढळून येतात पूर्वमेघामध्ये प्रामुख्याने सृष्टीसौंदर्य आढळून येतं, पूर्वमेघ आणि उत्तरमेघ या दोन्हीमध्ये आढळणारा समान धागा म्हणजे त्यातील शृंगार आणि विरहरस. उत्तरमेघामध्ये प्रामुख्याने आढळून येतं ते म्हणजे अलकापुरी आणि कैलासपर्वतावरील एक Fantacy World. त्यामध्ये आढळणार्या सृष्टीसाौंदर्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न या लेखात केलेला आहे.

मेघदूताची मूळ कल्पना फार साधी आहे. कुबेर हा शंकराचा कोषाध्यक्ष असतो. कैलासाच्या पायथ्यावर असलेली अलकानगरी ही शंकराची राजधानी. त्या शहराच्या बाहेर असणार्या उद्यानांमध्ये शंकराचा निवास असतो. कोणा एका तरूणी मुळे कुबेराने नेमून दिलेली कामगिरी बजावण्यात यक्षाकडून कसूर झाली म्हणून कुबेर त्याला शाप देतो की ज्या पत्नीच्या आसक्तीमुळे तू कामात चुकारपणात केलास तिचाच वियोग तुला वर्षभर होवो. ऐन तारूण्यात घडलेला हा निर्वासितपणा यक्षास दुस्सह्य  वाटला आणि हा विरहकाळ व्यतीत करण्यसाठी त्याने पवित्र असे रामगिरी पर्वताचे एकांतस्थळ निवडले. तिथे विरहामध्ये आठ महिने काढल्यानंतर एक दिवस रामगिरीवर त्याला पावसाळी मेघ दिसला. त्याला पाहून यक्षास असे वाटले की ह्याला विनंती केल्यास उत्तरेकडे जाणारा मेघ पत्नीस आपले कुशल कळवील. आणि ती देखील हा विरहकाळ कसातरी घालवू शकेल.

भौगोलिकदृष्ट्या मेघदूत हा मध्यभारतातील रामगिरी पर्वत, ते हिमालयातील कैलास पर्वत असा प्रवास आहे. या वाटेमधील विविध भौगोलिक स्थळांचा उल्लेख मेघदूतामध्ये कालिदासाने केलेला आहे. मध्यभारतातील रामगिरीपासून जो मेघाचा प्रवास चालू होतो तेव्हा वाटेमध्ये त्याला मध्यभारतातील विविध वनं लागतात. या सर्व वनांचा, अरण्यांचा उल्लेख मेघदूतामध्ये आढळतो. वाटेमध्ये लागणार्या वेगवेगळ्या नद्या म्हणजे सध्या जिला बेटवा नदी म्हणतात तिचा उल्लेख मेघदूतामध्ये वेत्रवती असा आहे. एक राननदी किंवा वननदी असा उल्लेख आढळतो, विंध्य पर्वतावरून निघालेली एक नदी निर्विंध्या असा एक उल्लेख आहे. चंबळ नदीचाही उल्लेख आहे आणि चंबळ नदीला मिळणार्या सिंधू नावाच्या एका उपनदीचाही उल्लेख आहे. गंधवती नावाच्या माळव्यातील एका नदीचा उल्लेख आहे. गंभीरा नावाच्या माळव्यातील एका नदीचा उल्लेख आहे. या सर्व नद्या मुख्यत्वे मध्यभारतातील रामगिरीपासून ते हस्तिनापूर किंवा ब्रह्मावर्त भागापर्यंत वाटेत ज्या वेगवेगळ्या नद्या लागतात त्या असून त्यांचे उल्लेख इथे सापडतात. त्याखेरीज त्या वाटेमध्ये लागणारे विविध पर्वत किंवा शहरं आढळतात त्यांचेही उल्लेख आढळतात. आता रामगिरी म्हणजे रामटेक की दुसरी कुठली तरी टेकडी याविषयी काही मतमतांतरे आढळतात. पण काहीही असले तरी तो मध्य भारतातील एक पर्वत किंवा डोंगर आहे , हे निश्चित ! त्यानंतर  तिथल्याच छत्तीसगडमधील माळदा गावाचा माळ असाही एक उल्लेख आढळतो. नर्मदेचं उगमस्थान असलेल्या अमरकंटक पर्वताचा जिथं आंब्याची वनं आहेत त्याचा आम्रकूट असा उल्लेख आहे. सध्याचा छत्तीसगड हा जो भाग आहे त्याचा दशार्णव असा एक उल्लेख आहे. एका छोट्या टेकडीचा उल्लेख नीचय पर्वत असा आहे. माळव्यामध्ये असणारं दशपूर नावाचं एक गाव. ब्रह्मावर्त म्हणजे हस्तिनापूराच्या बाजूला असणारा पवित्र प्रदेश. या सर्वाचे उल्लेख मेघदूतामध्ये आढळतात. याखेरीज आढळणारा एक महत्वाचा उल्लेख म्हणजे श्रीचरणन्यास म्हणजे हरिद्वारजवळची एक टेकडी जिला आजकाल ‘हरी की पावडी’ किंवा शंकराची पायरी असं म्हटलं जातं.त्याठिकाणाचाही मेघदूतामध्ये उल्लेख आढळतो. ज्याला हंसद्वार किंवा क्रौंचरंध्र असं म्हटलं जातं त्याच्यामागची पौराणिक कथा थोडक्यात अशी आहे परशुराम हा कैलास पर्वतावर राहून शंकरापाशी धनुर्विद्या शिकत होता तेव्हा त्याने क्रौचपर्वतावर बाण मारून त्याला भोक पाडले. ह्यालाच हंसद्वार असे म्हणतात कारण याच रंध्रामधून किंवा भोकामधून हंस हे कैलासावरून मानससरोवराकडे जातात अशी आख्यायिका आहे. म्हणूनच त्याचा क्रौंचरंध्र किंवा हंसद्वार असा एक उल्लेख आहे. कालिदासाचा काळ जर इसवीसनाच्या चौथ्या पाचव्या शतकाचा धरला तर आज साधारण पंधराशे सोळाशे वर्षांनतरसुद्धा हे सर्व उल्लेख अजूनही आपल्याला सापडतात त्याअर्थी कालिदासाने स्वत: त्या भागात राहून, बर्यापैकी प्रवास करून , ते सर्व वर्णन मनात ठेऊन मग मेघदूतात चित्रित झालेलं असावं. ह्यामध्ये केवळ कविकल्पना नसून बर्याच अंशी त्यात सत्यता दिसून येते.

मेघदूतात प्राणी, पक्षी ह्यांची वर्णनं तशी कमी आहेत. हत्ती, हरीण, कमळतंतू घेऊन जाणारे राजहंस,बगळे,सारस, मोर, अशा काही थोड्याच प्राण्यांचे आणि पक्ष्यांचे उल्लेख आढळतात. मात्र वेगवेगळ्या प्रकारची झाडे आणि फुलं यांचे अतिशय सुंदर उल्लेख मेघदूतात सर्वत्र सापडतात. ही सर्व निरीक्षणंसुद्धा शास्त्रीयदृष्ट्या योग्य अशीच आहेत. उदाहरणच द्यायचे झाले तर पाऊस पडण्याच्या आधी जेव्हा मेघ दाटून येतात तेव्हा रानकेळी ज्या अगोदर सुप्तावस्थेत असतात त्या उगवायला लागतात. किंवा कदंब वृक्षाला जी फुलं येतात ती पावसाळ्याच्या सुरूवातीला यायला सुरूवात होते आणि त्यामुळे त्या झाडांवर येणारे भुंगे हे त्यांमध्ये मध नसल्यामुळे पुढे निघून जातात. असा अतिशय सुंदर उल्लेख मेघदूतात आलेला दिसतो. फक्त फुलांचाच विचार केला तर मात्र अतिशय निरनिराळ्या फुलाचे उल्लेख सापडतात. त्यात सतत आढळणार्या फुलाचा म्हणजे कुटजाचा किंवा ज्याला आपण मराठीत कुडाची फुले असे म्हणतो त्याचा आहे.ती अतिशय नाजूक, पांढरी फुलं असतात. दुर्दैवाने ते झाड फक्त कुटजारिष्ट या औषधामुळेच लोकांच्या परिचयाचे राहिले आहे. परंतु अरण्यात उगवणारा हा वृक्ष असून त्याला अतिशय नाजूक , सुंदर, पांढरी फुले येतात.अजून सतत आढळणारा एक उल्लेख म्हणजे कुंद या फुलांचा. कुंदाची खरं तर झुडुप किंवा वेल असा असतो तो आणि त्याला जाईजुईसारखी सुरेख फुलं येतात. त्याचा सतत उल्लेख मेघदूतात येतो. कदाचित जाई-जुई-मोगरा अशा सर्वच प्रकारच्या फुलांसाठी कुंद असाच उल्लेख तिथे असावा. कदंब फुलांचा उल्लेख तर सततच येतो.कोरांटी, कमळ, सोनेरी कमळंअसेही अनेक उल्लेख आढळतात. एक अतिशय दुर्मिळ असा उल्लेख आहे तो म्हणजे  लोध्र- केवळ वनांमध्ये आढळणारं असं हे झाड.  ह्या झाडालाही अतिशय सुंदर अशी पांढरी फुलं येतात. याशिवाय शिरीष वृक्षाच्या फुलांच्या झुबक्याचा उल्लेख मेघदूतात आढळतो.

मेघदूतातील अजून दोन फुलांचे उल्लेख ज्यांना फारसा असा शास्त्रीय आधार नसून काव्यमय संकेताचाच आहे आणि तो मेघदूतानेच दृढ केला आहे. हे दोन संकेत म्हणजे अशोक आणि बकुळ या फुलांचे. अशोक म्हणजे सीता अशोक. युवतीच्या डाव्या पायाच्या प्रहाराने अशोक वृक्ष फुलून येतो आणि तिच्या मुखातील मद्याने बकुळ फुलतो असा काव्यसंकेत काही संस्कृत काव्यांमध्ये आढळतो. आणि तो मेघदूतामुळेच जास्त प्रमाणात प्रसिद्ध झालेला आहे.

हे झाले मेघदूतातील निसर्गाचे वर्णन. हे शास्त्रीय आणि सौंदर्यपूर्ण आहेच पण कालिदासाच्या प्रतिभेचा सर्वोच्च परिणाम उत्तरमेघामध्ये अलकापुरीच्या काहीशा अद्भूत वर्णनात आहे. ते साकार करायला वॉल्ट डिस्नेसारखी प्रतिभा हवी.

अन्वय

( एक रसिक)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*