वरुण

वरुण

डॉ. विवेक भट

ऋग्वेदातील देवतांमध्ये वरूण हा अत्यंत महत्त्वाचा देव आहे. खरे तर वेदिक देवतांमध्ये इन्द्राचे महत्त्व प्रस्थापित होण्याआधी वरूण हाच सार्वभौम देव होता आणि त्याचे मूळ वेदपूर्व काळापर्यंत गेलेले दिसते. पृथ्वीवर जीवांची उत्पत्ति होण्यापासून तो अस्तित्वात होता म्हणून त्याला ‘अज’ असेच म्हटले जात होते. विश्वाची निर्मिति झाल्यानंतर तो वेदद्रष्ट्या ऋषींच्या जाणीवेच्या स्वरूपात आला एवढेच. केवळ संख्येच्या दृष्टीने पाहिल्यास ऋग्वेदात इन्द्र, अग्नि, सोम यांच्या खालोखाल वरुणाची स्तुति सांगणारे सूक्ते येतात. वरुणाची एकट्याची स्तुति सांगणारी 46 सूक्ते आहेत; ती विशेषेकरून ऋग्वेदाच्या काही अति प्राचीन मण्डलांमध्ये आली आहेत. ती पाहिल्यास असे दिसते की ऋग्वेदाच्या सुरूवातीच्या काळी वरुण हा अतिशय गुणवान् आणि सामर्थ्यवान् देव मानला गेला होता. त्याच्याकडे मोठ्या विस्मयाने आणि भक्तिभावाने पाहिले जात होते. त्या काळात त्याचे वर्णन खालीलप्रमाणे केले जात होते:

“वरुण हा विश्वाचा सम्राट् आहे, तो देवराज तर आहेच (ऋ 7.87.6). तो आकाशाचा स्वामी असून त्याची व्याप्ति तिन्ही लोकांत आहे. आदित्यांमध्ये म्हणजे सौरदेवतांमध्ये तो सर्वश्रेष्ठ आहे. सहस्रावधि ओषधींचा तो धनी आहे. तो सहस्राक्ष तसेच ‘उरुचक्षस’ असल्यामुळे त्याची दृष्टि सर्वत्र असते. तो ‘जगत् चक्षु’ आहे (ऋ. 1.25.5). तो सर्वव्यापी आणि सर्वसाक्षी आहे. विश्वाचे नियामक जे ‘ऋत’ अर्थात् ‘न्याय, नीतिनियम, आणि सत्य’ त्याची प्रतिष्ठापना करणारा तो सद्गुणांचा उद्धाता आणि सर्वजगताचा पालक आहे (ऋ. 7.83.9). तो ‘धर्माणाम् पति’ आहे. मानवजातीच्या नियतीचे नियंत्रण तो करतो. नीतिनियमांना उल्लंघून जाणार्‍यांना, किवा अगदी शपथ मोडणार्‍यांनासुद्धा क्रोधाविष्ट होऊन तो शासन करतो. मात्र कठोर शास्ता असला तरी आपल्या चुकीबद्दल पश्चात्ताप व्यक्त करून क्षमा मागणार्‍यांना क्षमा करणारा तो उदारमनाही आहे. सगळे काही वरुणाच्या आधिपत्याखाली असते, त्यालाच सगळ्याची माहिती असते, त्याचे ज्ञान अपार आहे” (‘असुर: विश्ववेद:’ ऋ. 8.42.1). त्याच्याकडे ‘माया’ ही जादुई शक्ति आहे.

वरुणाला ‘असुर’ किंवा ‘असुर: महत्’ म्हटले आहे. ‘असुर’ या शब्दाचा अर्थ ‘असून् रक्षति इति’ असा करतात. ‘तो श्वासांचे, पर्यायाने आयुष्याचे रक्षण करतो’ अशा अर्थाने त्याला असुर म्हटले असेल. म्ह्णून ‘सुखी आणि दीर्घ आयुष्यासाठी (म्हणजे शंभर शरद ऋतूंपर्यंत) वरुणाची प्रार्थना केली जात असे (ऋ. 2.27.10). वरुण स्वत:ही म्हणतो की “अहं राजा वरुणो मह्यम् तानि असुर्यानि प्रथमा धारयन्त” (ऋ. 4.42.2) अर्थात् “मी राजा वरुण आहे. मला त्या पहिल्या उत्तम अशा स्वर्गीय दैवी शक्ती दिल्या गेल्या आहेत”.

इतक्या सर्व सद्गुणांचे आणि सार्वभौमत्वाचे श्रेय कोणत्याही अन्य देवतेला त्या काळात तरी दिले गेलेले दिसत नाही. अन्य सर्व देवतांची स्तुति गाणारी सूक्ते धन, आणि सामर्थ्य यांची कांक्षा करताना दिसतात, तर वरुणाची स्तुति सांगणारी सूक्ते आत्मशुद्धि, क्षमा, पापांपासून मुक्ति, आणि पुन्हा पुन्हा आपल्याकडून काही प्रमाद घडू नयेत अशी शक्ति यांची याचना करतात. 

सातव्या मण्डलातील वरूणाचे वर्णन करणारी एक ऋक् उदाहरणादाखल पाहू.  

उ॒त स्वया॑ त॒न्वा॒३ सं व॑दे॒ तत्क॒दा न्व१न्तर्वरु॑णे भुवानि ।

किं मे॑ ह॒व्यमहृ॑णानो जुषेत क॒दा मृ॑ळी॒कं सु॒मना॑ अ॒भि ख्य॑म् ॥ (7.86.2)

(भावार्थ: मी माझ्या स्वत:च्याच मनाशी संवाद साधतो आहे की मी वरुणाशी कधी आणि कसा एकरूप होऊ शकेन. न रागावता तो कोणते हव्य माझ्याकडून स्वीकार करील? त्या उदारमनाचे शांत दर्शन मला कधी होईल?)

मूलत: वरुणाचा संबंध आकाशाशी आणि अवकाशाशीही मानला गेला असला तरी जलतत्त्वाचा स्वामी म्हणून विशेषत्वाने सागर, नद्या, सरोवरे यांच्याशी आणि सामान्यपणे कोणत्याही जलांशी त्याचा संबंध जोडला गेला आहे. त्याला ‘सिन्धुपति’ आणि ‘अम्बुराज’ म्हटले आहे. त्याचे वास्तव्य जललोकात असून मगर हे त्याचे वाहन आहे आणि हिरण्यपक्ष म्हणजे सोनेरी पंख असणारा पक्षी हा त्याचा दूत आहे. कधी तो सात राजहंसांनी ओढलेल्या रथात बसून जातो, आणि त्याच्या शिरावर छत्र आहे असेही म्हटले आहे. पाश हे त्याचे शस्त्र आहे, त्याशिवाय त्याच्या हातात कमळ, शंख आणि रत्नकुंभ आहे. तो पश्चिम दिशेचा दिक्पाल आहे.  

वरुणाचा पिता कश्यप. ‘वरुण’ या शब्दाची व्युत्पत्ति ‘वृ’ या धातूच्या व्यापणे/वेढणे/आवरण घालणे अशा अर्थावरून करता येते कारण वरुणाचा संबंध जगताला आवरण घालणार्‍या आकाशाशी आहे तसाच वेढून टाकणार्‍या सागराशीसुद्धा आहे. तसेच व्युत्पत्ति ‘वृ’ या धातूच्या नियमनात ठेवणे अशा अर्थावरूनसुद्धा करता येते, कारण तो पाण्याच्या सर्व स्रोतांनाच नव्हे तर सर्वच चराचराला ऋताने नियमनात ठेवतो. ऋग्वेदात वरुणाचे वर्णन करताना म्हटले आहे की तो नीलवर्णी असून अतिशय तेजस्वी आहे, जणू त्याच्या मुखावर अग्नीचे आणि नेत्रात सूर्याचे तेज आहे. तो ‘सुपाणि’ (सुंदर, मुलायम हात असणारा) आहे. त्याच्या हातात ‘पाश’ असला तरी कमळेही आहेत. त्याचा वेशसुद्धा अतिशय तेजस्वी आहे. घोड्यांनी ओढलेला त्याचा रथ सोनेरी असून सूर्यकिरणांसारखा चमकत असतो (ऋ. 1.122.15). स्वर्गातील त्याच्या भव्य सुवर्णप्रासादात सहस्रावधि खांब आहेत आणि सहस्र दालने आहेत. त्याच्या सुवर्णसिंहासनावर बसून तो सम्राट् त्याच्या साम्राज्यावर तसेच सर्व मानवांच्या आणि देवांच्याही कृत्यांवर नजर ठेवून असतो (ऋ. 1.22.11-12).

ऋग्वेदकाळानंतर वरुणाचे महत्त्व काहीसे कमी होत गेले. इन्द्राने वृत्राचा वध करून कोंडून ठेवलेल्या जलांची मुक्तता केली आणि विश्वाला एक निश्चित आकारबंध दिला तेव्हापासून सार्वभौमत्व वरुणाकडून इन्द्राकडे गेले. वरुणाचे देवतासमूहामधील स्थान तसे अबाधित राहिले. मात्र जलांचे स्वामित्व तेवढे वरुणाकडे राहिले.

द्वंद्वदेवता या स्वरूपात वरूणाचे महत्त्व:

इन्द्र, आप यांच्यासह द्वंद्वदेवता म्हणून वरुणाचा उल्लेख येतो. त्यातही मित्र आणि वरुण हे द्वंद्वदेवता म्हणून विशेष प्रसिद्ध आहेत. (‘मित्रावरुणौ’ ऐवजी ‘मित्रावरुणा’ हे द्विवचनाचे वेदातील प्राचीन रूप लक्षणीय आहे). मित्रावरुणा ही एक विलक्षण द्वंद्वदेवता म्हणावी लागेल. त्या दोघांचा उल्लेख असुर म्हणूनही केला गेला आहे (ऋ. 5.63.3) आणि देवता म्हणूनही केला गेला आहे (ऋ. 7.60.12). ऋ. 5.70 मध्ये तर त्यांना ‘रुद्र’ हे अभिधान दिले आहे. त्या दोघांचे कार्य वेगवेगळे असले तरी एकमेकांना पूरक असे आहे. असे मानले जाते की मित्राची अधिसत्ता समुद्राच्या खोलवरच्या भागात तर वरुणाची सत्ता समुद्राच्या वरच्या आणि तटवर्ती भागात आहे. मित्रामुळे दिवस तर वरुणामुळे रात्र होते. साधारणपणे या देवतायुगलापैकी मित्र हा माणसामाणसांमधील संबंध आणि न्यायव्यवस्था यांच्याकडे लक्ष पुरवितो तर वरुण हा देव-मानव संबंध अशा काहीशा गूढ आणि अमूर्त संकल्पनांचे प्रतिनिधित्व करतो.  

पुरातन युरोभारतीय संस्कृतीशी वरुणाचा संबंध:

इराणमधील ज̣रथुष्ट्रानुयायांचा प्रमुख देव अहुर मज़्दा याच्याशी असुर वरुणाचे नामसाम्य तर आहेच, शिवाय वरुणाचे व्यक्तिमत्त्व अहुर मज़्दा याच्याशी काहीसे समांतर असे आहे. 

युफ्रेटिस नदीच्या काठावरील मेसापोटेमियामध्ये अति प्राचीन काळी (सुमारे ख्रिस्तपूर्व 5000 ते 300 वर्षे) उदयाला आलेल्या सुमेरियन संस्कृतीचे काही अवशेष, विशेषत: मातीच्या भाजलेल्या लहान लहान विटांवर लिहीलेले लेखी स्वरूपात सापडले आहेत. मितानी वंशाच्या दोन राजांच्यामधील तहाचे वर्णन त्यात आहे आणि ते लेख मित्र आणि वरुण या देवतांच्या नांवाने शपथेवर लिहीले गेल्याचा उल्लेख आहे. म्हणजे वेदिक संस्कृतीची नाळ अतिप्राचीन अशा युरोभारतीय संस्कृतीशी जुळलेली होती याचा हा पुरावा आहे. (ते लेख क्युनिफॉर्म म्हणजे कोनाकोनांच्या लिपीमध्ये असल्यामुळे स्वत:ला वाचता आले नाहीत, तरी तुर्कस्तानमधील अंकारा येथील म्युझियममध्ये ते प्रत्यक्ष पाहण्याचे भाग्य प्रस्तुत लेखकाला लाभले आहे).

डॉ. विवेक भट

(Tel. 9870193649)

bhatvivekm@yahoo.co.in

संदर्भसूचि

ऋग्वेदातील, विशेषत: सातव्या मण्डलातील, वरुण सूक्ते

https://en.wikipedia.org/wiki/Varuna
https://archive.org/details/godvarunainrigve00gris/page/12/mode/2up
https://www.hinduwebsite.com/sacredscripts/hinduism/rigveda/varuna_1.asp
https://www.britannica.com/topic/Varuna
https://sreenivasaraos.com/tag/varuna-in-rig-veda/
https://www.asabharwal.com/varuna-the-elder-god/
https://m.bharatdiscovery.org/india/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3_%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%BE
https://www.punjabkesari.in/dharm/news/the-lord-of-magical-powers-god-varuna-608586
https://hi.unionpedia.org/i/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3_(%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5)
https://hi.wiktionary.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*