सोम

सोम

डॉ. विवेक भट

ऋग्वेदात सूक्तसंख्येच्या निकषावर पाहिल्यास इन्द्र आणि अग्नि यांच्या खालोखाल सोम या देवतेला महत्त्व देण्यात आले आहे. इन्द्र, अग्नि, रुद्र इत्यादि देवतांसह द्वन्द्व देवता म्हणूनही त्याचे स्तवन केले जाते. इन्द्राशी सोमाचा विशेष घनिष्ठ संबंध आहे आणि इन्द्राच्या वृत्रहनन इत्यादि वीरकृत्यांमध्ये त्याचा महत्त्वाचा वाटा आहे. सोमाविषयी एकंदर सुमारे 120 सूक्ते आहेत. आठव्या मण्डलाचा काही भाग आणि संपूर्ण नववे मण्डल अर्थात् सोममण्डल (114 सूक्ते) सोमाला वाहिलेले आहे. हे सूक्त सोमपवमानास उद्देशून आहे (सोम पावन करतो म्हणून सोमपवमान) आहे. सोम हा देवही आहे आणि यज्ञात आहुति देण्याचे एक अत्यावश्यक हव्यही आहे.

सोम हे देवांना अर्पण करायचे पेय आहे, तसेच ते ज्या वनस्पतीपासून पिळून काढलेल्या रसापासून बनवायचे आहे त्या वनस्पतीचे नांवही आहे. ‘सु’ (अभिषवे) या धातूपासून ‘सोम’ या शब्दाची व्युत्पत्ति सांगता येते. सोमरस तयार करण्याची कृति वैदिक वाङ्मयात सविस्तर सांगितल्याचे दिसत असले तरी वास्तवात मात्र ती कृति हे एक गुपित असे आणि ती कृति काही ठरविक पुरोहितांनाच माहीत असे. सोमरस तयार करणे हा एक मोठा पवित्र, धार्मिक उपचार होता. सोमवल्लीचे ताजे लांबलांब पर्णविहीन धांडे आधी पाण्यात भिजवून मग कातड्यावर ठेवून ठराविक दगडाने ठेचून रस काढायचा. त्या दगडाचे महत्त्व असे की ऋग्वेदाचे एक सूक्त 10.94 त्यालाच वाहिलेले आहे. (यास्काच्या निरुक्तानुसार त्या दगडालाही देवत्वाचा अंश दिला गेला आहे). तो रस मेंढीच्या लोकरीतून गाळून घेऊन भांड्यात ठेवायचा. मग तो रस नुसताच अगर दूध, दही, तूप, मध, किंवा अन्य काही द्रव्यांबरोबर मिसळून देवांसाठी आहुति म्हणून यज्ञामध्ये अर्पण करायचा. ही इतर द्रव्ये त्याची झळाळणारी वस्त्रे होत अशी कल्पना केली गेली आहे. देवांना तसेच यज्ञकर्त्या पुरोहितांना आणि यजमानाला सोम पिण्याचा अधिकार आहे. तो कोणालाही दारु सारखा पिण्यास मिळत नाही. ‘सोमपा’ म्हणजे कोणीही सोम पिणारा नव्हे, तर ज्याला सोम पिण्याचा अधिकार आहे असा. ऋग्वेदात इतरही क्रियाकर्मे करण्यासाठीचे मंत्र सांगितलेले असले  तरी त्यात सोमयाग हे अतिशय महत्त्वाचे कर्म आहे. तो याग करतेवेळी सोमरस काढण्याची ही कृति सकाळी, दुपारी, आणि संध्याकाळी अशी दिवसातून तीन वेळा करायची आहे आणि तसाच तीन वेळा तो अर्पणही करायचा आहे. सोमरस काढतेवेळी आणि गाळतेवेळी नवव्या मण्डलातील मंत्रांचे उच्चारण करायचे आहे.  

सोमयाग (आणि अर्थातच सोमपान) हे देवांसाठी आणि यज्ञकर्त्या पुरुषांसाठी महत्त्वाचे क्रियाकर्म आहे. परंपरेनुसार स्त्रियांना आणि स्त्री देवतांनाही सोमपानाचा अधिकार नाही. सोमपानानंतर देव जी कृत्ये करू शकत ती सर्व सोमालाच अर्पण करून त्याचे देवत्व निर्माण केले गेले. मात्र सोमवल्ली आणि सोमरस डोळ्यांसमोर असल्यामुळे देव असे मूर्त रूप त्याला देणे कठीण होते म्हणून ते काहीसे अस्पष्टच राहिले. तरी त्याचा वर्ण बभ्रु, किंवा अरुण आणि तोही झळाळता आहे, तो स्वर्गीय रथातून येतो, कधी इन्द्रासह त्याच्याच रथातून येतो, हातात तो धनुष्य, किंवा सहस्रधारा असणारा दण्ड अशी भयंकर तीक्ष्ण शस्त्रे धारण करतो इत्यादि प्रकारे त्याचे वर्णन सांगितले आहे.

सोमयागात इन्द्र अत्यंत महत्त्वाचा देव आणि त्यामुळे ऋग्वेदातही तोच सर्वांपेक्षा महत्त्वाचा ठरला. सोमपानातही सर्वाधिक सहभाग इन्द्राचा आहे. सोमपानानेच इन्द्राला अधिकाधिक सामर्थ्य प्राप्त होते आणि त्याला वीरकृत्ये करण्याची स्फूर्ति आणि शक्ति मिळते. तीन तलावभर सोम पिऊन (ऋ. 5.29.7) मग इन्द्राने आवेशाने वृत्रावर हल्ला चढविला आणि वज्राने त्याचा नाश केला. वृत्राने अडकवून ठेवलेल्या गायी सोडविल्या. वास्तविक ढगांमध्ये अडकून राहिलेल्या जलांना इन्द्राने आपल्या वीजरूपी आयुधाच्या साहाय्याने मुक्त केले आणि सृष्टीतील जीवन समृद्ध केले त्याचेच हे रूपक आहे असे मानले जाते. 

सोमयागात सहभागी असणारे पुरोहित आणि यजमानही सोमपान करत असतात त्यामुळे त्यांनाही सोमपानाचे फायदे मिळतात. ज्ञान, सुखशांति, समृद्धि मिळते; सर्वोच्च आनंदाचा लाभ होतो. सोमयाग करणारे खर्‍या अर्थाने आर्य ठरतात, देवांच्या काही शक्ती त्यांना मिळतात, त्यांना इन्द्राचे साहाय्य मिळते, त्यामुळे अनार्यांचे पारिपत्य करण्याचे सामर्थ्य त्यांना प्राप्त होते. सोम म्हणजे अमृत अशी संकल्पना आहे. तेव्हा सोमपान करणार्‍यांना दीर्घ आणि निरामय आयुष्य  मिळते; त्यांना आग, विष, किंवा शस्त्राघात यांच्यापासून भय नाही; त्यांना नवचैतन्य मिळते आणि अकालमृत्यु येत नाही. ऋग्वेद 8.48.3 मध्ये पुरोहित असे म्हणतात की, “सोम पिऊन आम्ही अमर झालो आहोत, आम्ही प्रकाशाप्रति पोहोंचलो आहोत, देवांप्रति पोहोंचलो आहोत. आता कोणताही शत्रु द्वेषाने आम्हाला इजा कशी पोहोंचवू शकेल?”.

सोम सर्वज्ञ आहे, वाचस्पति आहे, त्याबरोबर तो योद्धाही आहे, सर्व संकटांवर मात करून युद्धात तो विजय प्राप्त करतो आणि विजय झाल्यानंतर तो त्याच्या अनुयायांना मोठ्या उदारपणे धन-समृद्धि देतो. पवमान मंत्रामध्ये असे म्हटले आहे की लोकरीतून ग़ाळला गेलेला सोम हे त्याने शत्रूंवर केलेल्या हल्ल्याचे प्रतीक आहे.

ऋग्वेदाने सोमाचे सूर्याशी निकटचे नाते मानले आहे. सोमामुळेच सूर्याला तेज प्राप्त होते, आणि त्याच्या रथाच्या घोड्यांना पोषण मिळते (9.63.7/8). ऋग्वेदाच्या उत्तरकाळात सोमाचे आणि चंद्राचेही साहचर्य सांगितले आहे. सोम हे स्वत: चंद्राचे एक नांवही आहे. असे म्हणतात की सोम मिळाला म्हणजे चंद्राच्या कला वाढतात आणि मिळाला नाही की त्या क्षीण होतात.

ऋग्वेदानुसार सोमवल्ली मुळात पर्वतावर वाढत असे. त्या वल्लीभोवती एक किल्ला होता आणि  त्या किल्ल्याच्या सभोवती एकामागोमाग अशा शंभर संरक्षक भिंतींचा तट होता. शिवाय एक धनुर्धारीही तिथे राखणीला होता. मनूने यज्ञात इन्द्राला सोम अर्पण करायचे ठरविले तेव्हा स्वर्गातून सोम घेऊन येण्यासाठी त्याने गरुडाला पाठविले होते.  

सोमवल्ली ही नक्की कोणती वनस्पति होती हे ठरविणे अतिशय कठीण आहे. वेगवेगळ्या अभ्यासकांनी त्याविषयी वेगवेगळी मते मांडली आहेत. ऋग्वेदातील सोमाच्या ‘जागृवी’ (सदा जागृत) अशा वर्णनावरून असे दिसते की सोमरस हे काहीतरी उत्तेजक द्रव्य होते. सोमाचे प्रकाशाशी असलेले नाते आणि सोमप्राशनानंतर दृश्यमान होणार्‍या विविध भासांमुळे अशीही शक्यता वाटते की कदाचित ते काहीतरी भ्रम निर्माण करणारे मादक रासायनिक द्रव्य असावे. काही अभ्यासकांच्या मते सोमवल्ली ही वनस्पति नसून बुरशीसारखा काहीतरी प्रकार असावा. परंतु सोमाचे लांब धांडे आणि निष्पर्णता असे वर्णन असल्यामुळे काहींची कल्पना अशी आहे की सोमवल्ली हा एक अळंबीचा प्रकार असावा आणि त्यात मनोवैज्ञानिक परिणाम घडवून आणणारे काही गुणधर्म असावेत.

ऋग्वेदात सोमवल्ली पर्वतावर वाढत असे असे निश्चितपणे म्हटले आहे, त्या वल्लीला ‘अंशु’ असा एक पर्यायी शब्दही दिला आहे. मात्र सोम मिळणे/मिळविणे फार दुष्कर होते. एक शक्यता अशी आहे की सोमवल्ली ही पृथ्वीच्या अतिउत्तरेकडील प्रदेशात पर्वतांवर उगवत असावी आणि आर्य जसजसे मध्यआशियामार्गे भारतीय उपखंडाकडे सरकले तसतशी सोमवल्ली त्यांना मिळेनाशी झाली. कदाचित् भारतखण्डाच्या उत्तरेकडील म्हणजे हिमालयाच्या पर्वतीय प्रदेशातसुद्धा ही वल्ली मिळत असेल. परंतु एकतर तो प्रदेश त्या काळात अनार्यांच्या ताब्यात असेल आणि कर्मकांडांमुळे जसजशी सोमाची आवश्यकता वाढली तसतशी सोमवल्ली मिळणे कठीण होत गेले असेल. त्यामुळे उत्तर वेदिक काळात सोमयागासाठी इतरही काही वनस्पतींचा वापर केला जाऊ लागला असावा. अंतत: सोम हा वनस्पतीचा रस/अर्क असे म्हटले असल्याने मंत्रपठणाला अथवा सोमयागासारखे यज्ञकर्म करण्यात त्यामुळे अडचण येत नसे.

एकंदरीत पाहतांना सोमरस काढण्याची कृति हे जसे एक गुपित तसेच सोमवल्लीची निश्चित ओळख हेही गुपितच म्हणावे लागेल.     

पुरातन युरोभारतीय संस्कृतीशी सोमाचा संबंध:

ऋग्वेदातील सोम आणि इराणमधील जरथुष्ट्रानुयायांचा धर्मग्रंथ अवेस्ता यामधील हौम (haoma) यांच्यात साम्य निश्चितपणे आहे. सोमवल्ली आणि त्यापासून रस काढण्याची कृति दोन्ही ठिकाणी सविस्तर सांगितली आहे. दोन्हींकडे सोमाचा उल्लेख सुखसमृद्धि तसेच अमरत्व आणि दैवी शक्ती देणारे पेय म्हणून केला गेला आहे. दोन्ही ठिकाणी सोमाचा/ हौमाचा यजनाशी घनिष्ठ संबंध सांगितला आहे. अशा तर्‍हेने प्राचीन भारतीय आणि इराणी परंपरेतले साम्य तर दिसतेच परंतु आणखी मागील काळात पाहूं गेल्यास प्राचीन युरोभारतीय परंपरेपर्यंतसुद्धा ही वीण नेता येते.

सोम हा ‘अमृत’ आहे आणि प्राचीन युरोभारतीय परंपरेतील ‘अ‍ॅम्ब्रौशिया’ (ambrosia) म्हणजे ‘अमृत’ या अर्थाच्या ग्रीक शब्दाशी त्याचे व्युत्पत्तिवाचक साम्य जुळते. एवढेच नव्हे तर सोमाला ‘मधु’ म्हणजे ‘मध’ या अर्थाचेही एक नांव आहे हे लक्षात घेता, युरोपीय परंपरेमधील ‘मीड’ या पेयाशीही सोमाचा संबंध असलेला दिसतो. पूर्वी युरोपात ‘मीड’ हे पेय स्वत: पिण्याची आणि सहकार्‍यांना देऊ करण्याची प्रथा होती. ‘मीड’ हे मध आंबवून केलेले पेय आहे. त्यात लवंग, आले आणि इतरही मसाले घातले जातात आणि त्यात औषधी गुणधर्म असतात अशी समजूत आहे]. मुळात ‘मीड’ ह्या शब्दाची व्युत्पत्ति ‘औषधी पेय’ अशा अर्थाच्या लॅटिन मधील शब्दावरून दिली जाते. यावरून सोमाचे एका अतिप्राचीन अशा युरोभारतीय भाषक समाजाशी आणि मिथकपरंपरेशीसुद्धा नाते दाखवता येईल.

डॉ. विवेक भट

(Tel. 9870193649)

bhatvivekm@yahoo.co.in

संदर्भसूचि

ऋग्वेदातील, विशेषत: नवव्या मण्डलातील, काही सूक्ते  

https://www.encyclopedia.com/philosophy-and-religion/eastern-religions/hinduism/soma (Imp.)

https://www.sacred-texts.com/hin/rigveda/rv08048.htm
https://www.dailyo.in/arts/book-vedas-alcohol-wine-mahua-india-drinking-spirit/story/1/19931.html
https://2-0-1-2.livejournal.com/211027.html
https://www.jstor.org/stable/600096
https://www.britannica.com/topic/soma-Hinduism
https://indianexpress.com/article/opinion/columns/the-land-of-soma-plant-rig-veda-avesta-zoroastrianism-4855135/

https://www.hinduwebsite.com/sacredscripts/rig_veda_book_9.asp (complete translation of book 9 of Rig Veda)

http://hindumantavya.blogspot.com/2017/02/rigved-mandal-9.html (complete book 9 of Rig Veda)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*