उपमा कालिदासस्य – एक अभ्यास

अजय पेंडसे

सारांश

इसवी सनाच्या चौथ्या शतकात होऊन गेलेल्या संस्कृत कवी कालिदासाने जागतिक वाङ्मयात अढळ स्थान पटकावले आहे. कविकुलगुरु कालिदास हा उपमा अलंकाराच्या योजनेसाठी विशेष प्रसिद्ध आहे. प्रस्तुत लेखाद्वारे कालिदासाच्या उपमांचे विविध पैलू सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

प्रस्तावना

‘कविकुलगुरु’ अशी यथार्थ पदवी मिरवणार्‍या कालिदासाने केवळ संस्कृत ललित साहित्यातच नव्हे तर जागतिक वाङ्मयामध्येही मानाचे स्थान संपादन केले आहे.  मालविकाग्निमित्र, विक्रमोर्वशीय, अभिज्ञानशाकुन्तल ही तीन नाटके, मेघदूत आणि ऋतुसंहार ही दोन खंडकाव्ये तसेच रघुवंश आणि कुमारसंभव ही दोन महाकाव्ये अश्या सात कलाकृती कालिदासाच्या नावावर आहेत. वा. वि. मिराशी यांच्या मते, कालिदास हा इसवी सनाच्या चौथ्या शतकाच्या शेवटी होऊन गेला असावा.

कालिदासाच्या बाबतीत एक श्लोक प्रसिद्ध आहे –

उपमा कालिदासस्य भारवेर्थगौरवम्‍ ।

दण्डिनः पदलालित्यं माघे सन्ति त्रयो गुणाः ।।

यात कालिदास हा उपमा अलंकाराच्या वापरासाठी प्रसिद्ध असल्याचे म्हटले आहे. प्रस्तुत लेखाद्वारे कालिदासाच्या उपमांचे विविध पैलू सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मला याची कल्पना आहे की, कालिदासाच्या साहित्यात अनेक उपमा आल्या आहेत. त्या सर्वांचा येथे निर्देश करणे अशक्य आहे. म्हणून त्याच्या कलाकृतीतील महत्त्वपूर्ण, प्रसिद्ध अश्या उपमांचा निर्देश येथे केला आहे. प्रस्तुत लेख हा पाच भागांत विभागलेला आहे –

  • अलंकार – एक संकल्पना
  • कालिदासाने केलेला अलंकाराचा वापर
  • उपमा अलंकार – व्याख्या
  • कालिदासीय उपमांचे विशेष
  • निष्कर्ष

अलंकार – एक संकल्पना

’अलंकार’ हा शब्द दागिना या अर्थी मोठ्या प्रमाणावर मराठी तसेच संस्कृतात वापरला जातो. दागिन्यांचा योग्य वापर मनुष्याचे सौंदर्य वाढवतो. हीच गोष्ट साहित्यनिर्मितीतही तितकीच खरी आहे. अनेक अलंकार आपल्याला तेथे दिसतात. अर्थात दोन्ही अलंकाराच्या निर्मितीत फरक असला तरी देखील दोघांच्या वापराचे कारण एकच आहे – सौंदर्यवृद्धी.

            ‘अलंकार’ हा शब्द संस्कृतमधील ‘अलं + कृ’ या धातूपासून आला आहे. या धातूचा अर्थ सजवणे असा आहे.  अमरकोषात ’अलम्‍’ या शब्दाचे तीन अर्थ दिले आहेत – ’अलं भूषणपर्याप्तिशक्तिवारणवाचकम्‍ ।’ अलंकारांचे अनेक प्रकार वेगवेगळ्या काव्यशास्त्रज्ञांनी सांगितले आहेत. मम्मट नावाच्या काव्यशास्त्रज्ञाने ६१ अलंकार त्याच्या काव्यप्रकाश या ग्रंथात सांगितले आहेत.

कालिदासाने केलेला अलंकाराचा वापर

अलंकाराचे शब्दालंकार, अर्थालंकार, शब्दार्थालंकार असे तीन भेद आहेत. यमक, अनुप्रास इत्यादी शब्दालंकार आहेत. श्लेष हा शब्दालंकार कालिदासाच्या साहित्यात क्वचित ठिकाणी दिसतो. अर्थालंकाराचे स्वभावोक्ति, वक्रोक्ति असे दोन भेद पडतात. स्वभावोक्तीत कवीने पाहिलेल्या किंवा कल्पिलेल्या पदार्थांचे अगर व्यक्तिचे अगदी हुबेहुब पण रम्य असे चित्र काढावयाचे असते. वक्रोक्तित त्याच्या अंगावर आपल्या कल्पनाशक्तीने निर्मिलेले अलंकार घालून त्यांना सजवायचे असते. या दोन्ही प्रकारात कालिदासाचे अप्रतिम नैपुण्य दिसून येते. त्याच्या ग्रंथात अनेक प्राण्यांची व व्यक्तिंची चित्रे अगदी मोजक्या शब्दात पण यथातथ्य काढलेली असतात. शाकुन्तलातील सारथ्याने लगाम सोडल्यावर दौडणारे घोडे, त्याच्यापुढे स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी पळणारे मृग, कन्यावियोगप्रसंगी शोकविव्हल झालेला कण्व, रघुवंशातील पित्यासमोर दाईचा हात धरून येणारा लहानगा रघु इत्यादिकांच्या शब्दचित्रावरून कालिदासाची सूक्ष्म निरीक्षण शक्ती आणि वर्णनकौशल्यही प्रत्ययास येते.

पण स्वभावोक्तीपेक्षा वक्रोक्तिमूलक उपमा, उत्प्रेक्षा, दृष्टान्त आदि अलंकारांत कवीच्या तरल कल्पनेचा रम्य विलास दृष्टीस पदतो. त्यातच पृथ्वीपासून आकाशापर्यंत सर्वत्र स्वैर फिरणारी व सामान्यजनांना नीरस व ओबडधोबड वाटणार्‍या पदार्थातही सौंदर्य पाहणारी त्याची भेदक दृष्टी, विविध शास्त्रांच्या व्यासंगाने आलेली बहुश्रुतता, अनेक कलांच्या प्रयोगाने प्राप्त झालेले नैपुण्य, व्यवहारात मिळालेले अनुभव यांचे स्वच्छ प्रतिबिंब पडलेले दिसते.

उपमा अलंकार – व्याख्या

कुवलयानंद या अप्पय्य दीक्षिताने लिहिलेल्या ग्रंथात उपमा अलंकाराची व्याख्या आली आहे. ती पुढीलप्रमाणे –

उपमा यत्र सादृश्यलक्ष्मीरुल्लसति द्वयोः ।

हंसीव कृष्ण ते कीर्तिस्स्वर्गङ्गामवगाहते ॥

अर्थ – ज्या ठिकाणी दोन वस्तूंमधील सादृश्य, सादृश्यातील सौंदर्य खुलून दिसते, त्याठिकाणी उपमा अलंकार होतो. उदा. हे कृष्णा, तुझी कीर्ती एखाद्या हंसीप्रमाणे स्वर्गङ्गेमध्ये अवगाहन करते.

कालिदासीय उपमांचे विशेष –

  • रम्यता –

कालिदासीय उमपांचा प्रथमच नजरेत भरणारा विशेष म्हणजे त्या उपमांमधील रम्यता, त्यांमधील सौंदर्य होय. सामान्य जनांच्या चर्मचक्षूंना न दिसणारे वस्तूचे सौंदर्य कालिदासाच्या मनःचक्षुंपुढे लपत नाही. मेघदूतात कालिदास म्हणतो,

रेवां द्रक्ष्यस्युपलविषमां विन्ध्यपादे विशीर्णाम्‍ ।

भक्तिच्छेदैरिव विरचितां भूतिमङ्गे गजस्य ॥

कालिदासाच्या उपमा कोठेही श्लेषमूलक नाहीत. त्या सहजरम्य साम्यावर बसविलेल्या असतात. याच्या उलट बाण, सुबन्धु, श्रीहर्ष या कवींनी आपल्या उपमा श्लेषाधिष्ठित केल्यामुळे त्या कत्रिम वाटतात. उदाहरणार्थ – सा (कादम्बरी) जानकीव पीतरक्तेभ्यो रजनिचरेभ्य इव चम्पकाशोकेभ्यो बिभेति । ही बाण कवीच्या कादंबरीतील उपमा. यात भाषाप्रभुत्व नक्कीच आहे परंतु यात कालिदासाच्या उपमेत असते तशी सहृदयता नाही.

  • समर्पकता –

यथार्थता हा कालिदासीय उपमांचा आनखी एक विशेष आहे. अभिज्ञानशाकुन्तलात शार्ङ्गरव आदि तपस्विजनांबरोबर आलेल्या शकुन्तलेला पाहून ‘मध्ये तपोधनानां किसलयमिव पाण्डुपत्राणाम्’ अशी अत्यंत समर्पक उपमा राजाने योजिली आहे. शकुन्तला तपोवनात सर्व तपस्व्यांच्या मध्ये राहात आहे. ते सर्व तपस्वी कठोर तपश्चर्या करणारे आहेत. कठोर तपश्चर्येमुळे त्यांचे शरीर राकट झाले आहे आणि या सर्वांमध्ये वावरते आहे ती अत्यंत कोमल, तन्वाङ्गी शकुन्तला. किसलयमिव पाण्डुपुत्राणाम्‍ ही उपमा वापरून कालिदासाने शकुन्तलेचे खुलणारे मुग्ध तारुण्य सूचित केले आहे. मेघदूतात कालिदास स्त्रियांच्या हृदयाला कुसुमाची उपमा देतो. ‘श्रुतेरिवार्थं स्मृतिरन्वगच्छत्‍ ।’ अशी उपमा कालिदासाने कामधेनुच्या मागून जाणार्‍या दिलीपाला दिली आहे.

  • विविधता –

कालिदासाच्या उपमांचा साकल्याने विचार करतांना त्यांच्या विविधतेने मन आश्चर्यचकित होते. त्यांचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे करता येईल –

  • सृष्ट पदार्थीय उपमा – वेली, वक्ष, फळे, फुले, पृथ्वीवरील नानाप्रकारचे प्राणी, आकाशातले ग्रह, तारे, सूर्य, चंद्र, धूमकेतू इत्यादि सृष्टीतील यच्चयावत पदार्थातून त्याने आपल्या उपमा घेतल्या आहेत. त्यावरून, त्याच्या बौद्धिक दृष्टीची विशालता नजरेत भरते.
  • शास्त्रीय – कालिदासाने व्याकरण, तत्त्वज्ञान, राजनीति, वैद्यक, इत्यादी अनेक शास्त्रांतून सुंदर आणि निवडक उपमा घेतल्या आहेत. देवांना स्वस्थानावरून हुसकवून लावणार्‍या शत्रूंना सामान्य नियमांचा बाध करणार्‍या अपवादांची, वालीच्या गादीवर बसविलेल्या सुग्रीवालाधातूच्या जागी येणार्‍या आदेशाची, स्वबलाने शत्रूचा निःपात करण्यास समर्थ असलेल्या शत्रुघ्नाच्या मागून रामाज्ञेने जाणार्‍या सेनेला अध्ययनार्थ ‘इ’ धातूच्या मागे लागलेल्या निरर्थक ‘अधि’ उपसर्गाची उपमा यांसारख्या व्याकरणविषयक उपमा वाचून संस्कृतव्याकरणाभिज्ञ वाचकास मौज वाटते.

मेनकेला हिमालयापासून झालेल्या पार्वतीला राजनीतित उत्साहगुणाने मिळणार्‍या संपत्तीची उपमा अर्थशास्त्रातून घेतली आहे तर प्रबल तारकासुरापुढे निष्फळ झालेल्या देवांच्या उपायांना जालीम औषधांनाही न जुमानणार्‍या सान्निपातिक ज्वराची उपमा वैद्यक शास्त्रातून घेतली आहे.

  • आध्यात्मिक – कवींची प्रवृत्ती सामान्यतः सृष्टीतील व्यक्त पदार्थांतून उपमानाचा शोध घेऊन वर्ण्य विषय सुगम करण्याची असते. ऋतुसंहारात कालिदासाने तोच मार्ग स्वीकारला आहे. वसिष्ठ धेनुच्या मागून जाणार्‍या दिलीपाला श्रद्धायुक्त विधीची आणि मातेला अलंकृत करणार्‍या भरताला संपत्तीला शोभायमान करणार्‍या विनयाची उपमा वाचून चमत्कृति उत्पन्न होते. रघुवंशाच्या सुरवातीच्या मंगलश्लोकात कालिदासाने उपमा अलंकार वापरून, त्या अलंकारालाच अलंकृत केले आहे.

वागर्थाविव सम्पृक्तौ वागर्थप्रतिपत्तये ।

जगतः पितरौ वन्दे पार्वतीपरमेश्वरौ ॥

ज्याप्रमाणे वाणी (शब्द) आणि अर्थ हे एकरूप झालेले असतात, त्याप्रमाणे पार्वती देवी आणि भगवान्‍ शंकर एक झाले आहेत, असे तो म्हणतो.

  • व्यावहारिक – दुष्यन्तासारखा जावई मिळाल्यानंतर काश्यपांनी शकुन्तलेला ‘सुशिष्यपरिदत्ता विद्येव’ अशी उपमा दिली आहे. ज्याप्रमाणे चांगल्या विद्यार्थ्याला दिलेली विद्या ही कधीच असफल होत नाही त्याप्रमाणे दुष्यन्ताला दिली गेलेली शकुन्तला कधीच शोचनीय होणार नाही, असा विश्वास काश्यपांना आहे. ‘अभ्यासाने विद्येला प्रसन्न करता येते, त्याप्रमाणे सदैव सेवा करून तू या धेनूला प्रसन्न करून घे’ या वसिष्ठांनी दिलीपाला केलेल्या उपदेशात कालिदासाच्या स्वानुभवाचे प्रतिबिंब दिसते.
  • औचित्य –  कालिदासाच्या उपमा अत्यंत स्वाभाविक वाटतात. खादाड विदूषकाने अर्धचंद्राला दिलेली

मोडक्या मोदकाची उपमा, समुद्रगृहाजवळ शिलेवर झोपलेल्या लठ्ठ विदूषकाला निपुणिका दासीने दिलेली बाजारांतील पोळाची उपमा या त्या त्या व्यक्तिरेखेच्या स्वभावानुसार दिलेल्या उपमा आहेत.

  • पूर्णता –

तां राजसमिति पुण्यां नागभोगवतीमिव ।

संपूर्णां पुरुषव्याघ्रैः सिंहैर्गिरिगुहामिव ॥ (रघुवंश)

या एकाच श्लोकामधून दमयंती स्वयंवरार्थ जमलेल्या राजांच्या सभेला भोगवती नगरीची आणि गिरिगुहेची अशा दोन उपमा दिल्या आहेत.

निष्कर्ष 

कालिदास हा एका रम्य वातावरणात वावरणारा कवी आहे. शूद्रकासारखा वास्तवा रमणारा तो वाटत नाही. कालिदासाचे साहित्य वाचून काव्यशास्त्रज्ञांना सुद्धा कदाचित्‍ प्रश्न पडेल की इतक्या वेगवेगळ्या प्रकारे उपमेचा वापर करता कसा करता येऊ शकतो. पण कालिदास तो करतो. त्याचे साहित्य म्हणजे उपमेचा सागरच आहे. विविधांगी उपमांनी स्वतःचे साहित्य खुलवणारा कालिदास हा खरोखर एक प्रतिभावंत कविकुलगुरु आहे. कालिदासाच्या याच गुणांमुळे एक कवी म्हणतो की-

पुरा कवीनां गणनाप्रसङ्गे कनिष्ठिकाधिष्ठितकालिदासा ।

अद्यापि तत्तुल्यकवेरभावादनामिका सार्थवती बभूव ॥

संदर्भ ग्रंथ –

इंदुरकर विनोद, जागतिक नाटककार, ऋचा प्रकाशन, नागपूर, प्रथमवृती, जून, १९८४.

करंबळेकर वि.वा., संस्कृत साहित्याचा सोपपत्तिक इतिहास, श्रीशारदा प्रकाशन, नागपूर, द्वितीयावृत्ती, १९६३.

काळे, एम्. आर्., विक्रमोर्वशीयम्, मोतीलाल बनारसीदास, दिल्ली, अकरावी आवृत्ती, २००५.

डांगे सिंधु (संपा.), अभिजात संस्कृत साहित्याचा इतिहास, ऋतायन संस्था, मुंबई, प्रथमावृत्ती, ऑगस्ट २००४.

देशपांडे सरोज, संस्कृत साहित्यशास्त्राची तोंडओळख, पद्मगंधा प्रकाशन, पुणे, प्रथमावृत्ती, २००९.

मिश्र धारादत्त, पाण्डेय जनार्दन, रघुवंश, मोतीलाल बनारसीदास, दिल्ली, द्वितीय परिवर्धैत संस्करण, २००४.

पाण्डेय प्रद्युम्‍न, कुमारसंभव, चौखम्बा विद्याभवन, वाराणसी, पुनर्मुद्रित संस्करण, २००६.

भिडे वि.वा., ऋतुसंहार, ब्ल्यू बर्ड इंडिया लिमिटेड, पुणे, प्रथमावृती, २००९.

वाटवे, के.ना., संस्कृत काव्याचे पंचप्राण, मनोहर ग्रंथमाला, १९७०.

शेवाळकर राम, अभिज्ञानशाकुन्तल, प्रसाद प्रकाशन, पुणे, प्रथमावृत्ती.

शेळके शां. ज., महाकवि कालिदासाचे मेघदूत, मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे, तृतीय पुनर्मुद्रण, एप्रिल, २००५.

अजय पेंडसे
सहाय्यक प्राध्यापक (तदर्थ)
संस्कृत विभाग,
मुंबई विद्यापीठ.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*