महाकवी कालिदासाच्या वाड्.मयातील निसर्ग

प्रा. मेधा सोमण

                  कवीकुलगुरू महाकवी कालिदासाला प्रथम विनम्रतेने अभिवादन करते. या लेखामध्ये कालिदासाच्या वाड्.मयातील निसर्गचित्रणाच्या काही उदाहरणांचा विचार आपण करुया. खरं म्हणजे कालिदासाला देवदेवता, वेद, उपनिषदे वगैरे प्राचीन वाड्.मयाविषयी भक्ती आणि आदर होता. भारतीय संस्कृती , आपल्या परंपरा , प्रथा, पद्धती, संस्कृतीची मूल्ये याविषयी कालिदासाला अपार आदर आणि प्रेम होते. त्याच्या वाड्.मयातील वैशिष्ट्यांचा पुन्हा पुन्हा अभ्यास व्हावा आणि संस्कृतप्रेमी वाचकांना विशेषत: नव्या पिढीला या अलौकिक साहित्यगुण असलेल्या अद्वितीय महाकवीचा परिचय व्हावा हाच आपल्या कालिदास विशेषांकाचा हेतू असल्याने आपण निसर्ग, निसर्ग आणि मानवी भावनांचा एकत्रित आविष्कार , पर्यावरण रक्षणाविषयी कालिदासाची जागरुकता याचा विचार करणार आहोत.

               भारतीय संस्कृती म्हणजे काय ? हे जाणून घ्यायचे असेल तर महाकवी कालिदासाचे वाड्.मय अभ्यासावे म्हणजे भारतीय संस्कृती समजेल असं पाश्चात्य विद्वान नेहमी म्हणतात, आणि ते खरंही आहे. महाकवी कालिदासाने ऋतुसंहार, मेघदूत ही दोन खंडकाव्ये , शाकुंतल, मालविकाग्निमित्रम् आणि विक्रमोर्वशीयम् अशी तीन नाटके , रघुवंश आणि कुमारसंभव ही दोन महाकाव्ये अशा सात साहित्यकृतींचे लेखन केले आहे.

              कालिदासाच्या ऋतुसंहार काव्यात ग्रीष्मतापामुळे प्राणी आपल्या सहजप्रेरणाही कशा विसरून जातात ते कालिदासाने अगदी सहजपणे चित्रित केले आहे. मोराची शरीरं कमालीची गळून गेली आहेत. मन इतकी म्लान झालेली असतात की त्यांच्या पिसार्यात तोंड खुपसून सर्प पहुडलेले असतात. ते वरच्या उन्हाने आणि आतल्या विषाने अवतीभवतीच्या वणव्याने काऊन गेलेले असतात. त्यामुळे बेडकांच्या कळपांकडे त्यांचे लक्षही जात नाही. बेडूक तरी काय करतात ?

           “ उप्लुत्य भेकस्तृषितस्य भोगिन: फणातपत्रस्य तले निषीदति

   —  बेडूक गरम झालेल्या सरोवरातील चिखलातून बाहेर पडून तृषार्त सर्पांच्या फणेखालीच विश्रांती घेतात.

थोडक्यात हत्ती, सिंह, मोर, सर्प, बेडूक हे निसर्गातले एकमेकांशी वैर असणारे घटक आपल्या सहजप्रेरणाही विसरले आहेत. 

            ‘  मेघदूत ‘  या  खंडकाव्यात रामगिरीपासून अलकानगरीकडे जाणार्या मेघाच्या मार्गावरील निसर्गाचे म्हणजे वाटेवर असणार्या नद्या, पर्वत, वारा, विविध लतावेली, फुलं, प्राणी, पक्षी, आकाश सगळ्याच निसर्गाचं प्रत्यक्ष वर्णन कालिदासाने केलेले आहे. यामुळे रसिक वाचक सहजपणे निसर्गाकडे आकर्षित होतातच पण यक्ष आणि यक्षपत्नी विषयी सर्व वाचकांच्या मनात प्रेम, सहानुभूती, जिव्हाळा निर्माण होतो. कवीच्या संवेदनशीलतेचा प्रत्यय आपल्याला वारंवार येतो. यक्ष मेघाला म्हणतो – “ तू इंद्राचा प्रकृती पुरुष आहेस. ‘ मा भूदेव क्षणमपि च ते विद्युता विप्रयोग:। म्हणजे तुझ्या प्रियतमेचा विद्युल्लतेचा आणि तुझा कधीही क्षणमात्रसुद्धा विरह होऊ नये. “

यक्षाला ज्यामुळे पत्नीपासून दूर आठ महिने शिक्षा म्हणून रहावे लागले होते. अशा तर्हेचा विरह तुझा आणि तुझ्या प्रियतमेचा – विद्युल्लतेचा होऊ नये अशी इच्छा यक्ष मेघाजवळ व्यक्त करतो. यामध्येच यक्षाच्या मनाचा मोठेपणा व्यक्त होतो. मेघ, मेघपत्नी, भवतालचा निसर्ग या सर्वांचे अस्तित्त्व सतत सुरुवातीपासून जाणवते. ही पात्रं सजीव बनून मेघदूतामध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत वावरत असतात. पण ती बोलत नाहीत. एकटा यक्ष  संपूर्ण काव्यामध्ये बोलत असतो. खरं म्हणजे कालिदासच यक्षाच्या रूपाने बोलत असतो. पण कुठेही रसभंग होत नाही. उलट कथानक सहजपणे पुढे पुढे सरकत असते. पती-पत्नी एकत्रितच असाव्यात हे संस्कृतीचे मूल्य, रिवाज यक्ष यक्षपत्नी, मेघ विद्युल्लता यांच्याद्वारे व्यक्त झाले आहेत.

             कालिदासाच्या कुमारसंभव काव्यातही अनेक प्रकारच्या वनश्रीचे वर्णन महाकवींनी चित्रित केले आहे. रघुवंशात तर लंकेहून परत येताना श्रीरामाच्या पुष्पक विमानातून वाटेत दिसणार्या सर्व मार्गावरील निसर्गाचे रम्य दर्शन कालिदासाने वाचकांना घडविले आहे.

             शाकुंतल नाटकात शिकार करणारा हस्तिनापूरचा राजा दुष्यंत आणि त्या मार्गाने चालत जाणारे कण्व मुनींचे शिष्य तापसकुमार यांच्यामध्ये झालेला संवाद कालिदासाने उत्तम प्रकारे चित्रित केला आहे. हरिणांचा पाठलाग करीत बाण मारण्यासाठी सज्ज असलेल्या राजाला तापसकुमार म्हणाले—

                             आश्रममृगोऽयं राजन् अन्तव्यो नहन्तव्य:

              — महाराज, हा आश्रमाचा हरिण आहे याला मारायचे नाही. या एका वाक्यातच आश्रमाच्या प्राणी- पक्षी यांना मारायचे नाही , त्यांना वाढवायचे असं तापसकुमाराने राजाला सुचविले. राजाची शस्त्रे दुबळ्यांच्या रक्षणासाठी आणि दुष्ट माणसांच्या निर्दालनासाठी असतात हा विचार कालिदासाने यातून व्यक्त केला आहे.

               शकुंतला हस्तिनापुराला सासरी जाण्यासाठी निघाली त्यावेळी चालता येत नसतानाही कष्टाने पावले टाकत जड शरीर सांभाळत एक हरिणी शकुंतलेजवळ आणि तिला प्रेमाने गोंजारत “ मला हिची सुटका झाल्यावर कळवा हं —

              “ तात! एषोटजपर्यन्तचारिणी गर्भमन्थरा मृगवधूर्यदानघप्रसवा भवति

                 तदा मह्यं कमपि प्रियनिवेदयितृकं विसर्जयिष्यथ  “

           हे सांगायला शकुंतला विसरली नाही. ती निघाली तेव्हा सर्वांचे डोळे भरून आलेले होते. शकुंतलेचे डोळेही भरून आले होते. अशावेळी तिच्या वस्त्राचं टोक ओढणार्या हरिणीच्या बछड्याला तिनं पाहिलं तर दीर्घपांग नांवाचा हरिणीचा बछडा तिच्यामागे येत होता. त्याच्या आईच्या – हरिणीच्या मृत्यूनंतर शकुंतलेनेच त्याला प्रेमाने वाढविले होतं. दर्भाचं टोक तोंडाला लागल्यावर झालेल्या जखमा बर्या करण्यासाठी शंकुंतलाच त्या जखमांवर इंगुदीचं तेल लावीत असे. त्यानंतर थोडं  थोडं धान्यही त्याच्या तोंडात भरवीत असे. आता त्याचा विरह होणार म्हणून शंकुंतला गहिवरली होती. कण्व बाबांवर  जबाबदारी टाकून जड अंत:करणाने ती सासरी निघाली होती.

             कालिदासाच्या साहित्यात निसर्ग मानवी भावनांच्या बरोबर येतो निसर्गाचे मानवीकरण करण्याचं कालिदासाचं वैशिष्ट्य आपल्या लक्षांत येते. पशुपक्षी, प्राणी यांच्यावर पुत्रवत् प्रेम करणारी माणसं त्या प्राचीन काळात जशी होती तशीच काही  माणसं आपणास  आजही माणसं खेड्यात आढळतात. घरचा गृहस्थ रात्री बेरात्री गोठ्यातील गाय, म्हैस, बैल हंबरले तरीही कंदील किंवा टॅार्च घेऊन मध्यरात्रीही गोठ्यात बघायला जात असतात. स्वत: जेवण्यापूर्वी गायीला चारा घातला का ? असे विचारून गुराढोरांची काळजी घेतात. यावरूनच भारतीयाचे प्राणी-पक्षी यांच्या बद्दलचे प्रेम दिसून येते.

               महाकवी कालिदासांनी आपल्या साहित्यात निसर्ग आणि मानव यांच्यातील भावनांचं एकीकरण प्रसंगाप्रसंगाने व्यक्त केलं आहे. कालिदास जसा नाटककार, कवी होता तसाच तो पक्षीतज्ज्ञ, वनस्पतीतज्ज्ञ, हवामानतज्ज्ञ, पर्यावरणवादी होता हेही त्याच्या साहित्यावरून दिसून येते.

प्रा. मेधा सोमण
dakrusoman@gmail.com

परिचय

M.A. ( मराठी), M.A. (राज्यशास्त्र), M.Phil, B.Ed.

काही वर्षे महाविद्यालयात अध्यापन.

सांस्कृतिक वाङ्मय दर्शन, नवरात्र उत्सव( सामाजिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक महत्व), सावरकर वाङ्मय दर्शन, राम गणेश गडकरी वाङ्मय दर्शन, प्राचीन काळच्या स्त्रिया, हम पंछी है एक डाल के या राष्ट्रीय एकात्मता दर्शक कार्यक्रमाचे व अशा अनेक कार्यक्रमांचे लेखन व दिग्दर्शन. भगवद्गीतेतील श्लोकांवरील स्पष्टीकरण, शाकुंतल, भारतीय सण , प्राचीन ऋषी, समर्थांचा संदेश, अंधश्रद्धा , रूढी, परंपरा , भारतीय सण , उत्सव  वगैरे विविध विषयांवर व्याख्याने.अनेक वृत्तपत्रांमध्ये सातत्याने लेखन. 

सुमधुर संस्कृत सुभाषिते ( इंग्रजी-मराठी अर्थासह)भाग 1 व 2 प्रकाशित.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*