कालिदासाचे मेघदूत

प्रा.डॉ. विमुक्ता राजे

कालिदासाच्या स्वतंत्र प्रतिभेतून निर्माण झालेली कलाकृती म्हणजे ‘मेघदूत’. जिने कुणाचं कसलं ऋण पत्करलेलं नाही असे हे काव्यपुष्प आहे. असं म्हटलं जातं की, कालिदासानं फक्त ‘मेघदूत’ जरी लिहिलं असतं तरी तो इतिहासामध्ये महाकवी म्हणून अमर झाला असता. मेघदूत काव्याला एवढी लोकप्रियता लाभण्याचं एक कारण असं प्रतिभेचं जे लक्षण सांगितले जाते की, ती ‘अपूर्व वस्तू निर्माणक्षम प्रतिभा’, जी वस्तू अस्तित्वात नसते ती आपल्या प्रतिभेच्या सहाय्यानं निर्माण करू शकणारी शक्ती या दृष्टीनं तिच्याकडे पाहिले जाते. मेघदूतात याचा प्रत्यय येतो.आकाशास्थ मेघास दूत कल्पून आपला निरोप त्याच्याद्वारे आपल्या विरहिणी पत्नीकडे पाठविण्याची कल्पना या यक्षाने केली आहे. कालिदासाच्या या अद्भूत कल्पनेतून मेघदूत अवतरले आहे.   

मेघदूतातील यक्ष हा रामगिरीच्या आश्रमाजवळ जवळपास आठ महिने होता. यक्ष हा कुबेराचा सेवक, परंतु त्याच्या हातून प्रमाद घडला, त्यामुळे कुबेराने त्याला शाप दिला. त्या शापाचा परिणाम म्हणून याला पृथ्वीवर यावं लागले. एक वर्षापर्यंत भोगायचा तो शाप होता. यक्ष पृथ्वीवर आला.  एके दिवशी पावसाळ्याच्या सुरुवातीला

‘कश्चित् कांता विरह गुरूणाः स्वाधिकारप्रमतः।

अशी यक्षाची अवस्था होती. एके दिवशी पावसाळ्याच्या सुरूवातीला

‘आषाढस्य प्रथम दिवस मेघम्लाशिष्ट सानुं।

वप्रक्रीडापरिणत गज प्रेक्षणीयं ददर्श।‘

एखाद्या मत्त मातंगाप्रमाणे अवाढव्य असणारा तो काळकभिन्न मेघ रामगिरीच्या शिखराशी धडका देताना यक्षानं पाहिला.

मेघाचं आणि प्रेमजीवनाचं नातं काव्यामध्ये गृहीत धरलेलं आहे…

‘मेघालोके भवति सुखिनोप्यन्यथा वृत्तिचेतः।’

अत्यंत सुखात असणारे लोकसुद्धा मेघदर्शनाने व्याकूळ होऊन जातात. याचं कारण मेघाचा आणि त्यांच्या प्रेमजीवनाचा संकेत आहे. तो मेघ पाहिल्याबरोबर वर्षभर आपल्या पत्नीचा वियोग सहन करणाऱया यक्षाला तिची अत्यंत उत्कटतेने आठवण झाली. आपल्याला आठवण होते हे तिला कसे कळवावे या विचारात असताना समोरच मेघ दिसला आणि त्याच्या मनात कल्पना आली हा मेघ सर्वत्र संचार करतो. हा वाऱयाच्या खांद्यावर बसून उत्तरेकडेसुद्धा जाईल आणि हिमालयातल्या अलकानगरीलासुद्धा जाईल व आपल्याला प्रियतमेला आपल्या मनातली जी व्यथा आहे ती सांगू शकेल आणि आपला संदेश आहे तोही तिच्या कानापर्यंत पोहोचवू शकेल.

ही कल्पना मनात आल्याबरोबर त्याच्या मनात हे नाही आलं,

‘धूम्रज्योतिः सलिलमरुतां सन्निपातः क्व मेघः।’

धूर, प्रकाश, पाणी आणि वारा यांच्या संगमानी अस्तित्वात आलेला हा मेघ ‘दूत’ म्हणून आपल्या उपयोगी पडू शकेल का? याच्यामध्ये चैतन्य आहे का? आपला निरोप तो कळवू शकेल किंवा नाही हे त्याच्या लक्षातच आलं नाही. इतका तो प्रेमव्याकुळ झाला होता. या गोष्टी त्याच्या लक्षात येऊच नयेत इतकं त्याला पत्नी प्रेमानं पछाडून टाकलं होतं. म्हणून कालिदास म्हणतो-

‘कामार्ता ही प्रकृति कृपणाश्चेतनाश्चतेतनेषु’।

जी प्रेमविव्हल झालेली माणसं असतात ती हे समजून घेण्याचं भानच हरपून बसतात. हा चेतन आहे की, अचेतन, हा निरोप पोहोचवू शकेल की नाही, हे त्याच्या लक्षातच राहिलं नाही, त्याला निरोप सांगण्यासाठी तो आतूर झाला.

निरोप सांगायला पहिली ओळख करुन घ्यायला पाहिजे आणि त्याची ओळख आपल्याला पटली हे कळायला पाहिजे. म्हणून यक्षाने आश्रमाजवळची कुटजकुसुमे घेतली, फुलं घेतली आणि त्याला अर्पण केली. मेघाची पूजा केल्यानंतर त्याची त्याने प्रशंसा केली. आपलं काम त्याच्याकडून करवून घ्यायचं आहे म्हणून तो म्हणू लागला,

‘जातं वंशे भुवनविदितां पुष्करावर्तकानां ।

पुष्कर आणि आवर्तक या श्रेष्ठ मेघांच्या वंशामध्ये तू जन्माला आला आहेस. तुझ्या सामर्थ्याचा, तुझ्या लौकिकाच्या मानाने फारच लहान काम तुला सांगायचे आहे आणि ते म्हणजे माझ्या प्रियतमेला माझा निरोप पोहोचवायचा आहे.

ती राहते हिमालयाच्या कुशीत अलकानगरीमध्ये. तिथपर्यंत तुला जायचे आहे. तू विचारशील कदाचित कोणत्या रस्त्यानं जायचं, कसं जायचं, रस्त्यामध्ये कोण कोण भेटणार आहेत. त्याचं सगळं मार्गदर्शन करण्याची जबाबदारी मी घेतो म्हणून त्याने मेघाला मार्गदर्शन करायला सुरूवात केली.

मंदाक्रांता वृत्तातल्या 120 श्लोकांमध्ये पूर्वार्धात हा मेघमार्ग वर्णिलेला आहे. रामगिरीपासून तो थेट अलकानगरीपर्यंतचा मार्ग, यक्षाने त्याला सांगितला आहे. त्या मेघाकडून आपलं काम करून घ्यायचं आहे आणि त्यामुळे तो मार्ग कंटाळवाणा होणार नाही असं प्रलोभन दाखविण्याची जबाबदारी यक्षावर होती. त्या मार्गाचे जे वैशिष्टय़ आहे, त्या मार्गामध्ये भेटणाऱया नद्यांचं, पर्वतांचं, प्रदेशांचं, लोकांचं जे वैशिष्टय़ आहे, जे सौंदर्य आहे, ते सौंदर्य आणि वैशिष्टय़ तो त्या मेघाच्या कानावर घालतो ते एवढय़ासाठी की त्या आमिषाने तरी मेघास त्या मार्गाचं आक्रमण करणं आवडेल.

यक्ष मेघास सांगतो – तू इथून निघशील. इथून गेल्यावर तुला माल प्रदेश लागेल. त्यानंतर तुला आम्रकुट पर्वत लागेल, त्या आम्रकुटावरून तू निघालास की विंध्य पर्वत लागेल, तुला रेवा नदी लागेल’. पुढे तुला दशार्ण देश लागेल, विदिशा नावाची राजधानी लागेल, निर्विंध्या नदी लागेल आणि त्यानंतर तू उज्जैनीला जाशील. उज्जैनीचं वर्णन करताना मोठमोठय़ा प्रासादतुल्य इमारतीचं वर्णन केलेलं आहे. त्यांच्या सौंधतलांचं वर्णन केलेलं आहे. उज्जैनीच्या वर्णनांमध्ये कालिदासाचं मन अतिशय रमलेलं आहे. ते अत्यंत स्वाभाविक आहे. उज्जैनीहून पुढे तू कनखलला पोहोचशील, हिमालयाला लागशील, कैलास ओलांडशील आणि त्यानंतर मग तू अलका नगरीला पोहोचशील.

पहिल्या 55 ते 60 श्लोकांमध्ये विविध भौगोलिक वर्णने कालिदासाने केली आहेत. जी स्थळे त्याला दिसली त्या स्थळांकडे शृंगाराच्या दृष्टीतूनच यक्ष पाहतो. जवळपास सर्वच युग्मं वर्णनं या ठिकाणी आढळतात. कमलिनी आणि तिला उमलवणारा सूर्य, शृंगारानंतर श्रांत झालेली नदीरुपी प्रेयसी अशी अनेक युग्मं कालिदासाने वर्णिली आहेत. ‘उपमा कालिदासस्य’ असे समर्पक वर्णन याठिकाणी करता येईल. मेघदूताचा पूर्वार्ध इथे होतो.

असं करत एकेक प्रदेश ओलांडत तू जाशील. मग त्यानंतर तू हिमालयामध्ये पोहोचशील. उत्तरार्धात यक्ष सांगतो – हिमालयाच्या मांडीवर बसलेली अलकानगरी तुला दिसेल. अलकानगरी कशी ओळखता येईल?

‘बाह्योद्यानास्थित हरशिरश्चंद्रिका हौतहर्म्यां।’

त्या बाहेरच्या उद्यानामध्ये शंकराची मूर्ती आहे. त्या मूर्तीच्या मस्तकावर चंद्र आहे, त्याच्या प्रकाशामध्ये ज्याचे सर्व सौंधतल आणि इमारती चांदण्यांनी माखून निघाल्या असतील ती माझी अलकानगरी आहे हे तू सहज ओळखशील.

अलकानगरीचं, अलकानगरीतल्या यक्षाच्या घराचं, यक्षाच्या पत्नीचं दर्शन त्यानं घडविलेलं आहे आणि त्यानंतर मेघास आपला निरोप सांगायला सुरूवात केली आहे.

कुबेराच्या घराजवळ माझं घर आहे, तेही तुला ओळखता येईल. त्या घरी जाशील, एकदम माझ्या बायकोला हाक मारु नकोस. कदाचित ती पूजा करीत असेल. तिला तू एकदम घाबरवून सोडू नकोस. कदाचित ती माझ्यावरच एक गीत रचून वीणेवरती वाजवत बसली असेल. वाजवता वाजवता आपणच घेतलेले आलाप, आपणच घेतलेल्या रचना ती विसरून जात असेल आणि डोळ्यांमधून अश्रुपात झाल्यामुळे तिचं गायन-वादन तिथेच थांबून राहात असेल.

माझी तुला विनंती आहे, दुपारच्या वेळी तू पोहोचलास तर एकदम गडगडाट करू नकोस. कदाचित माझ्या प्रियतमेला झोप लागली असेल. तिची झोपमोड करू नकोस. ही विनंती एवढय़ासाठी करतो की कदाचित ती झोपेमध्ये स्वप्न पहात असेल आणि त्या स्वप्नांमध्ये तिची आणि माझी भेट झाली असेल. तू जर गडगडाट केलास तर तिची झोपमोड होईल. आणि स्वप्नामधलं आमचं जे मीलन आहे, त्यामध्ये विक्षेप उत्पन्न होईल, ताटातूट होईल. आम्ही आठ महिने वियोग सहन करत आहोत. स्वप्नामध्ये तरी माझी भेट तिला होऊ दे. कृपा करून गडगडाट करू नकोस. तू तिला आपली ओळख करून दे.

त्यानंतर माझी दशा तिला सांग. स्थिरचरामध्ये ज्या ज्या ठिकाणी सौंदर्याचा उन्मेष प्रगट झाला आहे, त्या प्रत्येक ठिकाणी तुझ्या एकेक अंगाचं दर्शन मला होतं. मी पाण्यावरच्या लाटा पाहतो, त्या लाटांकडे पाहिल्यानंतर मला तुझ्या भुवयांचं नर्तन आठवतं. मी मोरांचा पिसारा पाहतो, त्यावेळी तुझ्या काळ्याभोर केशकलपाची आठवण मला होते. मी भ्यालेल्या हरिणींचे कटाक्ष पाहतो, त्यावेळी मला तुझ्या डोळ्यांची आठवण होते. ठिकठिकाणी अंशाअंशाने तू मला दिसत राहतेस. पण संपूर्ण अशी तू मला कुठेच सापडत नाहीस. तुझ्या विरहाने मी अतिशय तडफडत बसलो आहे. परंतु काळजी करू नकोस. आठ महिने संपले आहेत. आता फक्त चार महिने बाकी आहेत. भगवान विष्णूची महानिद्रा संपली की त्यानंतर

‘परिणतशरश्चंद्रिकासू क्षपासु। तं तं आत्माभिलाषा।’

पूर्ण फुललेल्या पौर्णिमेच्या प्रकाशामध्ये आतापर्यंत अतृप्त राहिलेल्या आपल्या सगळ्या आकांक्षा आपण पूर्ण करून घेऊ, तोपर्यंत कृपा करून तू धीर धर.

यक्षाने मेघास निरोप दिला. पण निरोप देताना त्याला शुभेच्छाही दिल्या, आशीर्वाद दिले, तो म्हणाला, ‘माझा ज्याप्रमाणे माझ्या प्रियतमेशी वियोग झालेला आहे त्याप्रमाणे तुझी जी प्रियतमा विद्युत, विद्युलता तिचा व तुझा कधीही वियोग होऊ नये, अशी मी तुला सदिच्छा देतो.

‘मा, भूदेव क्षणमपिच ते विद्युता विप्रयोग।’

मेघदूत या खंडकाव्याचं कथानकच एवढचं आहे.

मेघदूत काव्याचं सौंदर्य, आपल्या प्रियकराला प्रियतमेबद्दल वाटणाऱया प्रेमात नाही. त्यांच्या विरहाच्या व्याकुळतेमध्ये नाही. तर आकाशात संचार करणाऱया एका मेघाला आपल्या प्रेयसीकडे निरोप घेऊन पाठविण्याची जी कल्पना आहे त्या कल्पनेमध्ये मेघदूताचं काव्यसौंदर्य आहे. त्या मेघाच्या निमित्ताने रामगिरीपासून अलकानगरीपर्यंत जो भारतवर्ष आहे त्या भारतवर्षाच्या सौंदर्यस्थळांचे दर्शन अत्यंत लहानसहान रेखीव बारकाव्यांसहीत यक्ष आपल्यावर घडवतो. यातच मेघदूत नावाच्या काव्याचं सौंदर्य आहे.

प्रा.डॉ. विमुक्ता राजे
vimukta1517@gmail.com

  • जोशी बेडेकर महाविद्यालय, ठाणे येथे जनसंज्ञापन आणि पत्रकारिता( BMM) विभागात कार्यरत.
  •  एम.ए.(मराठी), एम.फील (मराठी), एम.ए.                  (जर्नालिझम /मास कम्युनिकेशन)
  • पीएच.डी.(मुंबई विद्यापीठ) ‘समर्थ रामदासांच्या वाङ्मयीन व्यक्तिमत्त्वातील विशेष एक शोध’

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*