कालिदास कथा

श्रीकांत अनन्त बर्वे 

पूर्वीच्या काळी काहीही मोजायचे असल्यास हाताची बोटे मोडून मोजणी करण्याची पद्धत होती.

एकदा काही विद्वान मंडळी चांगल्या कवींची मोजदाद करावी म्हणून बसले. …

पुरा कवीनां गणनाप्रसंगे

कनिष्ठिकाधिष्ठित कालिदासः

अद्यापि तत्तुल्य कवेरभावात्

अनामिका सार्थवती बभूव ।।

…  कालिदासाचे नाव घेऊन कनिष्ठिका ( करंगळी) मिटून ठेवली. आणि काय आश्चर्यं! कालिदासाच्या योग्यतेचा दुसरा कोणी कवि न आढळल्यामुळे करंगळीजवळचे दुसरे बोट-अनामिका मिटताच येईना! व अशा त-हेने ‘ अनामिका ‘ हे नाव सार्थ झाले…. तर अशा या महाकवीच्या संदर्भातील ही कथा…

१..  एकदा गुणनिधि नावाचा एक संस्कृत पण्डित आपले श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी गावोगाव फिरत होता. प्रत्येक राज्यात जाऊन तो राजाला आव्हान देऊन सांगत असे की आपल्या दरबारातील विद्वानांनी माझ्याशी शास्त्रार्थ करावा, वादविवाद करावा. मला जिंकावे. ते न जमल्यास माझा गौरव करून मी आपल्या विद्वत्सभेत मी अजि़क्य असल्याचे प्रमाणपत्र द्यावे. अशी अनेक प्रमाणपत्रे गोळा करीत करीत तो भोज राजाच्या धारा नगरीत येऊन पोचला.

कालिदासाच्या कानावर ही वार्ता येताच त्या पंडिताचे गर्वहरण करण्याचे मनाशी ठरवून एक योजना केली.

विद्वानांना पालखीतून दरबारी आणावे अशी भोज राजाच्या राज्यात पद्धत होती. त्या  प्रथेप्रमाणे राजा भोजाने त्या पंडितास दरबारात आणण्यासाठी पालखीची व्यवस्था केली. ही व्यवस्था कालिदास समजली. तेषाम् पालखीसाठी नियुक्त केलेल्या भोयांपैकी एकाला बोलावून घेतले. आपली योजना त्याला समजावून सांगितली. व त्या भोयाच्या ऐवजी स्वतः भोई बनून कालिदास गुणनिधीला आणण्यासाठी निघाला. गुणनिधीस पालखीतून आणीत असताना थोड्य थोड्या वेळाने ते भोई खांदे-पालट करीत होते. त्यातील एक भोई (कालिदास) खूपच दमला आहे असे गुणनिधीस वाटले. म्हणून एकदा खांदेपालट करण्यासाठी थांबले असता त्याने कालिदासास विचारले… ” अयं आ़दोलिकादंडः

स्कंधे किं तव बाधति? ” (म्हणजे या पालखीच्या दांड्यामुळे तुझ्या खांद्यास पीडा होत आहे काय?)

     गुणनिधीने मोठ्या ऐटीत भोयाला काव्यरूपात प्रश्न विचारला. पण त्याच्या प्रश्नातील

एका शब्दाचे रूप चुकले होते.

‘ बाधति ‘ हा तो शब्द! (बाध् हा धातु आत्मनेपदी असल्याने त्याचे रूप बाधते असे होते, बाधति असे होत नाही) कालिदासास ही चूक कशी सहन होणार? कानात शिश्याचा रस ओतल्यासारखे त्याला वाटले. भोई बनलेल्या कालिदासास अशा कष्टाच्या कामाची सवय नसल्याने त्याचा खांदा खरोखरच दुखत होता. पण आपले ते दुःख विसरून तो गुणनिधीस म्हणाला..

 ” न तथा बाधते दण्डः यथा बाधति बाधते ।” ( तुमच्या बाधति या शब्दाने जितका त्रास होत आहे तितका त्रास या पालखीच्या दांड्याने होत नाही.

एका यःकश्चित् भोयाने आपली व्याकरणातील चूक दाखवावी हे पाहून गुणनिधी लज्जित झाला.

त्याने भोयास विचारले.. तु कोणाकडे शिकलास? त्यावर भोई उत्तरला.. मी तर सामान्य भोई! मी कालिदासाकडे साधा सेवक म्हणून काम करतो. तेथील विद्वानांची चर्चा कानावर येते इतकेच!

भोयाचे उत्तर ऐकून गुणनिधीने मनोमन ठरविले की ज्या कालिदासाच्या घरचे सेवकही इतके विद्वान आहेत त्या कालिदासास मी वादविवादात कसा जिंकू शकेन? असा विचार करून त्याने भोयांस पालखी त्याच्या निवास स्थानाकडे नेण्यास सांगितले. व निवास स्थानी पोचताच भोजाच्या राज्यातून पलायन केले.

कालिदास कथा (2)

कालिदास हा स्वतः विद्वान होता व विद्वत्तेच्या जोडीला इतरांना मदत करावी, सहाय्य करावे असेही त्याला वाटत असे. त्याच्या या वृत्तीमुळे तो अनेकांना राजाकडून आर्थिक सहाय्यही मिळवून देत असे..

    धारा नगरीचा राजा भोज दानशूर होता, तसेच विद्वानांची कदर करणारा, त्यांना आश्रय देणाराही होता. त्याच्या राज्यात गरिबीने गांजलेला एक ब्राह्मण रहात होता. त्याच्या पत्नीला राजीच्या दानशूरपणाची तसेच विद्वानांचा आदर करण्याचा स्वभाव ठाउक होता. तिने आपल्या पतीला राजाकडे जाऊन पैसे मिळवून आणण्याचा हट्टच धरला.

पत्नीच्या हट्टापुढे नमते घेऊन तो दरबारी जाण्यास विशाला.आपले महाराज विद्वानांची कदर करतात हे जाणून असल्याने आपण चार ओळींचे तरी काव्य /श्लोक बनवून न्यावा अशा विचारात चालत असता एका जलाशयाजवळ आला. पुढे पुढे जात असता त्याला असे दिसले की काठावरील जांभळाची फळे

(जांभळे) पाण्यात पडत आहेत. व पाण्यात पडल्यावर खाली-वर होत आहेत.ते पाहून त्याला तीन चरण सुचले

जम्बूफलानि पक्वानि

पतन्ति विमले जले

मत्स्याः तानि न खादन्ति …

पण चौथा चरण काही सुचेना!

पण श्लोक तर पूर्ण करायला हवा. म्हणून.. जांभळांचे पाण्यात खाली-वर होणे वर्णन करीत कसाबसा चौथा चरण पूर्ण केला

तो असा.. जलमध्ये डुबुक् डुबुक्

अशा रीतीने पूर्ण झालेला श्लोक राजापुढे काव्य म्हणून सादर करण्यापूर्वी कालिदासास दाखवावा या विचाराने कालिदासाकडे गेला. स्वतःची सर्व परिस्थिति सांगितली. व  तयार केलेले काव्य दाखविले. कालिदासाने संपूर्ण श्लोक वाचला व चौथा चरण बदलून ….

जालगोलक-शंकया! असा केला, व उद्या दरबारात सादर कर असे सांगितले. त्यानुसार त्या ब्राह्मणाने

राजासमोर  आपले चार ओळींचे काव्य…

जम्बूफलानि पक्वानि

पतन्ति विमले जले ।

मत्स्याः तानि न खादन्ति

जालगोलक शङ्कया ।।

मासे ती जांभळे म्हणजे आपल्याला पकडण्यासाठी लावलेल्या जाळ्यांचे ठोकळे असतील या भीतीने ती जांभळे खात नाहीत

राजाने खुष होऊन कौतुक म्हणून त्या ब्राह्मणाला भरपूर द्रव्य देऊन संतुष्ट केले.

दरबार संपल्यावर घरी जाण्यापूर्वी तो ब्राह्मण कालिदासाच्या घरी गेला. त्याला मनापासून धन्यवाद देऊन आनंदाने आपल्ल्या घरी परतला व सुखाने राहू लागला!

barwesir@gmail.com

परिचय

श्रीकांत अनन्त बर्वे                  

 B.A..with Sanskrit, M. A… Marathi, B.Ed…Sanskrit, Maths.

नौपाडा मिडल् स्कूल या शाळेचा मुख्याध्यापक म्हणून फेब्रु.२००९ मधे सेवानिवृत्त.

… आकाशवाणी वरील गीर्वाणभारती या कार्यक्रमासाठी लेखन व सादरीकरण.

…ब्राह्मण सेवा संघ, ठाणे तर्फे घेतल्या जाणार्या संस्कृत वक्त्रृत्व स्स्पर्धेसाठी अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन..

…ब्राह्मण सेवा संघ ठाणे, रोटरी क्लब, लीयन्त क्लब या सामाजिक संस्थांकडून आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त.                               

.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*