पुरुष असाही असतो

चित्रा वाघ 

शब्दलावण्याचे उपनिषद अशा शब्दात गौरवण्यात आलेलं कविकुलगुरू कालिदासलिखित ’अभिज्ञान शाकुंतलम्’ हे संस्कृत भाषेचं सर्वमान्य लेणं म्हणता येईल. कालिदासाच्या ठायी अलौकिक काव्यप्रतिभा, निर्विवाद रचनाकौशल्य, गाढा शास्त्राभ्यास आणि मनोव्यापाराचे सूक्ष्म निरीक्षण हे सर्वच गुण अव्वल दर्जाचे असल्याचा पुरावा म्हणजे शाकुंतल!

हे नाटक महाभारतातील शकुंतलेच्या उपाख्यानावर बेतलेलं आहे. मूळ कथेच्या परिघाबाहेर न जाता आणि पात्रांची पार्श्वभूमी न बदलता आपल्या नवनवोन्मेषशालिनी प्रतिभेने कालिदासाने या आख्यानाला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं आहे. ’माझा मुलगा राज्याचा वारस व्हावा’ या अटीवर गांधर्व विवाहाला मान्यता देणारी व्यवहारी, स्वार्थी सुंदरी आणि आपला कार्यभाग उरकून राजवाड्यात परतल्यानंतर तिला न ओळखल्याचे नाटक करून तिचा त्याग करायला निघालेला एक बेजबाबदार राजा या प्रमुख पात्रांच्या वृत्तींमध्ये त्याने आमूलाग्र बदल केले. गर्भवती शकुंतलेचा दुष्यंताने केलेला त्याग ही अत्यंत महत्त्वाची घटना कायम ठेवत दुर्वासांचा शाप आणि दैवदुर्विलास याभोवती नवीन घटना गुंफत कालिदासाने ’अभिज्ञान शाकुंतलम्’ या सात अंकी अलौकिक नाटकाची निर्मिती केली. 

मेनकेकडून मिळालेलं अलौकिक सौंदर्य व कण्वमुनींच्या संस्कारांचं सात्विक तेज लाभलेली निष्पाप, अल्लड आश्रमकन्या शकुंतला आणि कर्तव्यतत्पर, महापराक्रमी व विनयशील असा धीरोदात्त नायक दुष्यंत यांची ही अनोखी प्रेमकथा प्रथम भेटीतील आकर्षण, मिलन, संघर्ष, विरह आणि पुनर्मिलन अशी नागमोडी वळणं घेत अखेर सुफळसंपन्न होते. यातल्या प्रत्येक पैलूविषयी खरं तर खूप काही लिहिलं गेलंय आणि तरीही हे नाटक वाचणाऱ्याला नव्याने काही सांगावसं वाटणं हीच या निर्मितीतली जादू आहे. 

अरुणा ढेरे यांची ‘अनय’ ही कविता अनेक वर्षांपूर्वी वाचलेली आणि तेव्हापासून मनात घर करून राहिलेली. यात त्या म्हणतात, 

त्यानं पुढे होऊन 

तुझ्या पापणीवरचा शोक टिपला

त्याक्षणी राधे, 

तुला तुझा पुरुष भेटला

पुरुष – जो क्षमा करून नाही ऋणी करत

पाठ फिरवून नाही उणी करत

घेतो समजून… सावरतो…  आवरतो

…उराशी धरतो

आपल्या नसलेल्या स्वप्नांसाठीही 

आपल्या काळजाचं घर करतो. 

राधे, पुरुष असाहि असतो!….

अनयाला नायकाचा दर्जा कधीच मिळाला नाही, इतकंच काय, पण त्याच्या अस्तित्त्वाचीदेखील कुणी फारशी दखल घेतली नाही. पण या कवितेने कुठेतरी त्या पात्राला न्याय मिळवून दिल्यासारखा वाटला होता. 

शाकुंतलमधल्या दुष्यंताला पाहून खरं तर ही कविता आठवण्याचं काहीच कारण नाही, पण कालिदासाने त्याच्या व्यक्तिमत्त्वात जे अनोखे रंग भरले आहेत ते पाहिल्यावर ’पुरुष असाही असतो’ हे शब्द आठवले एवढं निश्चित!   

सौंदर्यतृष्णा ही पुरुषाची सनातन उर्मी दुष्यंतात आहेच, पण राजा असल्याचा फायदा घेऊन अनीतीने तो कधी वागत नाही. भ्रमराप्रमाणे सौंदर्याचा रसिकतेने उपभोग घेण्याची त्याची वृत्ती असली तरी सतत नवीन फुलाचा शोध घेण्याची चंचलता त्याच्या अंगी नाही. नागरी दिखाऊपणाचा, दांभिकतेचा स्पर्शही न झालेल्या आणि आपल्या स्वर्गीय सौंदर्याविषयी पूर्णपणे अनभिज्ञ असणाऱ्या निरागस शकुंतलेचा जेव्हा त्याला मोह होतो तेव्हाही तिच्याशी विवाहबद्ध होण्याचीच कल्पना त्याच्या मनात येते. इतकंच नाही तर तिच्याकडे आकर्षित होणारं आपलं सत्प्रवृत्त मन कधीही धर्माविरुद्ध कौल देणार नाही याबद्दल त्याला खातरी वाटते. 

भूतकाळातील शृंगार आठवत पुनर्मिलनाची आशा जागवणाऱ्या विप्रलंभ शृंगाराचं अतिशय मनोहारी दर्शन  सहाव्या अंकात कालिदास घडवतो. दुर्वासांच्या शापाच्या प्रभावाने हरवलेली दुष्यंताची स्मृती कोळ्याला सापडलेली अंगठी पाहून जागृत होते. अनवधानाने आपल्या हातून शंकुतलेला अव्हेरण्याचा घोर अपराध घडल्याचं त्याच्या ध्यानात येतं आणि पश्चात्तापाच्या आगीत त्याचं कातर मन होरपळून निघतं. राजवाड्यातून अपमानित अवस्थेत बाहेर पडलेल्या शकुंतलेला, तिची आई मेनका, एका दिव्य ज्योतीच्या रुपात पृथ्वीवर येऊन क्षणार्धात स्वर्गात घेऊन गेलेली असते. राजाला या घटनेचा थांग लागणं आणि तिचा शोध घेणं हे दोन्ही सर्वस्वी अशक्य होऊन बसतं. 

विमनस्क अवस्थेत बुडून गेलेला दुष्यंत, मन रमवण्यासाठी आश्रमकन्या शकुंतलेचं एक चित्र काढायला घेतो. त्या चित्राला पूर्णत्व आणण्यासाठी कण्वांच्या आश्रमातला प्रसन्न ग्रीष्म ऋतु, निसर्गरम्य परिसर, मानवी भावभावनांशी समरस झालेले वन्यजीव, वृक्षराजी हे सगळं सगळं त्याला त्या चित्रात काढायची इच्छा असते. 

या अपूर्ण चित्राच्या वर्णनातून दुष्यंताच्या संवेदनशील मनाचे सूक्ष्म कंगोरे कालिदासाने अतिशय तरलतेने उलगडून दाखवले आहेत. आश्रमातला निवांतपणा, जोडीदाराचा निकट सहवास, नि:शब्द प्रेम ह्या सगळ्या उदात्त भावना त्याला त्या चित्रातून पुन्हा एकदा अनुभवायच्या आहेत. जिच्या पुळणीत हंसाची जोडी निवांतपणे बसलेली आहे अशी मालिनी नदी त्याला चित्रात दाखवायची आहे. तिच्या दोन्ही तीरांवर असणाऱ्या हिमालयाच्या रम्य टेकड्या, त्यावर विसावलेली हरणं दाखवायची आहेत. ज्यांच्या फांद्यांवर वल्कलं वाळत घातलेली आहेत अशा वृक्षाखाली एक काळवीटाची जोडी आहे. त्यातली मृगी आपला डावा डोळा मृगाच्या शिंगावर घासत आहे असं दृश्य त्याला चितारायचं आहे. आपला प्रियकर शिंगांची तसूभरही हालचाल करणार नाही याविषयी मृगीच्या मनात असलेला गाढ विश्वास त्याला त्या चित्रातून जिवंत करायचा आहे. त्या निर्भय नात्याची त्याच्या मनाला आस आहे. जणू स्वत:च्या प्रेमकहाणीत कमी पडलेली परस्पर विश्वासाची कसर त्याला आपल्या कल्पनेत तरी भरून काढायची आहे.   

अभयत्व ही ब्रह्मज्ञानाची शेवटची पायरी मानली जाते. बृहदारण्यक उपनिषदात जनकराजाला आत्मज्ञान झाले हे निश्चयाने सांगताना याज्ञवल्क्यऋषी म्हणतात, ’तू आता अभयाला पोहोचलास! ही शेवटची पायरी! त्यापलीकडे कुठेच पोहोचायचे नाही.’ 

त्याचप्रमाणे परस्परांवरचा गाढ विश्वास, नात्यातली निर्भयता ही कदाचित प्रेमाची शेवटची पायरी असावी. दुष्यंताच्या मनातलं हे शब्दापलीकडचं द्वंद्व वाचकाच्या काळजाला भिडतं. त्याची विकलता पाहून एका क्षणी जाणिवेच्या सर्व कक्षा गळून पडतात, त्याच्या दु:खाशी वाचक एकरूप होतो. शकुंतलेच्या आधी तोच मनोमन दुष्यंताला उदारमनाने क्षमा करतो. करुणरसातही काव्यानंदात न्हाऊन निघाल्याची ही अनुभूती  वाचकाला होणे यातच कालिदासाचा विजय आहे.

शाकुंतलाच्या कथानकाच्या ओघात सहजपणे अशा घटना घडत जातात की शेवटच्या अंकात दुष्यंत स्वर्गलोकातील मारीच ऋषींच्या आश्रमात अनपेक्षितपणे दाखल होतो. इथेच शकुंतला आणि तिचा लहान मुलगा सर्वदमन राहात असतात. दुष्यंत आपल्या या मुलाविषयी सर्वस्वी अनभिज्ञ आहे.  

सिंहाच्या छाव्याच्या खोड्या काढणारा तो धीट बालक पाहून त्याच्या मनात वात्सल्यभावना उचंबळून येते. त्याचबरोबर कायम उरात दडपलेलं अनपत्यतेचं शल्यही अधिकच बोचरं होतं. त्याला वाटतं,

अंकाश्रयप्रणयिन: तनयान् अवहन्तो

धन्या: तद् अंगरजसा मलिनीभवन्ति।

(वडिलांच्या मांडीवर बसण्यासाठी आतूर झालेल्या मुलांच्या अंगावरील धुळीने स्वत:ही माखलेले पुरुष खरोखरीच धन्य!)

हळू हळू हा आपलाच पुत्र आहे याची एकेक खूण पटत जाते आणि जिच्यासाठी जीव कासावीस झाला होता त्या शकुंतलेचीदेखील याचि देहि याचि डोळा भेट होते. या प्रसंगातही कालिदासाचं वेगळेपण प्रकर्षाने जाणवतं. दुष्यंत हा महापराक्रमी, क्षात्रतेजाने परिपूर्ण असा बलाढ्य सम्राट आहे. आपल्या चुकीविषयी शाब्दिक दिलगिरी व्यक्त करूनही तो पत्नी आणि मुलाला आपल्याबरोबर परत आणू शकला असता. पण असे केल्याने त्याच्या अपराधाची पूर्ण भरपाई झाली नसती आणि शकुंतलेच्या मनातली प्रेमभावनाही पूर्णत्वाला आली नसती. 

शकुंतला समोर आल्यावर जराही संकोच न करता, ’तुझ्या मनातलं माझ्याविषयीचं किल्मिष दूर कर, माझ्या अपराधाबद्दल मला क्षमा कर’ अशी विनवणी करत तो राजा सरळ आपल्या पत्नीचे पाय धरतो.

स्रजमपि शिरस्य अन्ध: क्षिप्तां धुनोति अहिशंकया।

आंधळ्याच्या डोक्यावर पुष्पहार घातला तरी तो सापाच्या भीतीने तो दूर झटकून देतो तसं मी तुला  अज्ञपणे अव्हेरलं याबद्द्ल हळहळ व्यक्त करतो. त्याच्या या कृत्यामुळे संकोचून ती त्याला उठवते. ’तुमच्यासारख्या प्रेमळ माणसाची बुद्धी फिरावी यात माझंच गेल्या जन्मीचं काही पाप असणार,’ हे उद्गार आपल्या अंगभूत सौजन्याने तिच्या तोंडी येतात. अपराधाचं ओझं किंचित कमी झाल्यावर, दुष्यंतामधला, शकुंतलेवर निरतिशय प्रेम करणारा प्रियकर जागा होतो आणि ’तुझ्या ज्या अश्रूंची मी अजाणतेपणाने उपेक्षा केली होती, ते अश्रू आज मला पुसू दे’ असं म्हणून स्वत:च्या हातांनी तिचे डोळे पुसतो. अभंग प्रेमाच्या उत्कर्षबिंदूपाशी कालिदास वाचकांना नेऊन आणतो.  

दुष्यंताच्या रुपात धीरोदात्त, आदर्श नायकाचं असं उत्तुंग व्यक्तिमत्त्व उभं करताना ‘पुरुष असाही असतो’ याचा सुखद प्रत्यय कालिदास आपल्याला करून देतो. 

चित्रा वाघ 
chiwagh@gmail.com

(संस्कृत विषयाची विद्यार्थिनी. ‘अथांग’ आणि ‘मनोबल-तिमिरातून तेजाकडे’ ही पुस्तके प्रकाशित. मुलाखतकार, सूत्रसंचालक, निवेदक म्हणून अनेक साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग.)

5 Comments

  1. चित्रा, काय वर्णावे तुझ्या लेखनाविषयी!!! शब्दांच्या उत्तुंग भरारीने पार त्या काळात घेऊन गेलीस आणि नाटक प्रत्यक्षात घडत आहे असे चित्र उभे केलेस. फार छान शव्द भांडार सुद्धा.

  2. चित्रा
    थोडक्यात आणि मर्मग्राही रसग्रहण केलं आहेस. कालिदासाची प्रमुख वैशिष्टयेही ओघानेच येतात लेखाचे कुठेही तुकडे पडत नाहीत नितळ प्रवाह सुरू राहतो.तुझं या लेखाबद्दल मन:पूर्वक अभिनंदन

  3. चित्रा, काय वर्णन करावे तुझ्या लिखाणाबद्दल!!! अप्रतिम. शब्दांच्या उत्तुंग भरारीने अलगद त्या काळातील नाटकात व पात्रांत नेऊन सोडलेस व संपूर्ण शाकुंतल डोळ्यासमोर उभे करतांना, कालिदासाच्याही छटा रंगवल्यास. शब्दांचा भंडाराही छान व नागमोडी वळणे घेत लेख छान संपवलास.

    मस्त वाटले. सकाळचा विचारांचा ब्रेकफास्ट मस्त.

    अशीच मौज देत रहा.

  4. एक असं रसग्रहण ज्यामुळे नाटक परत एकदा तुझ्या दृष्टिकोनातून वाचायची इच्छा होते.

Leave a Reply

Your email address will not be published.


*