कालिदासाचे विक्रमोर्वशीयम्

सौ. मिताली मंदार केतकर

कालिदासाने दोन महाकाव्ये, दोन खंडकाव्ये आणि तीन नाटके एवढी रचना केली. त्यामुळे त्याची प्रतिभा विविध वाङ्मयप्रकारात लीलया संचार करत होती असे दिसते. तो जसा महाकवि होता, तसा श्रेष्ठ नाटककारही होता. 

कालिदासाने तीन नाटके लिहिली. 

१- मालविकाग्निमित्रम् 

२- विक्रमोर्वशीयम् 

३- अभिज्ञानशाकुन्तलम् 

त्यातील ‘विक्रमोर्वशीयम् ‘ह्या नाटकाचे शीर्षक नायक- नायिकेच्या नावावरूनच देण्यात आले आहे. 

या नाटकात विक्रम म्हणजेच राजा पुरुरवा आणि देवलोकीची अप्सरा उर्वशी यांची प्रणयकथा वर्णिली आहे. ही कथा कालिदासाची स्वतःची निर्मिती नाही, कारण ही फार प्राचीन आहे . ऋग्वेदातील संवादसूक्तामध्ये ‘पुरुरवा- उर्वशी ‘ यांचा संवाद असणारे एक सूक्त आहे.

या सूक्तातील कथेत फेरफार करून अनेक ब्राह्मणग्रंथांमध्येही ही कथा आलेली आहे. त्यामुळे कालिदासाने नक्की कोणत्या ग्रंथातून ही कथा घेतली आहे , त्याबद्दल ठामपणे काही सांगता येणार नाही. परंतु कालिदासाच्या या कथानकावरून ब्राह्मण ग्रंथातील पुरूरवा- उर्वशी यांची कथा त्याने घेतली असावी असे म्हणावे लागेल. 

कथानक – भरत मुनिंच्या शापाने उर्वशी मृत्युलोकात राजा पुरूरव्याजवळ राहाते . नंतर एकदा राजा पुरुरव्याचे लक्ष एका विद्याधर कुमारीकडे जाते, म्हणून उर्वशी रागावते आणि गंधमादन पर्वतावर निघून जाते. तिथे कार्तिकेयाच्या शापाने तिला वेलीचे रूप प्राप्त होते. राजा तिच्या विरहाने व्याकुळ होऊन भटकत असताना त्याला सापडलेल्या संगमनीय मण्याच्या प्रभावाने पूर्वरूप प्राप्त झालेल्या उर्वशी बरोबर त्याची गाठ पडते. दोघं परत राजधानीत येतात. उर्वशीचा पुत्र आणि राजा यांची भेट झाल्यावर उर्वशी इंद्राच्या आज्ञेनुसार स्वर्गात परत जाते. तेव्हा राजा आपल्या मुलाला राज्याभिषेक करून वनात जाण्याच्या तयारीला लागतो , तेव्हा उर्वशी जन्मभर तुझी सहचारिणी राहील असे इंद्र राजाला आश्वासन देतो. अशा रीतीने उर्वशी कायम पुरुरव्याजवळ राहाते. या कथानकात संगमनीय मण्याच्या प्रभावाने पुरुरवा- उर्वशी यांची भेट होणे , कथानकाच्या शेवटी इंद्राने उर्वशी स्वर्गात परत यावी असे न म्हणता जन्मभर ती पुरुरव्याची सहचारिणी राहील असे म्हणणे, तसेच पुरुरव्याच्या पत्नीने केलेले व्रत इत्यादि काही प्रसंग हे कालिदासाने स्वतः निर्माण करून मूळ कथेत थोडे फेरफार केलेले दिसतात. 

या नाटकात काव्य भरपूर आढळून येते. जेव्हा पुरुरवा, उर्वशीच्या विरहाने व्याकुळ होऊन वनात तिच्या शोधार्थ निघतो तेव्हा त्यावेळचे विप्रलंभ शृंगाराचे वर्णन अत्यंत काव्यमय आहे. याच अंकातील कालिदासाने केलेला प्राकृतचा वापर वैशिष्ट्यपूर्ण आहे. कालिदासाचे भाषाप्रभुत्व या नाटकात आपल्याला मालविकाग्निमित्रम् पेक्षा जास्त चांगले आढळून येते. नाटकात पात्रे थोडी परंतु काळजीपूर्वक रंगवली आहेत. कथानक फारसे गुंतागुंतीचे नाही आणि त्याच्या रचनेत शाकुंतल इतके चातुर्यही दिसत नाही . तरीसुद्धा न चापि काव्यं नवमित्यवद्यम्! संगीतिके प्रमाणे असलेले हे नाटक संस्कृत साहित्यात एक वेगळा प्रयोग आहे म्हणूनच वैशिष्ट्यपूर्ण आहे!

सौ. मिताली मंदार केतकर

बिवली, चिपळूण
mjsanskrit@gmail.com

माझं नाव सौ. मिताली मंदार केतकर. मी गृहिणी आहे. मी संस्कृत घेऊन M. A. केलं आहे. पुण्याच्या गायत्री प्रकाशनाद्वारे प्रकाशित होणा-या , डॉ. सौ. आशा गुर्जर महोदया संपादित ‘ समर्पणम् ‘ या संस्कृत वार्षिक   अंकात गेली २ ,३ वर्षे मी संस्कृत लेख  लिहित आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*