आषाढस्य प्रथम दिवसे…..(मुखपृष्ठचित्राविषयी….)

  डॉ. स्वाती भाटवडेकर

    नेमेचि येतो मग पावसाळा…. निसर्गाचं ऋतु चक्र हे अखंड चालू असते. उन्हाने तापलेल्या धरणीला शांत करतो ज्येष्ठ महिन्यातील पाऊस आणि मग ओढ लागते आषाढाची, कारण आषाढातील पाऊस धरणीला हिरवा शालू नेसवतो. जणू पृथ्वी वरील सर्व जीवांना ओढ लावतो हा आषाढ. प्रेमी जीवांचा आवडता ऋतू हा पावसाळाच असतो, त्यामुळे आषाढस्य प्रथम दिनी आवर्जून आठवतो, मेघदूत.

  महाकवी कालिदासांनी रचलेली उत्कृष्ट साहित्य कृती म्हणजे मेघदूत.

   खरंतर शाळा, कॉलेज,(१२वी) नंतर,माझा संस्कृत भाषेशी संबंध फक्त नित्य श्लोक, स्तोत्र एवढ्या पुरताच राहिला आहे. पण संस्कृत म्हटलं की कालिदास आठवतो अन् त्याच्या रचना, शाकुंतल,कुमार संभव, रघुवंश आणि मेघदूत.

   मेघदूत मूळ संस्कृत मध्ये वाचण्यात आला नाही या पूर्वी कधी, जुजबी माहिती आहे. परंतु दर वर्षीआषाढ लागला की मेघदूत आठवतो. मूळ संस्कृत नसलं तरी मराठीतून त्या विषयी चे साहित्य, रसास्वाद, कथा, समीक्षा वाचण्याचा, ऐकण्याचा प्रयत्न करते. 

    अलका नगरीत राहणाऱ्या कुबेराचा सेवक असणाऱ्या यक्षा कडून सेवेत काहीतरी प्रमाद घडतो आणि या ‘प्रमादाला माफी नाही ‘ म्हणून कुबेर त्या यक्षाला एका वर्षा साठी नगरातून हद्दपार होण्याची शिक्षा सुनावतो. शिक्षेस पात्र ठरलेला हा यक्ष अलकानगरी तून बाहेर पडून, दूर दक्षिण दिशेला असलेल्या रामगिरी पर्वतावर एकटाच वास्तव्य करू लागतो. पण ह्या शिक्षेचे सगळ्यात जाचक दुःख त्या नव परिणीत यक्षाला असते ते म्हणजे आपल्या सुंदर, नाजूक प्रिय पत्नी चा विरह. हा विरह काळ , आठ महिने मोठ्या धीराने तो कसाबसा काढतो, पण आषाढ महिना येतो अन् अवती भवती चे वर्षा ऋतूचे वातावरण, आकाशातील जल धारानी ओथंबलेले सावळे मेघ दिसू लागताच त्याचा धीर, संयम सुटेल की काय असं वाटू लागतं, पत्नीची अनावर आठवण होऊन, विरहाचे दुःख सहन होत नाही असं वाटून, आणि आपली ही अवस्था आहे अगदी तशीच मनोवस्था आपल्या प्रिय पत्नी ची झाली असणार हे तो जाणतो. आपल्या मनातील या भावना अन् पत्नी साठी धीराचा संदेश , तिच्या पर्यंत इतक्या दूर कोण पोचवेल? असा विचार करत असताना आकाशात सावळा मेघ त्याच्या नजरेस पडतो आणि ह्या मेघाला तो दूत बनवतो आणि त्याच्याशी संवाद सुरू करतो.

   धूळ, बाष्प यांनी बनलेला हा ढग हा अचेतन आहे याचे भान यक्षाला येत नाही आणि एखाद्या सजीव दूताला निरोप द्यावा तसा तो त्या मेघाशी बोलू लागतो.

   आसपास च्या, (कुटज) फुलांचे मेघाला अर्घ्य वाहून, त्याची स्तुती करून, तो त्याला प्रेमसंदेश पोचवणारा दूत व्ह्यायची विनंती करतो. संदेश सांगायच्या आधी, यक्ष मेघदूताला ,रामगिरी ते अलकानगरी हा मार्ग त्याला विस्तृत रित्या वर्णन करतो अन् अखेरीस पत्नी साठी चा संदेश. खरंतर एवढंच कथानक आहे ह्या खंड काव्याचे. पण महाकवी कालिदासाच्या लेखणीतून ज्या तऱ्हेने उतरले आहे त्याला तोड नाही. त्यात आकर्षक शब्द चित्रं आहेत, मनमोहक निसर्ग वर्णन आहे,विरह रस आहे,प्रेम रस आहे.

 महाकवी कालिदास म्हणजे संस्कृत भाषेवर प्रचंड प्रभुत्व असलेला, बुद्धिमान कवी. त्यांचा सखोल अभ्यास, उत्तम निरीक्षण शक्ती, रम्य कल्पना विलास, उपमा कौशल्य आणि विपुल शब्द संपत्ती ही त्यांच्या साहित्यकृतीत मेघदूतकाव्यात पदोपदी जाणवते, विल्यम शेक्सपियर चे इंग्रजी साहित्यात जे स्थान आहे त्या पेक्षा कितीतरी अधिक महत्त्वाचे स्थान आणि योगदान महाकवी कालिदासाचे संस्कृत साहित्यात आहे. म्हणूनच अनेक देशी तसेच परदेशी साहित्यिकांना त्याचे भाषांतर, अनुवाद, भावानुवाद करण्यासाठी आकृष्ट करतात. केवळ साहित्यिक च नव्हेत तर, इतर क्षेत्रातील, मान्यवरांना ही मेघदूताच्या अनुवादाचा मोह आवरला नाही. आपल्या मराठी मध्ये श्रेष्ठ कवी कुसुमाग्रज असोत,बा भ बोरकर असोत, ज्येष्ठ कवयित्री शांताबाई शेळके असोत किंवा वसंत बापट ,ह्या सर्वांनी आपापल्या स्वभाव धर्मानुसार, पिंडा नुसार त्याचे अनुवाद केले. त्यात एक नाव असं ही आहे ते म्हणजे प्रसिध्द अर्थतज्ञ डॉ .सी. डी. देशमुख.त्यांच्या सारख्या अर्थवेत्त्याला ही अनुवाद करण्याची मोहिनी मेघदूताने घातली.ह्या विद्वानांनी जशी त्यांची लेखणी चालवली तसे अनेक प्रसिध्द, प्रथित यश चित्रकारांना ही ह्यातील निसर्गवर्णने वाचून, ऐकून आपला कुंचला, रंग, हाती घ्यायला भाग पाडले. आणि अनेकांनी मेघदूतावर उत्तमोत्तम चित्रमाला रेखाटली. तरीही या सर्वांचे एकमत आहे की महाकविंच्या मूळ कलाकृती पुढे त्यांची लेखणी आणि कुंचला कमी पडतो.

     महाकवी कालिदासांची ही अलौकिक साहित्यकृती हे एक अक्षय, अनमोल अक्षरधन आहे. त्याच्या निर्मितीला आज हजारो वर्षे लोटली तरी त्याची दखल घेतली जाते यातच त्याचे यश सामावले आहे असं मला वाटतं.

(आषाढस्य प्रथम दिना च्या निमित्ताने माझ्या हातून ही अल्पशी चित्र अन् शब्द सेवा घडली याचा मला आनंद वाटतो. आता भविष्यात मूळ संस्कृत मेघदूत काव्याचा यथा मती यथा शक्ती रसास्वाद घ्यायची माझी इच्छा आहे.)

©️ डॉ स्वाती सतीश भाटवडेकर

    drswatisb@gmail.com

डॉ. स्वाती सतीश भाटवडेकर, वास्तव्य अंधेरी , मुंबई,शिक्षण आणि व्यवसायाने दंत शल्यचिकित्सक (Dentist).  लेखन आणि चित्रकला यांची विशेष आवड. निरनिराळ्या माध्यमात रेखाचित्रे, निसर्ग चित्रे काढायला आवडतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*