कालिदासांना पत्र

डॉ. विजया रामचन्द्र जोशी, संस्कृतानुरागिणी

कविकुलगुरू कालिदास महोदयांना,

विनम्र अभिवादन !

संस्कृत कविवर्य !

पत्र लिहिण्यास आनंद वाटतो की ” कालिदास दिनाच्या निमित्ताने देशभरात आंतररजाल ( internet ) माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची रेलचेल सुरू आहे. सगळा भारत देश कालिदासमय झाला आहे. आणि का होणार नाही? सप्तरंगी इंद्रधनुष्याप्रमाणे रसिकांचे मन मोहून टाकणार्या कविवर्यांच्या सप्त साहित्यकृतींनी रसिकांना अक्षरश: वेड लावलं आहे.उगाच नाही ‘कविकुलगुरू कालिदास’ म्हणून तुमची दिगन्त कीर्ती पसरली.

            कविश्रेष्ठ कालिदास महाशय ! त्यापैकी एका साहित्यकृतीच्या संबंधात मला आपल्याला पत्ररूपाने भेटायचे आहे. यशाच्या शिखरावर पोहोचलेलं तुमचं सर्वश्रेष्ठ नाटक म्हणजे “अभिज्ञान शाकुंतलम् “. अखिल विश्वात गाजलेलं हे नाटक म्हणजे स्वर्ग आणि धरा यांचं मीलन कुठे झालं असेल ? असा प्रश्न उपस्थित झाला असता ‘शाकुन्तल’ हेच नाव मुखावर आलं असं जर्मन कवी गटे म्हणला होता. आणि त्याला हे नाटक इतकं आवडलं की नाटकाचं पुस्तकच डोक्यावर घेऊन तो नाचला म्हणतात. ‘काव्येषु नाटकं रम्यम् । तत्र रम्या शकुन्तला ।’ असं अढळ स्थान देणारी ही तुमची नाट्यकलाकृती रसिकांची ह्रदयं जिंकणार नाही तर काय?

            कविवर्य ! तुम्ही शिवाचे नि:सीम भक्त. त्यामुळे नाटकाच्या नांदीच्या – “या सृष्टि: स्रुष्टुराद्या …. या हविर्या च होत्री………………………………तनुवरतु वस्ताभिरष्टाभिरीश:।” या श्लोकातूनही ‘अष्टमूर्ती शिव आपणा सर्वांचे रक्षण करो ‘ अशीच औचित्यपूर्ण प्रार्थना आपण केलित आणि शेवटच्या पसायदानातही अर्थात भरतवाक्यात समाजासाठी मागणं मागून “नीललोहित शिवाने आपल्याला मोक्षापर्यंत पोहोचवावं ” असे सुंदर मुक्तीचे मागणे केलेत. केवढी ही नि:स्पृहता म्हणावी ! ………आपल्या या नाटकाचा उपजीव्य ग्रंथ महाभारत. पण त्यातल्या दुष्यन्त-शकुन्तलेच्या आख्यानात तुम्ही आपल्या प्रतिभाशक्तीने अनेक नवे प्रसंग योजून किती रंगत आणलीत. आता हेच बघा ना ! “मी विश्वामित्र आणि मेनका ह्यांची कन्या आहे” हे महाभारतातल्या शकुंतलेनं राजा दुष्यन्ताला सरळ सांगून टाकलं. त्यामुळे ही लावण्यवती क्षत्रिय कन्या आहे हे लक्षात येऊन, ‘मी हिच्याशी गांधर्व विवाह करू शकतो’ आणि शकुंतलेनेही ‘माझा पुत्र राज्याचा वारस व्हावा’या अटीवर विवाहाचा निर्णयही स्वत:च घेतला. पण कविश्रेष्ठ ! तुम्ही ही दोन्ही पात्रे आपल्या कौशल्याने बदलून टाकलीत. आदर्श पती अन् आदर्श पत्नी आपल्या नाटकात घडवलीत. ‘धीरोदत्त’नायकाच्या रूपाने आदर्श माणूस आणि आदर्श राजा तुम्ही घडविलांत आणि शकुन्तला म्हणजे सुकुमार, लाजाळू, भारतीय युवतीचं प्रतिनिधीत्व करणारी – ‘कण्वांची उच्छ्वसितमिव’ अशी नायिका. आपल्या नाटकांत तिने राजाशी गांधर्व विवाह केला. पण तो निर्णय तिने स्वत: नाही घेतला. त्यासाठी तिने प्रियंवदा आणि अनसूया या मैत्रिणींचं अनुमोदन मिळवलं. ह्यात तुमची विचारशीलता आणि संस्कृती यांचा सुरेख मिलाप झाला. तो खरोखरच प्रशंसनीयच.

कविकुलगुरो ! …………मातृदेवो भव ! पितृदेवो भव ! आचार्यदेवो भव ! अतिथिदेवो भव ! ही वैदिक संस्कृती संपूर्ण नाटकभर दर्शवली. या नाटकातली ‘अतिथि संकल्पना ‘ अधोरेखित करायलाच हवी. अतिथी सम्मानाबरोबरच अजाणतेपणी केलेल्या अतिथि-परिभावनेमुळे दुर्वासांच्या शापाचा परिणाम शकुन्तलेला भोगावा लागला. शकुंतलेचा त्याग आणि तिचा केला गेलेला अव्हेर हे नाटकाचं बीज आहे. त्यासाठी तुम्ही अप्रतिम योजना केली. ती म्हणजे दुर्वाासांचा शाप आणि अभिज्ञानार्थं अंगठी. प्रथम , चतुर्थ आणि पंचम अंकात अतिथी संभावनेचे प्रसंग फार सुंदर चित्रित केलेत. अतिथि-सत्काराचा आपण दिलेला संदेश आजच्या काळातही तितकाच महत्त्वाचा आहे.

कविमहोदय ! तुमच्या संवादातल्या वाक्यावाक्यात शब्दांचे अंकुर फुटताहेत. त्यात गर्भितार्थ ( व्यञ्जना) आहे. बघा ना, चक्रवर्तिनम् पुत्रम् प्राप्नुहि। या सुरूवातीच्या आशीर्वादावरून राजा दुष्यन्ताला पूर्वीच्या राण्यांपासून पुत्रप्राप्ती झाली नव्हती हे सूचित केलं आहे आणि नाटक सुखान्त होणार ही निश्चितच भविष्याची आनंददायक सूचनाही दिलेली आहे.

महाकवे, नाटकाचा ‘चतुर्थ अंक’ नाटकाच्या दृष्टीने कळस आहे. तत्रापि च ‘चतुर्थोङ्कस्तत्र श्लोकचतुष्टयम्’ हा जो गौरव केला जातो तो सार्थच आहे. शकुंतलेशी गान्धर्व विवाह करून, स्वनामाङ्कित अंगठी शकुंतलेच्या बोटात घालून दुष्यन्त राजा हस्तिनापूरला निघून जातो. राजाचा क्षत्रिय धर्म संस्कृतीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे हे आपण विसरला नाहीत.

            कण्वमुनींची मानसकन्या शकुन्तला आणि राजा दुष्यन्त यांचा विवाह झाला. हे काश्यपांना म्हणजेच कण्वमुनिंना आकाशवाणीतून सांगितले. वा ! केवढे हे कल्पनाचातुर्य !

शकुंतलेच्या सासरी पाठवण्याचा प्रसंग इतका बहारदार वर्णावा तो कविश्रेष्ठ तुम्हीच !  अगदी ह्रदय हेलावणारा तो प्रसंग आणि त्यावेळी केलेल्या उपदेशाचे चार श्लोक म्हणजे या अंकाचं वैभव आहे. शकुन्तलेच्या निमित्ताने सर्वच काळातल्या मुलींसाठी असलेला अमर असा तो उपदेश. त्याचवेळी निसर्गानं आपलं वैभव मुक्तपणानं उधळून टाकलं आहे. निसर्ग पूर्णपणे मानवी( सजीव ) झाला आहे. कोकीळेचं ते मधुर गान. वृक्षवेलींनी शकुन्तला सासरी जाणार या कल्पनेने माना खाली टाकून दिल्यात. हरिणांनी आपल्या तोंडातले घास टाकून दिलेत. या सगळ्यांचं शकुन्तलेवर असलेलं प्रेम किती मानवी तर्हेने  दर्शविलंत तुम्ही ! खरंच किमयागार आहात तुम्ही.शब्दाच्या कुंचल्यातून अफलातून चित्र रेखाटावीत ती तुम्हीच.

सहाव्या अंकात एक हलकाफुलका प्रसंग अतिशय सुंदर रेखाटला आहे. शकुन्तलेची अंगठी एका कोळ्याला सापडते काय ! तो ती बाजारात विकायला नेतो काय ! राजाचे पोलिस तिथे येऊन त्याला राजदरबारात घेउन जातात काय ! अन् अंगठी पाहिल्याबरोबर राजाला शकुंतलेचं तात्त्काळ स्मरण होतं. त्यासाठी राजाने स्वत:ला दोष देणं ही सगळी दुष्यंताच्या मनातील खंत इतक्या चपखलपणे प्रदर्शित केलित की त्यावरून दुष्यन्ताचं शकुन्तलेवरचं प्रेम मुळीच कमी झालं नव्हतं. फक्त अडसर झाला होता तो दुर्वासांच्या शापाचा. नायक धीरोदात्तच आहे याची प्रचिती रसिकांपर्यंत फार सुंदर शब्दांत पोचवलीत आपण.

नाटकाचा आरंभ कण्वऋषींच्या आश्रमात तर शेवट मारीच ऋषींच्या आश्रमात. असा आश्रमातून आश्रमाकडे प्रवास आपण मोठ्या कुशलतेने घडविला.

शेवटच्या अंकात 2/3  वर्षांचा भरत, त्याच्या हातावर दुष्यन्ताला दिसलेली चक्रवर्ती पदाची चिन्हे, मातीचा मोर. वत्स ! “शकुन्तलावण्यम् पश्य” या दासीच्या वाक्यावरून शकुन्तलेचं नाव कानावर पडणं , त्यातून हा आपलाच पुत्र आहे ह्याची राजाला खात्री पटणे असा हा पिता-पुत्र भेटीचा प्रसंग लाजवाब!

“श्रृंगार ललितोद्गारे कालिदास: विशिष्यते” ही तर कविराज ! आपली ख्यातीच आहे. पण तेवढ्याच ताकदीने वीर, रौद्र, करूण,शांत, अद्भूत याही रसांचा परिपोष फार सुंदर केला आहे. आणि-

‘ उपमा’ अलंकाराचे तर तुम्ही बादशहाच आहात. ‘ उपमा कालिदासस्य’ ही उक्ती रसिकांच्या मुखात कायमच असते. शब्दांच्या कुंचल्यातून अफलातून चित्र रेखाटावी ती तुम्हीच. खरं तुम्ही उत्तम चित्रकार आहात. अजूनही खूप लिहिण्यासारखं आहे पण इथेच थांबावं लागतं.

पुरा कवीना गणनाप्रसङ्गे कनिष्ठिकाधिष्ठित कालिदास:।

अद्यापि तत्तुल्यकवेरभावात् अनामिका सार्थवती बभूव॥

धन्यवाद.

संस्कृतानुरागिणी डॉ. विजया रामचन्द्र जोशी सेवानिवृत्त संस्कृत प्राध्यापिका धरमपेठ कला -वाणिज्य महाविद्यालय, नागपूर Email id: vijayajoshi595@gmail.com Mobile No.: 9766271168

 डॉ. विजया रामचन्द्र जोशी

  • धरमपेठ कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय, नागपूर संस्कृत विभाग प्रमुख.

2002 मध्ये सेवानिवृत्त.

  • विद्या भारती या संस्थेत संस्कृत भाषण हसत खेळत शिकविण्यासाठी नऊ वर्षांपर्यंत संपूर्ण विदर्भात शिबिरे घेतली आहेत.
  • ‘काव्यप्रकाशावरील टीकाकार- एक अभ्यास’ ह्या विषयावर डॉ.मधुर आष्टीकर ह्यांच्या मार्गदर्शनान्तर्गत आचार्य पदवी ( Ph.D) प्राप्त केली.
  • ‘स्नातकोत्तर विभाग’- नागपूर विश्वविद्यालयात अंशकालीन अध्यापन.
  • संस्कृत-भाषा-प्रचारिणी-सभा नागपूरहून प्रकाशित होणार्या  ‘संस्कृत भवितव्यम्’ या साप्ताहिकात नियमित लेखन.
  • कविकुलगुरू-कालिदास-संस्कृत-साधना पुरस्कार जाहीर.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*