नगाधिराजः हिमालयः

डॉ. आसावरी बापट

पर्वत म्हणजे काय? ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं झाल्यास किंवा पर्वताची व्याख्या करायची झाल्यास, ‘इतर भूस्तराहून नैसर्गिकरित्या उंच उचललेला आणि निमुळत्या बाजूंचा भूभाग म्हणजे पर्वत,’ अशी सर्वसामान्य शास्त्रीय व्याख्या केली जाते. पण सर्वसामान्यांसाठी दगडमातीचा उंच उचललेला भूभाग जेव्हा महाकवी कालिदासांच्या मृदूल, मुलायम पण सामर्थ्यशाली बोटांतून काव्यात अवतरतो तेव्हा तो ‘नगाधिराज’ होऊन जातो.

जगाला सळो की पळो करून सोडणाऱ्या तारकाचा वध शिव-पार्वतीचा पुत्र करणार असतो. शिवाची पत्नी आणि देवांचा सेनापती स्कंदाची माता होणारी असामान्य स्त्री म्हणजे पार्वती! ती कोणत्या सामान्य मातापित्यांच्या पोटी थोडीच जन्म घेणार! तिचा जन्म होतो तो ‘ओषधीप्रस्थ’ ह्या वैभवशाली राजधानीचा राजा हिमालय आणि मुनींनाही माननीय अश्या मेनेच्या पोटी. कालिदासाच्या ‘कुमारसंभव’ ह्या काव्याचा आरंभ होतो तोच मुळी पार्वतीचा पिता पर्वतांचा अधिराजा हिमालयाच्या वर्णनाने –

अस्त्युत्तरस्यां दिशि देवतात्मा हिमालयो नाम नगाधिराजः।

पूर्वापरौ तोयनिधी वगाह्य स्थितः पृथिव्या इव मानदण्डः।।

‘काव्यमीमांसा’ ह्या आपल्या ग्रंथात राजशेखरांनी काव्याची बारा उत्पत्तीस्थाने सांगितली आहेत. त्या बारा उत्पत्तीस्थानांमध्ये ‘कौटिलीय अर्थशास्त्रा’चा समावेश आहे. श्रुती, स्मृती, पुराणांबरोबर कालिदासाचा अर्थशास्त्राचा प्रगाढ अभ्यास होता.

आपण जे सांगतो ते सिध्द करण्याची जबाबदारी पूर्वीचे कवी घेत होते. त्यामुळे हिमालयाला जर ‘नगाधिराज’ हे विशेषण वापरले असेल तर त्याचे अधिराजत्व  सिध्द करण्याची जबाबदारी कालिदासानी घेतली आहे आणि ती सुध्दा अगदी राजनीतीशास्त्राच्या आधारे!

ब्रह्मदेवाकडून मिळाले अधिराजत्व

अहो, हिमालयाला हे अधिराजत्व मिळालं आहे ते कुणा सामान्य व्यक्तिकडून नाही तर प्रत्यक्ष सृष्टीकर्त्याकडून! सोमवल्लीसारख्या यज्ञातील अत्यंत महत्वाच्या वनस्पतीचा उगम हिमालयात होतो ते बघून आणि पृथ्वीला धारण करण्याची क्षमता बघून प्रत्यक्ष सृष्टीकर्ते ब्रह्मदेव हिमालयाला केवळ ‘नगाधिराज’ हीच पदवी देऊन थांबले नाहीत तर देवांबरोबर हवी ग्रहण करण्याचाही अधिकार दिला.

चामरधारी राजा

लाङ्गूलविक्षेपविसर्पिशोभैरितस्ततश्चन्दमरीचिगौरेः।

यस्यार्थयुक्तं गिरिराजशब्दं कुर्वन्ति बालव्यजनैश्चमर्यः।।

राजचिन्हांशिवाय राजा असूच शकत नाही आणि हिमालयाला आपण  नगाधिराज म्हणजे पर्वतांचा अधिराजा असे म्हणून बसलो आहोत, ‘मग त्याची राजचिन्ह कोणती?’ वाचकांना हा प्रश्न पडू शकतो, ह्याची कल्पना कालिदासाला आहे. राजचिन्हातील प्रमुख अश्या ‘चामर’ किंवा मराठी भाषेतील ‘चवऱ्या’ ह्या नगाधिराज हिमालयाला कुमारसंभवात ढाळल्या आहेत. चामर हे चमरी नावाच्या हरणांच्या शेपटीच्या केसांपासून बनवलं जाई म्हणूनच त्याला ‘चामर’ असं म्हटलं जातं. हिमालय हे ह्या चमरी हरणांचं निवासस्थान. तीथे ती मुक्तपणे बागडताना आपल्या शेपट्या इकडून तिकडे नाचवत असत. त्यावेळी रेशमी, मुलायम, चंद्रकिरणांप्रमाणे तेजस्वी असे त्यांच्या शेपट्यांवरील केस राजाला ढाळल्या जाणाऱ्या चामरांचे काम करत आणि हिमालयाचं अधिराजत्व सिध्द करत!

समृध्द कोश आणि राजधानी

‘धर्म आणि काम हे दोन्ही पुरुषार्थ कोशावर अवलंबून असल्याने प्रत्येक राजाने आपला कोश समृध्द ठेवला पाहिजे’ असा राजनीतीतील दंडक आहे. हिमालयाच्या वैभवाची आपण सामान्य माणसं कशी काय कल्पना करू शकणार? पण कुठल्याही गोष्टीचं आधिक्य झालं की त्याचं मोल संपतं. वैभवाचा अतिरेक झाला की छोट्या मोठ्या रत्न मोत्यांकडे कोण पाहील? अत्यंत वैभवशाली औषधीप्रस्थ नगरीत काहीस असच झालं आहे.  ओषधीप्रस्थ नगरीच्या वैभवाचे वर्णन करताना कालिदास म्हणतो, ‘इथली रत्ने तर तेजस्वी आहेतच पण इथल्या वनस्पतीही रत्नांसारख्या तेजस्वी आहेत’.

‘हत्तींचं गंडस्थळ फोडणाऱ्या सिंहांच्या नखात अडकलेले मोती हे सिंह ज्या मार्गावरून जातात त्या मार्गात विखुरले जातात. पण वैभवशाली ओषधीप्रस्थातील किरातांना त्या मोत्यांचं फारसं काही वाटत नाही. अहो असे मोती तर औषधीप्रस्थात सर्वत्र विखुरलेले आहेत. त्यामुळे किरात त्या मोत्यांकडे बघतसुध्दा नाहीत. त्यांना कौतुक आहे ते त्या सिंहांची शिकार करून आपला पराक्रम दाखवण्याचं!’ अशी पराक्रमी प्रजा हे राज्याच्या सप्तांगातील एक अंग मानलं गेलं आहे.

पितृवत् पालयेत् प्रजाम्

‘राजाने आपल्या प्रजेचे रक्षण पित्याप्रमाणे केले पाहिजे’, हा भारतीय राजनीतीतील हा एक प्रमुख नियम! एखाद्या पित्याप्रमाणे हिमालय आपल्या प्रजेच्या वेगवेगळ्या अपेक्षा कश्या पूर्ण करतो, पहा बरं –  

हिमालयाच्या ओषधीप्रस्थ ह्या राजधानीत यक्ष, किन्नर, अप्सरा, विद्याधर, ऋषी-मुनी असे विविध श्रेष्ठ नागरीक निवास करतात. ह्या साऱ्यांच्या वेगवेगळ्या मागण्या पूर्ण करताना हा प्रजावत्सल राजा कुठेच कमी पडत नाही.

शृंगार, विलासात रममाण अप्सरांना लागणारी अलत्यासारखी श्रुंगाराची साधनं आपल्या लाल रंगाच्या धातूंच्या साठ्यातून पुरवण्याची जबाबदारी नगाधिराज पूर्ण करतो. कुठल्याही पत्रासाठी लागणारं साहित्य म्हणजे ‘पत्र’ आणि ‘शाई’. हिमालयावरील विद्याधऱ सुंदरींना आपल्या प्रियकरांना प्रेमपत्र पाठवायची तर कशी पाठवणार? भूर्जपत्राच्या रूपाने कागद आणि धातूरसांच्या रूपाने शाई हा राजा विद्याधर सुंदरीना पुरवून त्यांची अडचण दूर करतो. गानकलेत पारंगत असे किन्नरही इथले निवासी. त्यांना इतर कलाकारांची, वाद्यांची थोडी साथ मिळाली तर गायकीचा आनंद द्विगुणीत होणार ह्याची जाण हिमालयाला आहे. किन्नरांच्या नाजूक आवाजांना लागणारी तशीच नाजूक वाद्यसाथही तो उपलब्ध करून देतो. दऱ्यांमधून उठलेला वायू बाबूंच्या रंध्रांतून फिरून बासरीची तान जेव्हा ह्या किन्नर गायकांबरोबर घेतो तेव्हा त्यांच्या गायनाचा आनंद काय वर्णावा!  अहो इतकच कशाला, वनेचरांच्या शृंगारासाठी लागणारा ‘सुरतप्रदीप’ म्हणजे आजच्या काळातील ‘नाईटलँप’सुध्दा आपल्या रत्नांसारख्या तेजस्वी वनस्पतींद्वारे हिमालय पुरवतो. बरं हे सुरतप्रदीप असे अलौकिक की त्यांना ना वात लागत ना तेल लागत!     औषधीप्रस्थातील वनेचरांचीसुध्दा काळजी हिमालय पित्याच्या वात्सल्याने कशी घेतो ते पहाण्यासारखं आहे. वनेचरच ते! ते दऱ्यांतील गुहांमधूनच रहाणार! त्यांच्या गुहांना कुठली आली दारं आणि कुठले पडदे! दारं आणि पडदे नसलेल्या त्यांच्या गुहांमधून वनेचरांचा रांगडा श्रुंगार बहरून येतो आणि मग ते आपल्या स्त्रियांची उत्तरीय काढून टाकतात. त्यावेळी ह्या स्त्रियांची अवस्था मात्र फारच अवघडली होते. अश्या परिस्थितीत ह्या स्त्रियांना इतर कोणी पाहू नये म्हणून हा हिमालय पाण्याने ओथंबून आलेले मेघ त्या गुहांवर पडद्यासारखे अलगद खेचून टाकतो आणि आपल्या नगरीतल्या ह्या स्त्रियांचं लज्जा रक्षण करतो.

आपल्या विद्याधर, अप्सरा, वनेचर अश्या प्रजेचं रक्षणं करताना, त्यांचं भरण, पोषण करताना कुठेच कमी न पडणारा हा राजाधिराज देवांनाही वंदनीय अश्या ऋषीमुनींच्या रक्षणासाठी झटला नाही तरच नवल! सप्तर्षींचं स्थान सर्वोच्च! अर्थातच ते उत्तुंग अश्या हिमालयाच्याही वरून जातात. इतक्या उंचीवरून जाणाऱ्या ऋषीमुनींच्या मनात देवांना कमळं अर्पण करण्याची इच्छा होते. त्यांच्या इच्छेची पूर्ती करण्यासाठी लागणाऱ्या कमलपुष्पांची व्यवस्था हिमालय करतो ती आपल्या सर्वोच्च शिखरांवरील तळ्यात उमलणाऱ्या कमळांनी!

आपल्या नगरीतील वातावरणाची सूक्ष्म जाणं हिमालयाला आहे. उन्हाळ्यात सरळ खाली येणाऱ्या तप्त सूर्यकिरणांपासून ऋषींच रक्षण करण्यासाठी हा राजा आपल्या उत्तुंग नगरीच्या अर्ध्यावर मेघ आणून ठेवतो आणि त्यांच्या छायेत ऋषीमुनी विश्राम करतात. पण हेच अर्ध्यावर आलेले मेघ जेव्हा भयंकर वृष्टी सुरू करतात तेव्हा ऋषीगण पर्वत शिखरांच्या वरील भागाचा आश्रय घेतात. म्हणजे कोणत्याही वातावरणात हिमालय आपल्या प्रजेचं रक्षण करताना कोणतीही कसूर होऊ देत नाही.     

एकोSपि दोषः

अर्थशास्त्रात राजाच्या गुणांबरोबर राजाच्या दोषांचीही चर्चा येते. त्यानुसार राजा हिमालयाचाही एक दोष दाखवताना महाकवी म्हणतो, ‘अनंत रत्नांचा प्रभव असलेल्या ह्या हिमालायाकडे ‘हिमत्व’ हा एकच दोष आहे पण त्याच्या असंख्य गुणांमुळे त्याचा हा दोष चंद्राच्या किरणांमध्ये ज्याप्रमाणे त्याचा काळा डाग लपून जातो त्याप्रमाणे लपून जातो’.   

राजनीतीतील गुण

अर्थशास्त्रात आभिगामीक, प्रज्ञा, उत्साह आणि आत्मसंपत् अश्या राजाच्या गुणांची चर्चा येते. राजनीतीत पारंगत असलेला राजा उत्साहगुणाने युक्त होऊन अखंड संपत्ती निर्माण करतो त्याप्रमाणे राजनीतीत पारंगत अश्या ह्या नगाधिराज हिमालयाने उत्साहगुणाने युक्त होऊन पार्वतीसारखी अलौकीक संपत्ती निर्माण केली.  

उच्च राजगुणांनी युक्त नगाधिराज हिमालयाचं हे वर्णन वाचताना आपल्या मनात त्याची ललकारी तयार होऊन घुमू लागते,

“देवतात्मा, प्रजावत्सलः, यज्ञाङ्गप्रभवः, विविधरत्नाधिपतिः, दिव्यप्रजाकरः, राजकारणधुरंधरः, कुलपर्वतः पृथिव्या मानदण्डः नगाधिराज हिमालयः SSS “

डॉ. आसावरी उदय बापट
संचालक, स्वामी विवेकानंद सांस्कृतिक केंद्र, भारतीय दूतावास, यंगून, म्यानमार

2 Comments

  1. कौटिलीय अर्थशास्त्राच्या पार्श्वभूमीवर नगाधिराजाचे उत्तम वर्णन!

Leave a Reply

Your email address will not be published.


*