प्रजानां विनयाधानात्

अतुल ठाकुर

कालिदासाच्या रघुवंशसंबधी माझी अवस्था एखाद्या चित्रप्रदर्शनाला गेल्यावर पहिल्याच चित्राने भान हरपणार्‍यासारखी झाली आहे. त्यापुढे एकाचढ एक कलाकृती असतील हे माहीत असूनही पहिल्याच चित्राने मन जिंकावे आणि तेथून हलताच येऊ नये इतका मी रघुवंशातील राजा दिलीपाच्या प्रेमात आहे. खरं तर रघुवंशात भारतवर्षाच्या विराट पटलावर एकामागोमाग एक असे ते राजे येऊ लागतात. हे रघुकुलातील राजे म्हणून त्यांचे काही अंगभूत असे गुण कालिदासाने वर्णन केले आहेत. तरीही प्रत्येक राजाचे ठळक असे स्वतःचे व्यक्तिमत्व आहेच. एका दिलीप राजाबद्दलदेखील या छोट्याशा लेखात मला लिहिता येणार नाही याची मला नम्र जाणीव आहे. तरीही मी प्रयत्न करणार आहे. कारण कालिदासाची कलाकृती म्हणजे आम्हा काव्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी अलिबाबाची गुहा आहे. अतिवैविध्यपूर्ण रत्नांनी भरलेली. घेताना आपलीच झोळी तोकडी आहे याची स्पष्ट जाणीव करून देणारी. दुसरे कारण म्हणजे माझ्यासारखा आनंदवर्धनाच्या ध्वनिसिद्धान्ताकडे कल असणारा विद्यार्थी नेहेमी अभिधा आणि लक्षणे नंतर व्यंजनेत काय असेल याचा विचार करु लागतो. त्यादृष्टीने कालिदासाच्या उपमांकडे पाहू लागले म्हणजे आनंदाचे अक्षय झरे दृष्टीस पडू लागतात. त्यात कितीही मनसोक्त डुंबावे. मन भरत नाही. रघुवंशाच्या पहिल्या तीन सर्गामध्ये दिलीप राजाचे वर्णन आहे. त्यातल्या पहिल्या सर्गातील फक्त काही श्लोकांचा या लेखात विचार केला आहे. असा हा राजा दिलीप वैवस्वत मनुच्या पवित्र वंशात जन्माला येतो. कालिदासाच्या रघुवंशात सविस्तर वर्णन आलेला हा पहिला राजा आहे.

क्षीरसागरात ज्याप्रमाणे चंद्र जन्मला असे या राजाबद्दल कालिदास म्हणतो. म्हणजे हे बाळ गौरवर्णी, गोंडस आणि देखणे आहे. शिवाय जलतत्वाचा उल्लेख केल्याने त्याच्यात आर्द्रता, शीतलता आणि सौम्यपणाही आहे. याचा अर्थ त्याला लहानपणापासून दुसर्‍याबद्दल सहानुभूती, कणव आहे. त्यानंतर कालिदासाने वेळ न घालवता हे बालक तरुण झाल्यावर कसे दिसू लागले याचे वर्णन केले आहे. ‘व्युढोरस्को वृषस्कंधः’ म्हणजे विशाल छाती असलेला आणि वृषभाप्रमाणे उन्नत खांदे असलेला, पुढे शाल वृक्षाप्रमाणे लांब बाहूंचा असा उल्लेख आहे. तरुणपणी या देखण्या बालकाचे रुपांतरण एका जबरदस्त बलवान, हाडापेराने मजबूत, उंच्यापुर्‍या माणसात झाले आहे. कालिदासाने ज्या तर्‍हेने दिलीपाच्या देहाचे वर्णन केले आहे त्यावरून असे जाणवते की राजा दिलीपाच्या शारीरिक व्यक्तिमत्वाचा प्रभाव अत्यंत प्रबळ आहे. क्षात्रधर्मच मूर्तींमंत मानवी रुपात जन्माला आला आहे असे दिलीपाचे रुप आहे.  त्याच्यात वसलेली ही क्षत्रियाची लक्षणे अधोरेखित करताना कालिदास म्हणतो दिलीप हा सर्वाधिक बलवान, सर्वाधिक तेजस्वी आणि पृथ्वीवरील जणू मेरु पर्वतच आहे. म्हणजे हा क्षात्रधर्माचा ओतीव पुतळाच आहे.

राजा दिलीपाच्या व्यक्तिमत्वाचे वर्णन केल्यावर पुढे त्याचे गुणवर्णन करताना कालिदासाच्या प्रतिभेवर काली प्रसन्न आहे म्हणजे काय याचा पुरेपूर प्रत्यय येतो. कालिदास म्हणतो आकाराप्रमाणे प्रज्ञा असणारा, प्रज्ञेप्रमाणे शास्त्राभ्यास करणारा, शास्त्राभ्यासाप्रमाणे उद्योग करणारा आणि उद्योगाप्रमाणे फलप्राप्ती करणारा असा हा राजा आहे. दिलीपाचे व्यक्तिमत्व अफाट आहे, त्याप्रमाणेच त्याची बुद्धीही अफाटच असणार हे कालिदास येथे सुचवित आहे. सर्व तर्‍हेच्या शास्त्रांचा त्याचा अभ्यास आहे. कालिदासाला शस्त्रांबरोबर शास्त्राभ्यासातही प्रवीण असलेला हा राजा आहे हे ठळकपणे सांगायचं आहे. त्यासाठी नंतरच्या एका श्लोकात त्याने सैन्याने वेढलेल्या राजा दिलीपाची दोनच साधने सांगितली आहेत. एक शास्त्र आणि दुसरे प्रत्यंचा चढवलेले धनुष्य. त्याला तिसर्‍या गोष्टीची आवश्यकता नाही. शास्त्राने सांगितलेल्या मार्गावर चालून तो आपले व्यवहार करीत असतो आणि त्याप्रमाणे त्याला फल मिळत असते. आपल्याकडे शस्त्र आणि शास्त्र या दोन्हीमध्ये तितक्याच प्रवीण असलेल्या व्यक्ती फारशा आढळत नाहीत. महाभारतात अर्जुन धनुर्विद्येत पारंगत होता पण त्याला तत्त्वज्ञान मात्र श्रीकृष्णाकडून ऐकावं लागलं. नीतिचा सातत्याने उपदेश करणार्‍या विदुराने शस्त्रच हाती घेतलं नाही. महाभारतातलं दोन्ही बाबतीतील यशस्वी प्राविण्याचं एकमेव उदाहरण श्रीकृष्णाचं आहे. रामायणातील प्रभु रामचंद्राला योगवसिष्ठात वसिष्ठ मुनिंनी उपदेश केला आहे. यापार्श्वभूमीवर शस्त्र आणि शास्त्र या दोन्हीत पारंगत असलेला राजा दिलीप वेगळाच उठून दिसतो. हे एक सर्वांगसुंदर व्यक्तिमत्व आहे.

कालिदासाच्या मानवी स्वभावाच्या अचूक आकलनाबद्दल बरंच लिहिलं गेलं आहे. हे आकलन नुसतं मानवी स्वभावाचं नाही तर मानवाच्या आपापसातील सूक्ष्म व्यवहाराचंही आहे हे पुढच्या श्लोकात दिसतं. येथे त्याने राजा दिलीपाला समुद्राप्रमाणे दूर आणि जवळ ठेवणारा म्हटले आहे. समुद्रातील भयंकर जलचरांमुळे आणि त्याच्या अथांगतेमुळे समुद्राची भीतीही वाटते आणि त्याच्या अंतरंगात असलेल्या रत्नांमुळे त्यात खोल बुडीही मारावीशी वाटते. त्याचप्रमाणे राजा दिलीपाच्या व्यक्तिमत्वाचा थांग लागत नाही. हा मनोहारी देखणा आणि बलदंड राजा एकाचवेळी शास्त्राभ्यासी आणि शस्त्राभ्यासीदेखील आहे. त्याच्या गुणांवर भाळून त्याच्या जवळही जावेसे वाटते आणि त्याच्या पराक्रमाला भिऊन त्याच्यापासून थोडे अंतरही ठेवावेसे वाटते. राजा दिलीपाचे हे वर्णन त्याचा राज्यावरील संपूर्ण ताबा दर्शवते. प्रजाजन या राजावर लुब्ध तर आहेत. मात्र त्याच्या पराक्रमाचे आणि शास्त्राभ्यासाचे त्यांच्यावर दडपणही आहे. कालिदासाच्या श्लोकाची संगती किती सुरेख असते त्याचे उदाहरण म्हणजे पुढच्याच श्लोकात राजा दिलीपाची प्रजा मनूच्या मार्गावरुन लेषमात्र ढळत नाही असे त्याने म्हटले आहे. अशा अजस्र व्यक्तिमत्वाचा राजा नियमन करीत असताना प्रजा धर्ममार्गावरून ढळणार नाही यात नवल ते काय? मात्र हे नियमन दिलीपराजाच्या चारित्र्याने केले गेले आहे हे देखील येथे लक्षात घेणे आवश्यक आहे असे मला वाटते. हा चारित्र्यवान राजा आहे.

सूर्य ज्याप्रमाणे हजार पटीने पाण्याचा वर्षाव करण्यासाठीच पृथ्वीवरील पाणी शोषून घेतो अगदी त्याचप्रमाणे हा राजा प्रजेकडून कर घेतो. हजारपट परतावा मिळत असताना राज्यातील प्रजा आनंदाने कर देत असेल. कालिदासाने दिलेल्या या उपमेबद्दल बोलावे तेवढे थोडे आहे. राजा सूर्य म्हटले आहे. आधीच्या वर्णनामुळे तो यथार्थपणे सूर्य आहेच. सूर्य पाणी शोषताना कुणाला कळत देखिल नाही. पाण्याची वाफ होताना दिसून येत नाही. मात्र वर्षेच्या मुसळधारा माणसाला चिंब करून जातात आणि मानवी जीवन धनधान्याने समृद्ध करून जातात. हा राजा प्रजेच्या मनात असंतोषाची कसलीही चलबिचल होणार नाही इतक्याच मर्यादेत कर घेऊन त्यांच्यावर अनेक पटींनी समृद्धीचा भरपूर वर्षाव करतो असे तर या उपमेच्या योगाने कालिदासाला सुचवायचे नसेल? हा राजा आपल्या कामात गोपनीयता ठेवतो. आणि त्याची कार्ये त्यांच्यामुळे लाभलेल्या फलावरूनच लक्षात येतात. येथे कालिदासाने पूर्वजन्मातील संस्कार कसे असतील याचा तर्क या जन्मातील फल काय मिळते त्यावरून लावता येतो अशी उपमा दिली आहे. पूर्वजन्मातील संस्कार कुणालाही आठवत नाहीत. म्हणजे राजाची गोपनीयता किती पराकोटीची असेल हे लक्षात येते. याचा दुसरा अर्थ जे दृष्य फल मिळेल त्यावरूनही या राजाने कुठले कार्य केले असेल याचा फक्त तर्कच इतरेजन लढवू शकतील. स्पष्टपणे तर ते कार्य कुणालाच कळणार नाही. ते फक्त राजालाच ठावूक असणार. हा मुत्सद्दी राजा आहे.

या राजाचे पुढचे वर्णन त्याचे वर्तन कसे असते त्या अनुषंगाने आले आहे.  हा राजा निर्भय होऊन स्वतःचे रक्षण करतो, निरोगी राहून धर्माचरण करतो, लोभरहीत होऊन धन मिळवतो आणि अनासक्त होऊन सुखाचा उपभोग घेतो. राजा स्वतःच निर्भय आहे आणि स्वतःचे रक्षण करायला समर्थ आहे. ‘शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम्’ असे कालिदासाचेच कुमारसंभवात वचन आहे. त्याप्रमाणे दिलीप राज निरामय राहून धर्मपालन करतो. त्याला स्वतःला कसलाच लोभ नाही. तो मिळवतो ते प्रजेसाठी. आणि राजधर्म पालन करताना त्याच्या वाट्याला जे सुख येतं त्याचा तो अनासक्त राहून उपभोग घेतो. कर्तव्यकर्म करताना जे लाभेल त्याचा उपभोग घ्यायचा. मात्र त्यावर आसक्त व्हायचे नाही. असे वर्तन करणारा हा राजा ज्ञानी असूनही मौन राहतो, सामर्थ्यवान असून क्षमाशील असतो. दान करून तो प्रशंसारहित राहतो. हे गुण त्यावर अनुरक्त झाले आहेत असे कालिदास म्हणतो. हा राजा विषयांना वश होत नाही. तो सर्व विद्यांमध्ये पारंगत असून धर्मपरायण आहे. त्यामुळे त्याला वृद्धत्व न येताही वृद्धत्व प्राप्त झाले आहे. अनेक वर्षे अभ्यास केल्यावर पारंगतता येणारी सर्व शास्त्रे त्याला तरुण वयातच मुखोद्गत आहेत. त्यामुळे त्याला वृद्धत्वाचे फळ तारुण्यातच मिळाले आहे हे वर्णन वाचल्यावर वाटतं राजा दिलीपाने षडरिपु जिंकलेले असावेत. हा आपले कर्म कौशल्याने करणारा जणू योगीच आहे.

याच मालिकेत एक श्लोक आहे “प्रजानां विनयाधानात्”. कालिदासाच्या या सुप्रसिद्ध श्लोकावर अनेक विद्वानांनी लिहिलं असेल. मी वेगळं काय लिहिणार? कालिदासाची राजाबद्दलची किंवा राज्यकर्त्यांबद्दलची भूमिका काय आहे हे तिचा हा श्लोक म्हणजे अर्क आहे. प्रजेचे शिक्षण, पालन, पोषण करणारा म्हणून दिलीप राजा प्रजेचा खराखुरा पिता आहे. बाकीच्यांचं पितृत्व केवळ जन्म देण्यापुरतं आहे. इथे राजा दिलीपाच्या व्यक्तिमत्वाला परिपूर्णता येते असे मला नम्रपणे म्हणावेसे वाटते. विराट व्यक्तिमत्व, अफाट गुणवत्ता, अचाट पराक्रम सारे काही आहे पण त्याला जर प्रजेबद्दल माया नसती तर या सार्‍यांमध्ये निश्चितपणे अपूर्णता राहिली असती. या श्लोकाने हिर्‍याला योग्य कोंदण मिळावं तसं हे राजा दिलीपाचं चित्र इथे पूर्ण झालं. तो नुसता राजा नाही तर तो प्रजेचा पालनकर्ता पिताच आहे. तो प्रजेला अशा तर्‍हेने शिक्षित करतो की त्याच्या छत्रछायेखाली राहताना प्रजा धर्माने सांगितलेल्या मार्गावरून ढळत नाही. हे सारं वाचताना कालिदासाच्या प्रतिभेने माझ्यासारख्याच्या हातात फक्त अवाक होणं इतकंच राहतं.  मग शब्दही थांबतात आणि लेखणीही…

अतुल ठाकुर

अतुल ठाकुर हे वृत्तवल्लरीची तांत्रिक बाजू सांभाळतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*