सुसंस्कृत संस्कृत तज्ञ – डॉ. मो. दि. पराडकर – भाग ४

ज्ञानदेव महाराजांनी पसायदानात तापहीन मार्तंडांची उपमा वापरली आहे. सर ज्ञानसूर्य असले तरी त्यांच्या सात्त्विक, सोज्वळ, ऋजू स्वभावामुळे त्यांच्या विद्वतेचा कुणालाही ताप होत नसे. त्यामुळे सरांच्या भोवती नेहेमी लोकांचा, विद्यार्थ्यांचा अन्यथा पुस्तकांचा गराडा असे. सर सर्व लहानथोरांशी अत्यंत आपुलकीने आणि भरभरून बोलत असत. सरांचे आपल्या विद्यार्थ्यांशी अत्यंत जिव्हाळ्याचे नाते होते. स्वतः विद्यार्थीदशेत असताना सरांनी हुतूतू, क्रिकेट, बुद्धीबळ, कॅरम या खेळांमध्ये त्यांनी प्राविण्य मिळविले होते. ते आपल्या विद्यार्थ्यांमध्ये अतिशय लोकप्रिय होते. ही लोकप्रियता इतकी अफाट होती की रुईया महाविद्यालयात त्यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी बाहेरच्या महाविद्यालयातील विद्यार्थीही येत असत. अशावेळी वर्ग तर तुडूंब भरलेला असेच पण बाहेरही मोठी गर्दी होत असे. एकेका शब्दाची फोड करून त्यातील शब्दार्थ, भावार्थ, व्यंग्यार्थ सांगताना सरांइतकेच विद्यार्थीही रंगून जात आणि गुरु शिष्य दोघांनाही वेळेचे भान राहात नसे. विद्यार्थ्यांना त्यांचे शिकवणे इतके आवडत असे की ते सरांना रविवारी देखिल शिकविण्याचा आग्रह करीत आणि सर शिकवीतही असत.

महासागराची खोली मोजता येत नाही, त्याचा थांग लागत नाही तद्वतच सरस्वतीचे वरदान लाभलेल्या पराडकरसरांच्या पाण्डित्याबद्दल यथार्थपणे लिहिता येणे अशक्य आहे. पण काही ठळक गोष्टी नोंदवता येतील. सर अखिल भारतीय राष्ट्रभाषा कोविद परीक्षेत भारतात सर्वप्रथम आले होते. त्यांनी बीए संस्कृतच्या परीक्षेत सुवर्णपदक तर एमए ला शिष्यवृत्ती मिळवली होती. अत्यंत प्रतिभासंपन्न असलेल्या पराडकरसरांचे  मराठी, हिन्दी, संस्कृत, उर्दू, अर्धमागधी आणि इंग्रजी या भाषांवर प्रभुत्व होते. या भाषांमध्ये व्यवहार करताना त्यांचे उच्चार अत्यंत स्पष्ट असत.  सरांनी लोणावळा येथे संस्कृत अध्ययन आणि अध्यापन केंद्राची स्थापना केली होती. त्यांची संपूर्ण भगवद्गीता पाठ होती. रोज कमीतकमी गीतेचे तीन अध्याय म्हटल्याशिवाय ते झोपत नसत.  १९९४ साली हिंगोली येथे भरलेल्या महाराष्ट्र संस्कृत साहित्य संमेलनाचे तेअध्यक्ष होते. अनेक विषयांवर त्यांनी शेकडो लेख लिहिले. त्यांची चौदा पुस्तके प्रकाशित झाली आहेत. सर हिन्दीचे प्रचारक होते. त्यांनी नाविकांसाठी हिन्दी-इंग्रजी कोशही तयार केला. एक आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्ञानाचा फार मोठा वारसा पराडकरसरांना लाभला होता. कवी मोरोपंतांचे ते आठवे वंशज होते. मुंबई विद्यापीठासाठी त्यांनी मोरोपंतांच्या ग्रंथांचे संपादन करून दिले. या कृतीने त्यांनी जणु आपल्या पूर्वजांचे ऋणच फेडले.

पराडकरसरांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले गेले होते. त्यातील ठळकपणे सांगायचे म्हणजे कांची पीठाच्या शंकराचार्यांनी त्यांना सोन्याच्या तारेने मढवलेली शाल भेट देऊन त्यांचा सन्मान केला होता. १९९२ साली दिल्ली येथे अखिल भारतीय भाषा साहित्य संमेलनात “भारत भाषा भूषण” या उपाधीने त्यांना तत्कालिन राष्ट्रपती डॉ. शंकरदयाल शर्मा यांच्याकडून गौरवण्यात करण्यात आले. कालिकत येथे संस्कृतपण्डित म्हणून त्यांचा सत्कार झाला तेव्हा त्यांना हत्तीच्या सोंडेतून हार घालण्यात आला आणि हत्तीवरून त्यांची मिरवणूक काढण्यात आली. या प्रसंगी जवळपास एक लाख लोक जमले होते.

ऋषीतूल्य ज्ञानयोग्याचे जीवन सर जगले पण म्हणून ते समाजापासून वेगळे राहिले नव्हते. त्यांना जीवनाच्या विविध अंगांमध्ये रस होता. साहित्य, संगीत, कला, खेळ यात त्यांना रुची होती. “काव्यशास्त्रविनोदेन कालं गच्छति धीमताम्” या उक्तीप्रमाणे त्यांनी आपले आयुष्य व्यतीत केले. उज्ज्वलाताई अत्यंत कृतज्ञतेने सांगतात की सरांसारख्या व्यक्तींबरोबर झालेल्या चर्चा, हास्यविनोद, गप्पा, सरांनी केलेले प्रेमळ मार्गदर्शन, वेळोवेळी दिलेले सल्ले यामुळे जीवन जगण्याची कला आपल्याला थोडीफर अवगत झाली.

अतुल ठाकुर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*