सुसंस्कृत संस्कृत तज्ञ – डॉ. मो. दि. पराडकर – भाग ३

पराडकरसरांना मी न कळत्या वयात टिव्हीवर पाहिल्याचं आठवतंय. बहुधा वसुंधरा पेंडसे नाईक यांच्यासोबत ते कौटिल्य अर्थशास्त्रावर कार्यक्रम करीत. त्याही वयात त्यांच्या ज्ञानाचा एक प्रभाव मनावर पडला होता. त्यानंतर उज्ज्वलाताईंनी आपल्या संस्कृत वर्गात पराडकरसरांबद्दल काही गोष्टी सांगितल्या. आज माझ्याकडून संस्कृतचा अभ्यास फारच थोडा होत असला तरी ऋषि दर्शनात्, ज्यांना दिसलं ते ऋषी अशी आपल्याकडे केलेली ऋषींची व्याख्या मला स्वच्छ आठवते आणि उज्ज्वलाताईंनी सरांबद्दल ज्या गोष्टी सांगितल्या त्यावरून आपले प्राचिन ऋषी कसे असतील याचीही कल्पना येते. काय जाणल्याने सर्व जाणता येईल असा प्रश्न आपल्याकडे अध्यात्मात विचारला गेला आहे. सरांबद्दल उज्ज्वलाताईंनी एक गोष्ट अशी सांगितली की ज्यामुळे अशी खात्री पटते की पराडकरसरांनीजणू काही सरस्वतीला वशच करून घेतले होते. एकदा तिला जाणल्यावर आणखी जाणण्यासारखे काय असणार? ताईंनी सांगितलेली ही गोष्ट आहे आपापल्या क्षेत्रात उत्तुंग पातळी गाठलेल्या दोन व्यक्तीमत्वाची. त्यातील एक आहेत अर्थातच पराडकरसर आणि दुसर्‍या आहेत सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका किशोरीताई अमोणकर.

“स्वरार्थरमणी” हे पुस्तक लिहिताना किशोरीताईंनी भरताच्या नाट्यशास्त्राचा सखोल अभ्यास केला होता. त्या दरम्यान भरतमुनींनी जी श्रुतींची बावीस नावे सांगितली आहेत. उदा. तीव्रा, कुमुद्वती, मंदा, छंदोवती या नांवामध्ये काही विशेष अर्थ असावा असे किशोरीताईंना वाटले. किशोरीताईंचे वैशिष्ट्य म्हणजे एखादी गोष्ट निव्वळ बैद्धिक पातळीवर पटून त्यांना चालत नसे. त्या गोष्टीची अनुभूती आली तरच त्याबद्दल त्या लिहीत. अन्यथा त्या लेखन थांबवून अनेक महिने त्यावर चिंतन मनन करीत. या नामविशेषाबद्दल त्या चिंतन करीत असताना कोण संस्कृत तज्ञ यावर जास्त प्रकाश पाडू शकेल याची त्यांनी चौकशी केली तेव्हा त्यांच्यासमोर पराडकरसरांचे नाव आले. किशोरीताईंनी आपल्या लाडक्या शिष्येला, नंदिनी बेडेकर यांना सरांच्या घरी पाठवले. सरांनी त्या श्रुती आणि काही श्लोक वाचले आणि ते काही काळ डोळे बंद करून बसले. समाधी लावलेले योगीच जणू. आणि एकदम त्यांच्या मुखातून शब्दांचा ओघ सुरु झाला. त्या चिंतनातून बाहेर पडलेले ते ज्ञान नंदिनीताईंनी रेकॉर्ड करून घेतले. हा क्रम चारपाच दिवस चालला. सर सविस्तर बोलत असत आणि नंदिनीताई ते रेकॉर्ड करून घेत.

हे रेकॉर्डींग ऐकताना किशोरीताईसुद्धा डोळे बंद करून एकाग्र चित्ताने ते ऐकत असत. दोन क्षेत्रातील प्रकांडपंडितांचा संपर्कच तो. तेव्हा बाह्य जग नाहीसे होणारच. किशोरीताईंना सरांचे ते विश्लेषण यथार्थ वाटले. त्यांनी सरांचे ऋण आपल्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत तर मान्य केलेच शिवाय पुस्तक प्रकाश समारंभात सरांना व्यासपिठावर बोलावून त्यांचा सन्मानही केला. एका विद्वानाने दुसर्‍या विद्वानाला दिलेली ती मानवंदनाच होती. उज्ज्वलाताईंचा सरांशी सतत संपर्क असूनही नम्र स्वभावाच्या आणि प्रसिद्धीपराङमुख असलेल्या सरांनी ही गोष्ट त्यांना सांगितलीच नाही. ताईंना ही घटना माननीय दाजीकाका पणशीकर आणि नंतर नंदिनीताई यांच्याकडून कळली. आज अनेकदा सोशल मिडीयावर प्रसिद्धी मिळविण्यासाठी लढवल्या जाणार्‍या क्लुप्त्या पाहून सरांचे वेगळेपण अगदी ठळकपणे उठून दिसते. लोकप्रियता, प्रसिद्धी सारे काही मिळूनही सर अखेरपर्यंत नम्रच राहिले. स्वतःहून आपले मोठेपण त्यांनी कधीही सांगितले नाही. जणू ते अनासक्तीचे भारतीय तत्त्वज्ञान प्रत्यक्ष जगत होते. मात्र या ज्ञानसूर्याची आभाच इतकी सर्वव्यापी होती की ती झाकून राहणे शक्यच नव्हते.

(क्रमशः)

अतुल ठाकुर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*