सुसंस्कृत संस्कृत तज्ञ – डॉ. मो. दि. पराडकर – भाग ५ (अंतिम)

सरांच्या मानसकन्यांपैकी गिरिजाताई कीर यांनी २००९ साली त्यांच्या मनातली एक कल्पना उज्ज्वलाताईंना सांगितली. आपल्या सरांचे नाव समाजात राहिले पाहिजे यासाठी सरांच्या नावे पारितोषिक देण्यात यावे ही अतिशय चांगली कल्पना अर्थातच उज्ज्वलाताईंना आवडली. दोघींनी या पारितोषिकाच्या संदर्भात एक आराखडा तयार केला. या आराखड्यानुसार बी.ए. आणि एम.ए. च्या परीक्षेत संस्कृतमध्ये मुंबई विद्यापीठातून सर्वप्रथम येणार्‍या विद्यार्थ्यांस पारितोषिक देण्याचे ठरले. आता पुढचे काम जरा अवघड होते. स्वतःचे इतके मानसन्मान झाले असताना त्यांचा जराही उल्लेख न करणारे सर स्वतःच्या नावे पुरस्कार देण्याची संमती देणे कठीण होते. पण अशा ठिकाणी प्रेमाचे ऋणानुबंध वरचढ ठरले. स्वतः गिरिजाताई आणि उज्ज्वलाताईंनी सरांची संमती घेण्यासाठी त्यांची भेट घेतली आणि सरांना त्यांच्या या मानसकन्यांच्या प्रेमळ आग्रहामुळे परवानगी देणे भाग पडले.

२०१२ साल उजाडले. वयोमानानूसार सरांची प्रकृती आता बरी नव्हती. सर बोलू शकत नव्हते व स्वतःहून हालचालही करु शकत नव्हते.  ते बोरीवलीला आपल्या भाचीकडे राहात होते. त्यामुळे उज्ज्वलाताईंनी ठरविले की हा सोहळा अतिशय घरगुती स्वरुपात करायचा. सरांना त्रास नको म्हणून समारंभ त्यांच्या राहत्या घरीच करण्याचे ठरविले. त्यानुसार पारितोषिक विजेत्या विद्यार्थ्यांना सरांच्या घरीच बोलवले. या समारंभाला मुंबई विद्यापीठाच्या डॉ. उमा वैद्य व डॉ. गौरी माहुलीकर यांनाही निमंत्रण दिले होते आणि त्याही सरांवरील प्रेमाखातर उपस्थित होत्या. ट्रस्टचे सर्व पदाधिकारी आले होते. पारितोषिके, पुष्पगुच्छ, खाद्यपदार्थ वगैरे घेऊन उज्ज्वलाताईही पोहोचल्या. सरांच्या सहाय्यकाने सरांना आणून खुर्चीत बसवले. सोहळा अर्थातच दृष्ट लागण्याजोगा झाला.

संपूर्ण सोहळा संपेपर्यंत सर दोन तीन तास खुर्चीत बसले होते. त्यांच्या चेहर्‍यावर आनंद मावत नव्हता. सोहळा संपल्यावर सारेजण अतिशय जड अंतःकरणाने जाण्यास निघाले. उज्ज्वलाताईंनी सरांना जेव्हा नमस्कार केला तेव्हा सरांच्या डोळ्यांतून अश्रू वाहात होते. सरांची तब्येत जरी खालावली होती तरी तेथून सरांचा निरोप घेऊन निघणार्‍यांना अशी पुसटशीही कल्पना आली नाही की ही आपली आणि सरांची शेवटची भेट ठरणार आहे. पण त्या ज्ञानयोग्याला पुढचे दिसले असावे कदाचित. लवकरच १२ डिसेंबर २०१२ रोजी रात्री २ वाजून २० मिनिटांनी सरांना देवाज्ञा झाली.

सर आता प्रत्यक्षात आपल्यासोबत असणार नव्हते. पण त्यांनी प्रचंड असा ज्ञानाचा वारसा मागे ठेवला होता. कामानिमित्त अनेक माणसे त्यांच्या सहवासात आली होती. या सार्‍या मंडळीकडे सरांच्या आठवणी होत्या. या आठवणी श्रद्धांजलीच्या स्वरुपात प्रकाशित करण्याचे ठरले. २०१३ साली ऑगस्टमध्ये हे काम सुरु झाले. या कामी देववाणी मंदिराच्या डॉ. कमलताई अभ्यंकर आणि मा. वीणाताई गोडबोले यांची साथ उज्ज्वलाताईंना मिळाली आणि “भावसुमनाञ्जली:” हे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकासाठी सरांच्या सहवासात आलेल्या अनेक थोर विद्वान लोकांनी लेख लिहून दिले होते.

सरांबद्दल बोलताना उज्ज्वलाताई सर आता आपल्यात नाहीत या भावनेने बोलतच नाहीत. कारण सरांच्या असंख्य आठवणी त्यांच्याकडे आहेत. कुठल्याही अडचणीत सरांनी दिलेले सल्ले, केलेले प्रेमळ उपदेश त्यांना आठवतात. त्यांच्या आठवणींनी शिदोरी, त्यांचे प्रोत्साहन आपल्याला कायम साथ देत असते असे त्या म्हणतात. उज्ज्वलाताईंकडून जी संस्कृतची सेवा घडते आहे ती पाहून सरांच्याही आत्म्याला संतोष होत असेल. या सेवेची प्रेरणा सरांच्या प्रोत्साहनात आहे हे ताई अतिशय आनंदाने आणि कृतज्ञतेने मान्य करतात.

अतुल ठाकुर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*