योगात् व्यसनमुक्ति: – शवासन – भाग ३ – डॉ. वैशाली दाबके

शवासनाच्या तंत्राकडे वळताना दाबकेमॅडमनी शवासनाबद्दल बारीकसारीक गोष्टी सांगण्यास सुरुवात केली. तेव्हाच मला जाणवले की आमच्या व्यसनी रुग्णमित्रांसाठी हे तंत्र अतिशय प्रभावी ठरु शकेल. कारण सतत व्यसनाचा विचार मनात येईल चलबिचल होत असताना जेव्हा ही मंडळी तंत्राकडे लक्ष देण्यास सुरुवात करतील तेव्हा ते मन आपोआपच व्यसनाच्या विचारांवरून उडून आसनाच्या विचाराकडे वळेल. त्यामुळेच आम्हीदेखिल या बारीकसारीक गोष्टी या लेखात मांडणार आहोत. दाबकेमॅडमनी सुरुवातीला शवासनाची पूर्वतयारी कशी असावी याबद्दल विवेचन केले. जेथे शवासन करायचे ती खोली अतिशय थंड किंवा उष्ण नको. तेथे कुठल्याही तर्‍हेचे प्रदुषण नको. शवासन थेट पंख्याखाली करु नये. आजुबाजुला शांतता असावी. डोळ्यावर कसलाही प्रखर प्रकाशाचा झोत येऊ नये. शवासन अतिमऊ गादीवर करु नये. साधी सतरंजी पुरेशी आहे. शवासन जेवल्याबरोबर लगेच करु नये कारण आसन करताना झोप लागण्याची शक्यता असते. शवासन करताना सुती सैल कपडे घालावेत. चष्मा, घड्याळ, चेन, अंगठी काढून ठेवावी. त्यामुळे शरीर शिथिल होण्यास अडचण येण्याची शक्यता असते. मोबाईल बंद ठेवावा. अन्यथा फोन आल्यास आसनात अडथळा येईल. शवासन करताना अनेकांना संगीताची जोड उपकारक ठरेल असे वाटते मात्र दाबके मॅडम याला अनुकूल दिसल्या नाहीत. संगीत लावल्यास लक्ष संगीताकडे वळेल आणि शरीराच्या अवयवांकडे जाणार नाही असे त्या म्हणाल्या.

परंपरेप्रमाणे आसन, प्राणायामानंतर शवासन करतात अशावेळी शरीर मोकळे झालेले असते. पण फक्त शवासन करायचे असल्यास पूर्वतयारी म्हणून काही आसने किंवा निदान सहा सूर्यनमस्कार घातल्यास शरीराचे सांधे सैल होतात आणि पुढचे शिथिलीकरण सोपे होते. पुढे त्यांनी शवासनात शरीर कसे असावे याबद्दल सांगितले. पाठिवर झोपावे. उशीशिवाय अवघड वाटत असल्यास डोक्याखाली पातळ चादर घ्यायला हरक्त नाही. डोके समोर अथवा कुठल्या एका बाजूला. पायात कमरेइतके अंतर असावे. हात शरीरापासून १० ते १५ सेमी दूर. हाताचे तळवे वरच्या बाजूला छताकडे असावेत. बोटे अर्धवट मिटलेली. ती आवळू नयेत किंवा ताठही ठेवून नयेत. नैसर्गिकरित्या ठेवली तर ती अर्धवट मिटलेल्या अवस्थेत राहतील. तोंड बंद ठेवावे आणि जबडा सैल असावा. आवळून धरु नये. डोळे अलगद मिटलेले. थोडक्यात शरीराच्या कुठल्याही भागात ताण असु नये. एकदा या शारीरीक अवस्थेत आल्यावर मात्र शरीराची हालचाल करू नये. कारण त्यामुळे शिथिलीकरणात अडथळा येतो आणि एकंदरीतच आसनावरील लक्ष उडून एकाग्रता भंग पावते.

या स्थितीत शरीर आपोआपच स्थिर झालेले असते. अशावेळी श्वासोच्छवासाची जाणीव ठेवावी. यानंतर उजव्या हाताच्या अंगठ्यापासून सुरुवात करावी. मनाने त्या अंगठ्याकडे जावे तो डोळ्यासमोर आणावा आणि शिथिल करावा, ढिला सोडावा. तो अवयव शिथिल करण्याची सूचना द्यावी. असाच तर्‍हेने शरीराच्या एकेक अवयवाचे शिथिलिकरण करावे. परंपरेत अनेक क्रम आहेत. आम्ही येथे एकच क्रम देत आहोत. उजव्या हाताचा अंगठा, मग क्रमाने एकेक बोट, मनगट, कोपर, खांदा, काख, पाठीचीउजवी बाजू, कंबर, उजवा नितंब, उजव्या पायाची मांडी, गुडघा, पोटरी, पोटरीखालचा पायाचा भाग, सांधा, टाच, पायाचा तळवा, पायाचा अंगठा, आणि क्रमाने एकेक बोट. अशा तर्‍हेने उजव्या हाताच्या अंगठ्यापासून ते उजव्या पायाच्या करंगळीपर्यंत शरीराची एकेक भाग मनाने शिथिल करावा. हे करीत असताना शरीर हलवू नये, डोळे उघडू नये. यानंतर हाच क्रम शरीराच्या डाव्या बाजूसाठीदेखिल ठेवावा. म्हणजेच डाव्या हाताच्या अंगठ्यापासून ते डाव्या पायाच्या करंगळीपर्यंत शरीर शिथिल करावे. पुढे पाठिकडे लक्ष द्यावे पाठिची खालची उजवी बाजू, डावी बाजू शिथिल करावी, पाठिची वरची उजवी बाजू, डावी बाजू शिथिल करावी, उजवा खांदा, डावा खांदा शिथिल करावा. यानंतर खालपासून ते वरपर्यंत पाठीचा कणा शिथिल करावा.

पुढे मान, डोक्याची मागची बाजू, डोक्याची वरची बाजू अशातर्‍हेने शरीर शिथिल करीत लक्ष शरीराच्या पुढच्या बाजूकडे आणावे. त्यानंतर कपाळ, उजवी भुवई, डावी भुवई, दोन भुवयांच्या मधला भाग, उजवा डोळा, डावा डोळा, उजवा कान, डावा कान, उजवा गाल, डावा गाल, उजवी नाकपुडी, डावी नाकपुडी, नासिकाग्र, वरचा ओठ, खालचा ओठ, हनुवटी, गळा, उजवी छाती, डावी छाती, छातीचा मध्यभाग, पोट, ओटीपोट अशातर्‍हेने क्रमाने सर्व शरीर शिथिल करावे. दाबकेमॅडमनी क्रमाने शरीर शिथिल करणे महत्त्वाचे आहे हे आवर्जून नमुद केले. हे पहिले शिथिलीकरण झाल्यावर पुन्हा एकदा शरीराकडे क्रमाने लक्ष देऊन कुठे काही ताण अजुनही उरला असल्यास काढून टाकावा. यावेळी मात्र थेट उजवा पाय, डावा पाय, उजवा हात, डावा हात, पाठ, पोट, डोके अशा तर्‍हेने स्थूल अवयव डोळ्यांसमोर आणून ते शिथिल करावेत. या अवस्थेत शरीरावरील ताण कमी झाल्याने शरीर स्थिरावलेले असते. श्वासाची गती लयबद्ध झालेली असते. यानंतर शवासनाच्या सूक्ष्म भागाकडे वळावे. या टप्प्यात श्वासावर लक्ष द्यावे. मी श्वास घेतो आहे, मी श्वास सोडतो आहे, श्वासागणिक पोट खाली वर जात आहे ही जाणीव ठेवावी. यामुळे मनातले विचार कमी होतात आणि मनाची ग्रहणशीलता वाढते.

अशा अवस्थेत मन स्थिर राखावे. झोप लागु देऊ नये. अशावेळी मनात एखादा चांगला विचार आणता येईल. किंवा देवळाचे चित्र, गुरुचे चित्र, अशा गोष्टी आणता येतील. काहीवेळ या अवस्थेत राहिल्यावर शवासनातून बाहेर यावे. त्यालाही दाबकेमॅडमनी विशिष्ट क्रम सांगितला. सुरुवातीला शरीराची जाणीव करून घ्यावी. म्हणजेच श्वासावरून आपले लक्ष शरीराकडे आणावे. त्यानंतर हातापायाच्या बोटांची किंचित हालचाल करावी. मग हातापायांची किंचित हालचाल करावी. मग एका कुशीवर वळून थोडावेळ थांबावे. हे सारे करत असताना डोळे बंदच ठेवावेत. आता डोळे मिटलेल्या अवस्थेतच हाताचा आधार घेऊन उठावे. साधी मांडी घालून थोडावेळ शांत बसावे. शवासनातील शांततेची जाणीव ठेवावी. त्या शांततेचा अनुभव घ्यावा. त्यानंतर दोन्ही तळहातांचे घर्षण करावे आणि ते मिटलेल्या डोळ्यांवर अलगद ठेवून डोळ्यांना उब द्यावी. हळूवार डोळे उघडावे. येथे शवासन संपते.

अतुल ठाकुर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*