योगात् व्यसनमुक्ति: – शवासन – भाग २ – डॉ. वैशाली दाबके

शवासन करताना अडचणी कुठल्या येऊ शकतात हे सांगताना दाबकेंमॅडमनी सुरुवातीलाच झोप येऊ शकते हे सांगितले. दुसरी सर्वात मोठी अडचण म्हणजे मन भरकटण्याची असे त्या म्हणाल्या. शांत वातावरणात शवासन करताना मनात नाना प्रकारचे विचार येऊ शकतात. अशावेळी त्या विचारांकडे लक्ष देऊ नये. विचारांना येऊ जाऊ द्यावे. त्यांनी येऊच नये अशा जबरदस्तीच्या भावनेतदेखिल आपण राहू नये. कारण त्यामुळे आपण अस्वस्थ होण्याची शक्यता असते. मन त्या विचारांमागे जाऊ लागल्यास पुन्हा श्वासांवर आणावे. पुन्हा सुचनांकडे लक्ष द्यावे. दाबकेमॅडम हे सांगत असताना मला शवासनासाठी सहजता आणि सजगता या दोन गोष्टींकडे त्या वारंवार लक्ष वेधत आहेत हे जाणवले. आणि या दोन्ही गोष्टी आमच्या व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न करणार्‍या मित्रांसाठी महत्त्वाच्या आहेत. सजगतेमुळे आसन परिणामकारक होईल तर सहजतेमुळे ते करताना ताणाव वाटणार नाही. त्याचं ओझं वाटणार नाही. मूळात तणावापासून मुक्त होण्यासाठीच करायच्या आसनात सहजता हवीच.

पुढे त्या शवासनाचे फायदे सांगु लागल्या. एरवी आपले कार्य गुरुत्वाकर्षणाच्या विरोधी दिशेने सुरु असते. पण शवासनात आपण स्वत:ला संपूर्णपणे शिथिल सोडल्याने गुरुत्वाकर्षणाचा दाब शरीरावर सर्व बाजूंनी सारखाच पडतो. त्यामुळे शिथिलीकरण जास्त परिणामकारक होते. यासाठीच शवासनात शरीराचा योग्य आकृतीबंध साधणे महत्त्वाचे. शवासन म्हणजे निव्वळ हातपाय पसरुन पडणे नव्हे. शरीरामागोमागच मनाचे शिथिलीकरण महत्त्वाचे. शरीरानंतर मनाला विश्रांती मिळते. याचे कारण शरीराला विश्रांती मिळाल्यावर आपोआपच श्वासाची गती मंद होते. श्वासाची गती मंद झाली कि विचारांची गती कमी होते. विचाराची गती कमी झाली की सतत विचारांमध्ये गुंतलेल्या मनाला विश्रांती मिळते. शवासन करता महत्त्वाची बाब म्हणजे शरीराचा प्रत्येक अवयव मानसिक दृष्ट्या नजरेसमोर आणून तो शिथिल करता येतो. त्यामुळे काही वेळा शरीराच्या विशिष्ट भागात जास्त तणाव जाणवत असल्याल त्या भागाकडे मनाच्या सहाय्याने जाऊन तो भागही शिथिल करता येतो.

शवासनामुळे एकाग्रता वाढते. याचे कारण शवासनामुळे मनातील विचारांची गती कमी झालेली असते आणि त्यामुळे मनाला विश्रांती मिळालेली असते. शवासनाचे फायदे सांगत असताना दाबके मॅडमनी पुढे शवासन हे झोपेच्या समस्यांवर उपयुक्त असल्याचे सांगितले आणि माझ्या डोळ्यासमोर अतिविचारांमुळे झोप न येता तळमळणारी माणसे आली. व्यसनाच्या बाबतीत तर मनात सतत व्यसनाचेच विचार घोळत असताना मनाला विश्रांती मिळणार तरी कशी? अशावेळी शवासनाचा आधार घेतल्यास शरीर शिथिल करून, मन शांत केल्यास झोपेच्या समस्या कमी होऊ शकतात. शवासनामुळे शरीराची जाणीव वाढते ही गोष्ट सर्वांसाठीच महत्त्वाची आहे. कारण शरीराबाबत सजगता वाढल्याने आपल्या शरीरात कुठे ताण येतो हे पुढे नेमकेपणाने लक्षात येते आणि शवासनात तो ताण कमी करता येतो. महत्त्वाची गोष्ट ही की शवासनाच्या सरावामुळे आपल्याला शिथिलीकरणाची सवय लागते. आणि ती सवय लागल्यास शवासन कुठेही करता येते. त्यामुळे अगदी घरासारखे आदर्श वातावरण आजुबाजुला नसले तरी माणुस स्वतःला तणावमुक्त करु शकतो.

व्यसनाच्या दरम्यान काहींना उच्च रक्तदाबाचा विकार जडलेला असतो. त्यावर रोज शवासन करणे हा एक परिणामकारक उपाय ठरु शकतो. दाबकेमॅडम हे सांगत असतानाच मला आमच्या सहचरी माता भगिनी आठवल्या. घरातील व्यसनामुळे त्यांनाही तणावजन्य आजार जडलेले असतात. घरातील व्यसनी माणुस आता व्यसनमुक्तीच्यापथावर चालु लागला म्हणजे माता भगिनींचे सर्वच आजार जादुची कांडी फिरल्याप्रमाणे चुटकीसरशी दूर होत नाहीत. अशावेळी त्यांनीदेखिल शवासनाचा आधार घेतल्यास त्यांना फायदा होऊ शकेल. व्यसनाच्या बाबतीत हा कुटुंबाचा आजार आहे असे म्हटले जाते. व्यसनीव्यक्तीच्या पोटात दारु असते तर घरच्यांच्या डोक्यात दारु असते असे म्हणतात. कारण आता आपला माणुस काय करत असेल? दारु पिऊन कुठे पडला तर नसेल ना याचाच विचार त्यांच्या मनात असतो. अशावेळी तणावग्रस्त अवस्थेत शवासनाचा आधार घेता येईल. सर्वसामान्य माणसांइतकेच व्यसनी मंडळींनादेखिल अतिशय महत्त्वाचे असलेले असे हे शवासन कसे करावे याबद्दल आता दाबकेमॅडम बोलणार होत्या.

अतुल ठाकुर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*