योगात् व्यसनमुक्ति: – योगनिद्रा – भाग १ – डॉ. वैशाली दाबके

योगनिद्रेबद्दल दाबके मॅडम बोलणार म्हटल्यावर माझ्या मनात अनेक विचार आले. सर्वप्रथम तर एका जबाबदारीची जाणीव झाली. व्यसनमुक्तीसाठी योग कसा उपयोगी पडू शकेल या दृष्टीकोणातून सुरु असलेल्या या लेखमालेत सुरुवातीला आसने, मग प्राणायाम आणि योगाभ्यासाची सांगता शवासनाने झाली. मात्र योगनिद्रा ही अवचेतन मनाला हात घालणारी क्रिया आहे. त्याबद्दल दाबकेमॅडमनी अगदी सुरुवातीलाच सुरेख स्पष्टीकरण दिले. आपल्या अनेक सवयी अयोग्य आहेत हे आपल्याला ठावूक असते. त्या दूर करण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्नदेखिल करतो. मात्र तरीही काही दिवसांनी या सवयींना आपण बळी पडत राहतो. याचे कारण आपल्या अवचेतन मनात या सवयींनी मूळ धरलेले असते. त्या समूळ काढायल्या असतील तर अवचेतन मनाचे दार उघडून त्यांना नाहीसे करावे लागते. योगनिद्रा हा आपल्या अवचेतन मनाचे दार उघडून अयोग्य सवयी नाहीशा करण्याचा आणि योग्य सवयी अंगी बाणवण्याचा महामार्ग आहे. हे ऐकल्यावर मुक्तांगणमध्ये संशोधन केलेल्या माझ्यासारख्यासमोर व्यसनापासून स्वतःची सुटका करण्यासाठी प्रामाणिकपणे धडपडणारे असंख्य रुग्णमित्र उभे राहिले. त्यांच्या त्या अथक प्रयत्नांना योगनिद्रेचा आधार मिळाल्यास त्यांना फार मोठी मदत होऊ शकेल असा विश्वास मला दाबकेमॅडमच्या स्पष्टीकरणामुळे वाटला. आणि म्हणूनच पारंपरिक अर्थाने जरी शवासनाबरोबर ही लेखमाला सर्वसामान्य योगाभ्यासाच्या दृष्टीने संपत असली तरी ती वाढवुन योगनिद्रेची माहिती देण्याचा मोह मला आवरला नाही.

अशा या बहुगुणी योगनिद्रेची माहिती सांगताना सुरुवातीलाच दाबकेमॅडम म्हणाल्या की योगनिद्रा ही शारिरीक, मानसिक आणि भावनिक स्तरांवर काम करते. ही करताना शिथिलीकरण हे शवासनासारखेच असते मात्र योगनिद्रेत शारिरिक शिथिलीकरणानंतर आणखि काही प्रक्रियांनी मानसिक आणि भावनिक स्तरांना हात घातला जातो. तेथिल ताणतणाव नाहीसे केले जातात. त्यामुळे योगनिद्रा ही शवासनापेक्षा जास्त सखोल आहे. त्याचप्रमाणे शवासनापेक्षा योगनिद्रेच्या प्रक्रियेला जास्त कालावधी लागतो. योगनिद्रेतील सूचना या माणसाला ना निद्रा ना स्वप्न या अवस्थेपर्यंत नेतात. अशा अवस्थेत ग्रहणशील बनलेल्या मनामध्ये सूचनांचे रोपण केले जाते. या अवस्थेत दिल्या गेलेल्या सूचना या मनाच्या फक्त वरवरच्या स्तरांमध्ये पोहोचत नसून आतल्या गाभ्यापर्यंत पोहोचतात त्यामूळे एखादी सवय मूळापासून सुटण्यास मदत होऊ शकते. मात्र हे करत असतानाच काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे. अलिकडे निव्वळ विचाराने श्रीमंत होणे, विचार करून सवयी बदलणे अशासारख्या पुस्तकांचे आणि संकल्पनांचे पेव फुटले आहे. त्याचा योगनिद्रेशी काहीही संबंध नाही. योगनिद्रेचा कुठल्याही चमत्काराशी संबंध नाही. येथे देण्यात येणारी योगनिद्रा ही अध्यात्मिक स्तरावर काही साध्य करण्यासाठी नाही. आम्ही देत असलेली योगनिद्रेची प्रक्रिया ही काही त्रासदायक सवयी सुटण्यास सहाय्याभूत होईल असे आम्हाला वाटते आणि इतकीच या आणि पूढील लेखांची मर्यादा आहे. आणि त्यामुळेच योगनिद्रेतील संकल्पाबाबत दाबकेमॅडमनी पुढे सविस्तर विवेचन केले.

त्या म्हणाल्या मूळात आपल्याला काय हवे याबद्दल आपल्याला नीट कल्पना हवी. अनेकदा माणसे अशक्य कोटीतले संकल्प करतात. अध्यात्मिक स्तरावरचे संकल्प करतात. एक गोष्ट पूर्ण होण्याआधी दुसरा संकल्प करतात. संकल्प पटापट बदलत राहतात. संकल्पातील भाषा बदलत राहतात. गुंतागुंतीचा संकल्प करतात. फार मोठी वाक्ये, कठीण शब्द असलेले संकल्प करतात. या सार्‍या गोष्टी योगनिद्रेत अडथळा आणणार्‍या आहेत. त्यामुळे “संकल्प” महत्त्वाचा असे दाबके मॅडमनी आवर्जून सांगितले. योगनिद्रेत माणसाची प्रवृत्ती बदलण्याचा प्रयत्न असतो. मात्र त्या स्वाभाविक वृत्ती ओळखणं ही पहीली पायरी असते. माणसांना आपल्या स्वभावातील नकारात्मक गोष्टी पटकन ओळखता येत नाहीत. मला हे ऐकून मुक्तांगणमध्ये “डिनायल” च्या अवस्थेत असलेले रुग्णमित्र आठवले. व्यसनामुळे शारिरीक, मानसिक, भावनिक, कौटुंबिक, आर्थिक आणि सामाजिक स्तरावर पूर्णपणे धूळदाण उडून देखिल “मला व्यसन नाहीच” हा एकच घोशा व्यसनी माणसाने लावलेला असतो. त्यामुळे आधी आपल्यातील चुकीच्या सवयी ओळखणं ही पहिली पायरी. आणि त्या ओळखून स्विकारणं ही दुसरी पायरी. अनेकदा माणसांना हे माहित असतं की आपल्या स्वभावात ही गोष्ट गैर आहे. मात्र ते ती मनापासून स्विकारत नाहीत. कदाचित वरवर स्विकारल्यासारखं दाखवतीलही पण त्याला फारसा अर्थ नसतो. आणि त्यामुळे त्यांच्या त्या सवयीत बदलदेखिल होत नाही.

दाबकेमॅडमनी योगनिद्रेच्या परिणामाबद्दल सांगताना म्हटले की माणसाची स्वाभाविक प्रवृत्ती ओळखून, ती स्विकारून त्यात बदल करण्याचे काम योगनिद्रा करते. त्यामुळे योगनिद्रेसाठी कुठला संकल्प करायचा, आपल्याला आपल्या स्वभावात कुठला बदल हवा आहे याबद्दल कमालिचा स्पष्टपणा आवश्यक आहे. आपल्याला काय हवे हे आपल्याच धड माहित नसेल तर योगनिद्रेचा फारसा उपयोग होणार नाही. म्हणूनच योगनिद्रा सुरु करण्याआधी आत्मपरीक्षण करून संकल्प कुठला करायचा हे ठरवण्यासाठी थोडा वेळ देणे आवश्यक आहे. दाबकेमॅडम यापुढे योगनिद्रेची संकल्पना स्पष्ट करणार होत्या. त्याआधीच मला योगनिद्रेचा व्यसनमुक्तीसाठी किती उपयोग होऊ शकेल याची कल्पना येऊ लागली होती. आता त्यांना मी पुढचे प्रश्न याच संदर्भात विचारणार होतो.

अतुल ठाकुर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*