अथर्वशीर्षाचा वैज्ञानिक अर्थ – श्री. भालचंद्र नाईक

“अथर्वशीर्षाचा वैज्ञानिक अर्थ” या विषयावर बोरीवली (प) येथे शनिवार दि. २०/०१/२०१८ या दिवशी श्री. भालचंद्र नाईक  यांचे भाषण झाले. त्यातील काही भाग…

“कलौ चण्डीविनायकौ” कलियुगात देवी आणि गणेश यांची उपासना त्वरित फलदायी असते असे म्हणतात. गणेशोपासनेत श्री गणपत्यथर्वशीर्षाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अथर्ववेदातील सर्वोत्तम ज्ञान – शीर्षस्थानी विराजमान झालेले ज्ञान – ते अथर्वशीर्ष असे म्हटले जाते.

अथर्वशीर्ष या शब्दाची फोड अ थर्व शीर्ष अशीही केली जाते. अ अभावदर्शक, थर्व म्हणजे चंचल आणि शीर्ष म्हणजे डोके. चंचलपणाचा अभाव असलेले डोके म्हणजे शांत, स्थिर डोके. संकल्प-विकल्पांत रममाण होणारे मन निश्चयात्मक बुद्धीच्या साह्याने आटोक्यात आणण्यासाठी डोके शांत असले पाहिजे. ते साधणारी विद्या ज्यात आहे ते अथर्वशीर्ष.

ही विद्या गणेशलहरीद्वारे पृथ्वीतलावर प्रथमतः आली ती माघ शुक्ल चतुर्थी ला असे म्हणतात. या चतुर्थीचे नावच “शांता चतुर्थी” आहे. अशा शांता चतुर्थीच्या पूर्वसंध्येला माघ शुक्ल तृतीयेच्या आजच्या शुभदिवशी आपण अथर्वशीर्षाचे अध्ययन करू या.

अथर्वशीर्षाच्या शेवटी “इत्युपनिषत् |” असा उल्लेख येतो, म्हणजे हे उपनिषद आहे. उपनिषद या शब्दामध्ये उप, नि व सद् अशी तीन पदे आहेत. उप म्हणजे जवळ, सद् म्हणजे बसणे आणि नि म्हणजे मनापासून किंवा भक्तिभावाने किंवा नम्रपणाने. अर्थात उपनिषद म्हणजे आत्मविद्या शिकण्यासाठी विधिपूर्वक गुरुच्या जवळ जाणे आणि भक्तिभावाने, नम्रपणे बसणे. अज्ञान नाहीसे करणारी ब्रह्मविद्या म्हणजे उपनिषद असा अर्थ जगद्गुरु स्वामी शंकराचार्यांनी सांगितला आहे.

अथर्वशीर्ष हे छोटेसे उपनिषद आहे. केवळ १४ मंत्रांचे आहे. त्यातही १० मंत्र मुख्य उपनिषद आणि ४ मंत्र फलश्रुतीचे आहेत. भाषा सोपी आहे. दोन दोन, तीन तीन शब्दांची वाक्ये आहेत. उदा. ऋतं वच्मि | सत्यं वच्मि | नमो गणपतये | इत्यादि. संस्कृत भाषा शिकविण्यासाठी अथर्वशीर्ष उत्तम आहे. आध्यात्मिक अर्थ मात्र गुरुमुखातून जाणून घेतला पाहिजे.

छोट्या वाक्यांत गहन अर्थ भरलेला आहे. एकेक संकल्पना समजून घेण्यासाठी मनन, चिंतनाची आणि त्याहून अधिक गुरुकृपेची आवश्यकता आहे. ज्ञानाबरोबरच ते ज्ञान टिकवून पुढच्या पिढीत संक्रमित करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या लेखनविद्येचे विज्ञानही यांत आहे.

तुलनात्मक दृष्ट्या आध्यात्मिक ज्ञानापेक्षा व्यावहारिक विज्ञान समजून घेणे सोपे आहे, आपल्या आवाक्यातले आहे, ते आधी पाहूं या. वेदांत ब्रह्मज्ञान अनेक सूक्तांत अभिव्यक्त झालेले आहे. गणेशविद्या मात्र श्रीगणपत्यर्थशीर्षात आहे. सध्याच्या शिक्षणप्रणालीनुसार शिकलेल्या आपणा सर्वांना ते समजेल असा मला विश्वास वाटतो.

गणेश उपासना प्रसंगी “ॐ गॅं” हा बीजमंत्र उपासनेसाठी ओल्या मृत्तिका इष्टिकेवर किंवा ताडपत्रावर किंवा भूर्जपत्रावर लिहिण्यासाठी स्पष्ट सूचना श्री गणपति अथर्वशीर्षांत ७व्या आणि ८व्या मंत्रांत दिल्या आहेत.

सातव्या मंत्रात सुरुवातीला “गणादिं पूर्वमुच्चार्य…” आणि नंतर “गकार: पूर्वरूपम् |” असे शब्द आहेत. त्याचा दोन्ही ठिकाणी अर्थ ‘ग’ वाचनात आला होता, तो पटत नव्हता. द्विरुक्ति का? हा प्रश्न मनात होता. ती द्विरुक्ति नाही, हे लिपिकार श्री.ल.श्री.वाकणकर यांच्या लेखावरून ध्यानात आले.

गिरगांवातील केशवजी नाईकांच्या चाळींतील गणेशोत्सवाला १०० वर्षें पूर्ण झाली, त्यावेळी “सार्वजनिक गणेशोत्सव – शतकाची वाटचाल” या नावाची एक स्मरणिका प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यात “सा एषा गणेशविद्या” हा श्री. वाकणकरांचा लेख होता. त्यात याचा उलगडा झाला.

आपली संस्कृत भाषा उच्चारानुसारी आहे. उच्चारानुसार लेखन हे तिचे वैशिष्ट्य आहे. इंग्रजीत लिहायचे “बी यू टी” आणि उच्चार “बट”, असे संस्कृतात नाही. “गणेश” लिहिले तर उच्चारही “गणेश”. देवतेच्या उपासनेत बीजमंत्राला महत्त्व असते. त्या बीजमंत्राचा उच्चार आणि लेखन कसे करावयाचे हे ७ व्या मंत्रात सांगितले आहे. प्रत्येक अक्षर मंत्र आहे, हे सांगणारा एक श्लोक आठवतो – “अमंत्रमक्षरं नास्ति…” श्री गणेशाच्या प्राणप्रतिष्ठेच्या वेळी “यं रं लं वं…” म्हटल्याचे आपल्याला आठवेल.‌ ह्या अक्षरांना मंत्रस्वरूप कधी येते?

गणादिंचा अर्थ काय? उच्चारायचे ध्वनिगण कोणते? सनकादिक आचार्य शंकराकडे गेले. त्यावेळी नृत्यनिपुण शंकरांनी आपला डमरु “नवपंचवारम्” म्हणजे ९+५=१४ वेळां वाजवला. त्यातून माहेश्वरी सूत्रांची निर्मिती झाली.

कुंडलिनीतून उदय पावणारा ध्वनि – परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी – तिथून कंठ, टाळू, दात, साह्यकारी जीभ आणि ओठ याद्वारे प्रकट होतो. ध्वनीच्या प्रकटीकरणानुसार मुख्य पाच गण केले गेले. कंठ्य, तालव्य, मूर्धन्य, दंत्य, ओष्ठ्य पाणिनीने त्यांना व्याकरणबद्ध केले, ते ‘गण’. हे गण पाडणारे ते ‘गणक’ ऋषि.

कोणत्याही बीजमंत्रासाठी गणादिं पूर्वं उच्चार्य – आधी गणाचा उच्चार करून – वर्णादिं तदनंतरम् | – नंतर वर्णादि ‘अ’ चा उच्चार करावा. अनुस्वार: परतर:| यानंतर अनुस्वार. अर्धेन्दुलसितम् | अर्धचंद्राकृतीने सुशोभित करावा. अर्धचंद्रांकित अनुस्वार ही संस्कृतमध्ये अनुनासिकाची खूण समजली जाते. तारेण ऋद्धम् | तार म्हणजे प्रणव, ॐकार. असा ॐकारयुक्त अनुनासिकासारखा अक्षराचा उच्चार मंत्ररूप होतो. एतत्तव मनुस्वरूपम् | हे तुझ्या मंत्राचे स्वरूप आहे.

नियम सांगून झाल्यावर आता विशिष्ट उदाहरण म्हणून “ॐ गॅं” या गणेश ‌बीजमंत्राविषयी सांगितले आहे.

गकार: पूर्वरूपम् | ‘ग’कार हे पूर्वरूप आहे. अकारो मध्यमरूपम् | ‘अ’कार हे मध्यरूप आहे. अनुस्वारश्चान्त्यरूपम् | अनुस्वार हे अन्त्यरूप आहे. बिन्दुरुत्तररूपम् | बिन्दू हे उत्तररूप आहे. नाद: सन्धानम् | संहिता सन्धि:| (ग्, अ, ॅ, ं) ह्या चार वर्णांचा उच्चार एक नादात असावा. चारही वर्णांचा संधी करून त्याचे एकत्र उच्चारण करावे – गॅं‌. “सैषा गणेशविद्या |” ती ही गणेशविद्या आहे. गणक ऋषि:| (या विद्येचा) गणक (हा) ऋषी आहे. निचृद्गायत्री छंद:| गणपतिर्देवता | निचृद्गायत्री हा छंद आहे. गणपति ही देवता आहे. ॐ गॅं गणपतये नम:| ॐ गॅं (मंत्ररूप) गणपतीला नमस्कार असो.

निचृत्= नि:शेष रीतीने एकमेकांस बांधणे, संघटित करणे, प्रकाशित करणे.
गायत्री या छंदात २४ अक्षरे असतात. प्रत्येक चरणात ८ अक्षरे, असे ३ चरण असतात. आठवा मंत्र हा गायत्री छंदात व्यवस्थित बांधलेला गणेश मंत्र आहे.

एकदन्ताय विद्महे | वक्रतुण्डाय धीमहि | तन्नोदन्ती प्रचोदयात् |
आम्ही एकदंताला (गणपतीला) जाणतो. वक्रतुंडाचे ध्यान करतो. तो दंती आम्हाला प्रेरणा देवो.

{विद्महे – जाणतो विद्‌ (२ प.प.) उत्तम पुरुष ब.व. धातू परस्मैपदी असून प्रत्यय आत्मनेपदी असे हे अनियमित रूप आहे.
धीमहि – ध्यान करतो ध्यै (१प.प.) उत्तम पुरुष ब.व.पण प्रत्यय अनद्यतन भूतकाळाचा असे हेही रूप अनियमित आहे.}

मंत्रद्रष्ट्या ऋषीला हे स्फुरलेले असल्यामुळे यात व्याकरणदृष्ट्या अनियमित रूपें असूनही याला मंत्ररूप प्राप्त झाले आहे. मननात् त्रायते इति मंत्र:| मनन केले असता रक्षण करतो तो मंत्र असे म्हणतात. यांत हे सामर्थ्य आहे. हा साधनेचा, अनुभवाचा विषय आहे.

आता आपण गणेशविद्येच्या वैज्ञानिक भागाकडे वळूं या. ही गणेशविद्या मुख्यतः तीन टप्प्यांत विकसित झाली. निरनिराळ्या शिलालेखांवर कोरलेल्या अक्षरांचा अभ्यास केलेल्या लिपिकारांनी संशोधनान्ती हे सिद्ध केले आहे. ऋग्वेदांत अनेक उल्लेख आढळतात. “हे अश्वारूढ इंद्रा, आम्ही गोतम कुलाचे कवी तुझ्यासाठी रचलेले नवीन स्तोत्र कोरून काढत आहोत. (ऋग्वेद १.६२.१३)

१) वैदिक गणपति ‘ब्रह्मणस्पति’ – ध्वनिउच्चाराची पाच स्थाने {कण्ठ्य (आद्य), ओष्ठ्य (अन्त्य), तालव्य-मूर्धन्य-दन्त्य (मध्य)} यांच्यासाठी पाच ‘अर्धेन्दु’ची कल्पना याने निर्माण केली असावी. मंडलाकाराच्या द्विभाजनाने दोन चंद्र मिळतात. त्यांचा कण्ठ्य आणि ओष्ठ्य गणांच्या लेखनासाठी वापर केला गेला. मंडलाच्या त्रिभाजनाने तालव्य-मूर्धन्य-दन्त्य गणांचे तीन चंद्र मिळतात. (आकृती पहा)

२) महाभारतकालीन गणपति – निव्वळ चंद्रांकित गोल अक्षरे संदिग्धता निर्माण होण्यास कारणीभूत होतात, म्हणून प्रत्येक अक्षरात ‘अ’ कार दण्डरूपाने देण्याचे काम- “अकारो मध्यमरूपम् |” या गणपतीने केले.

३) नागवंशी राजा ‘गणेन्द्र नाग’ – याने त्याच्या लिपिशाळेत अक्षरांवर शिरोरेखेचा अलंकार चढविला. (पद्मपुराण शिव-राघव संवादात “सर्वाक्षरे शिरोरेखा अवक्रा, प्रणवंविना” – ॐकार हे प्रणवाक्षर सोडून सर्व अक्षरांवर सरळ शिरोरेखा काढावी – असा उल्लेख आहे) शिरोरेखा हा ध्वन्यात्मक अवयव नाही. देवनगर काशीतून सर्वत्र ही अक्षरशैली पसरल्यामुळे याला ‘देवनागरी’ लिपी म्हणतात.

एक मजेदार उल्लेख येथे करावासा वाटतो. व्यंजनदर्शक अर्धेन्दु हे अकाररूपी दण्डाला कोठेतरी चिकटलेले असतात. याला तीन अक्षरांचा अपवाद आहे. ही तीन अक्षरे म्हणजे गणेशविद्येचा कर्ता गणेश या शब्दातील ग, ण, व श ही अक्षरे.

हे लिपिविज्ञान म्हणजे “सा एषा गणेशविद्या” श्रीगणपत्यथर्वशीर्षांत आहे.

(अधिक माहितीसाठी वाचा – “सा एषा गणेशविद्या” लिपिकार श्री. ल. श्री. वाकणकर)


Bhalchandra Awadhoot Naik

M.E.(Civil), D.B.M.
Retd.Sr.Lecturer, Structural Engineering Department, V.J.T.I. Mumbai.
National Merit Scholar (1965-1971)
Recipient of State Award for Teachers (1995)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*