“संस्कृत शिकताना व शिकवताना” – उज्ज्वला पवार

पं.बिराजदार सर या वयातही संस्कृतच्या कामासाठी, प्रचारासाठी अनेक लोकांच्या भेटी घेऊन संस्कृतभाषा टिकविण्यासाठी प्रयत्न करतात. त्यांचे  संस्कृतवरील प्रभुत्व व प्रेम अत्यंत प्रशंसनीय व अनुकरणीय मला वाटते. मा. वीणाताई, डॉ. कमलताई अभ्यंकर,  पं.बिराजदार सर, श्री. वसंतराव गोडबोले, सौ. लीलाताई गोडबोले या सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्ती सातत्यपूर्ण गेली कित्येक वर्षे “गीर्वाणसुधा” हे त्रैमासिक प्रकाशित करीत आहेत. या सर्वांचे संस्कृतप्रेम विलक्षण आहे. अनेक अडचणींवर मत करीत संस्कृत कार्य पुढे कसे न्यायचे हे मी त्यांच्याकडून शिकत आहे व यथाशक्ति यथामति त्यांना किंचित सहाय्य करीत आहे. त्यांचा मोठेपणा कि त्यांनी मला देववाणीमंदिरम् च्या कार्यकारणीत सामील करून घेतले. बंगलोरमध्ये झालेल्या “संस्कृतपुस्तकमेळाव्याला” मी आणि सुरेखाताई गेलो होतो. तो अनुभव संस्कृतप्रेमींसाठी अत्यंत आशादायी व स्फूर्तिदायक होता. आणि हे सर्व जेंव्हा मी वीणाताईंना अगदी उत्साहात, भरभरून सांगत होते तेंव्हा त्या म्हणाल्या “तुम्ही याचा वृत्तांत गीर्वाणसुधासाठी संस्कृतमधून  लिहा.” मी घाबरून म्हटले “वीणाताई, मी आधी कधी संस्कृतमधून लिहिले नाही.” तेंव्हा त्या म्हणाल्या “तुम्ही नक्की लिहू शकाल. लिहा, काही अडले तर मी आहे.” नंतर खूप विचारात मी घरी आले. आणि सर्व घरची कामे आटपून लिहायला बसले. हातात पेन घेतले आणि काय आश्चर्य ! मला हळूहळू संस्कृतमध्ये वाक्ये सुचायला लागली व दीड दोन तासात माझा पूर्ण लेख लिहून झाला. माझा माझ्यावरच विश्वास बसत नव्ह्ता. मी दुसऱ्या दिवशीच वीणाताईंना लेख नेऊन दिला. त्यांनी वाचल्यावर त्यांना लेख खूप आवडला. कमलताईंनी “गीर्वाणसुधा” मध्ये तो लेख छापला. संस्कृतमधून लेख लिहीणे हि एक नवीन गोष्ट मी शिकले. संस्कृतमधून लेख लिहीण्याचा माझा आत्मविश्वास वाढू लागला. याचे सर्व श्रेय मी वीणाताईंच्या प्रोत्साहनाला देते.

सुरेखाताईंच्या आत्यंतिक आग्रहाखातरच वयाच्या ५९-६० व्या वर्षी मी संस्कृत विषय घेऊन एम.ए. वर्गात प्रवेश घेतला. डॉ. शशी कश्यप व डॉ. जितेंद्र तिवारी यांनी तेथे शिकविले. तेथे वाचनालयात संस्कृतचा अभ्यास करताना संस्कृतची अलिबाबाची गुहाच सापडल्याचा आनंद मला होत असे. मी तेथे बाणभट्टाची कादम्बरी, भामिनीविलास, भवभूतीचे उत्तररामचरितम् कालिदासाचे मेघदूत, कुंमारसंभवम् इ. इ. स्वप्नवासवदत्तम्, उरुभङ्गम् इ. अनेक कवींच्या काव्यकृतींचा सखोल अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. मी सतत संस्कृतभाषेच्या समृद्धीचा, प्राचीन कवींच्या नवनवोन्मेषशालिनी काव्यप्रतिभेचा विचार करीत असे. साहित्यकृतींवरील टीकांमध्ये अगदी बारीकसारीक शब्दांचा, कल्पनांचा विचार केलेला बघून मी आनंदविभोर होत असे. या कलाकृतींचा अभ्यास करून मी चांगल्या नोटस काढल्या होत्या व त्यामुळे एम.ए. ला मी ६० व्या वर्षी सुवर्णपदक मिळवले. तेव्हा सर्व माझ्या शिक्षकांविषयी आणि विशेष करून सुरेखाताईंविषयी माझ्या मनात कृतज्ञता दाटून आली होती व आजही तेच भाव माझ्या मनी असतात. 

संस्कृतभारतीच्या सात दिवसांच्या काणकोण (गोवा) येथील निवासी शिबिरात मी सहभागी झाले होते. तेथे लहान मुलांना संस्कृत कसे शिकवावे याचे अभिनयासहित (बहुतेक डॉ. विश्वास यांच्या पत्नींचे) व्याख्यान ऐकले. श्री. दीपेश कतिरा,श्री. मितेश कतिरा, श्री. नीरज दांडेकर, श्री. चिन्मय आमशेकर, डॉ. विश्वास यांची व्याख्याने मी तेथे ऐकली व मला संस्कृत अध्ययन व अध्यापन याविषयीचा नवीन दृष्टीकोन मिळाला. त्याचा लाभ मला आबालवृद्धांना संस्कृत शिकविताना झाला.

आदरणीय व वंदनीय डॉ. मो. दि. पराडकर सरांचा संस्कृतचा व्यासंग तर मी सतत बघत असे. डॉ. मो. दि. पराडकरांसारखे प्रगाढपंडित सतत पुस्तकांच्या आणि लोकांच्या गराड्यात असत. एवढे विद्वान असूनही त्यांना अजिबात गर्व नव्हता. सुसंस्कृतपणा, मार्दव, प्रसन्नता हा त्यांचा स्थायीभाव होता. अगदी शेवटच्या आजारपणापर्यंत सर रोज अनेक पुस्तकांचे परिशीलन, विविध विषयांवर लेखन, मान्यवरांशी चर्चा, अनेक संस्कृतप्रेमींना-अभ्यासकांना मार्गदर्शन इ. ते कोणताही अभिनिवेश न आणता करत असत. मला ते एकदा म्हणाले होते कि, “मी या जन्मांत भाषांचे अध्ययन व अध्यापन हे काम प्रामाणिकपणे सातत्याने केले.” सरांचे हे वाक्य माझा नेहमी पाठलाग करते. मी नेहमी स्वतःला विचारते कि दररोज मी स्वतःच्या ज्ञानात अल्पशी का होईना भर घालते का ? विद्यार्थ्यांना सहज समजेल अशा पध्द्तीने मी शिकवते का ? मी काही नवनवीन प्रयोग करते का ? विद्यार्थ्यांना शिकविताना मला आनंद उत्साह वाटतो का ? आणि मग मी त्याप्रमाणे वागण्याचा प्रयास करते.

डॉ. निलेश जोशी, श्री. राजेंद्र दातार सर या दोघांचा संस्कृतचा गाढा अभ्यास आहे. संस्कृतचा अभ्यास करताना मला काही शंका वाटली, अडचण आली कि मी अगदी हक्काने त्यांना विचारते व ते सदैव मला लगेच मदत करतात.

डॉ. कमलताई अभ्यंकर, डॉ. उमाताई वैद्य, डॉ. गौरी माहुलीकर, डॉ. परिणीताताई देशपांडे, डॉ. अलकाताई बाक्रे, डॉ. गिरीशजी जानी इ. ची व्याख्याने मी जेंव्हा जेंव्हा ऐकते तेंव्हा मी त्यांच्या ज्ञानाने व वक्तृत्वशैलीने खूप प्रभावीत होते. त्याचबरोबर माझे अज्ञान मला जाणवते. व याचमुळे मी काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करते.

कविकुलगुरू कालिदास पारितोषिक विजेत्या, चार दशके संस्कृत बालवाडी चिकाटीने चालविणाऱ्या डॉ. उज्ज्वलाताई थत्ते मला नेहमी म्हणतात, “तुम्हाला वेळ मिळत नसेल तर मला तुम्ही सांगत जा . मी तुमचे (रफ) टाचण चांगले व्यवस्थित लिहून देईन. त्यामुळे तुमचा वेळा वाचेल व तुमचे अधिक लिखाण होईल.” त्यांच्या मनाचा हा मोठेपणा माझ्या मनाला स्पर्शून जातो.

अशाप्रकारे मी अनेकानेक व्यक्तिंकडून संस्कृत शिकत असताना या सर्वांचा सुसंस्कृतपणा सुद्धा अंगी बाणविण्याचा प्रयत्न करते.  हा माझा शिकण्याचा प्रवास निरंतर सुरुच आहे व सुरुच राहील.

—————-

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*