संस्कृत शिकताना आणि शिकवताना – सौ. श्रावणी मंदार माईणकर

संस्कृतशी पहिला संबंध आला तो अर्थातच माझ्या शाळेत. ठाण्याची सरस्वती सेकंडरी स्कूल, टिळक सरांची शाळा. “आठवीला संस्कृत मिळायलाच हवं नाहीतर ती अतिशय लाजिरवाणी गोष्ट ठरत असे”. शेवटी हवे तेवढे गुण मिळवले आणि संस्कृतही मिळालं, आणि मला संस्कृत मिळाल्याने माझे आईबाबा, शाळेतच शिकत असणारी माझी आते-मामे-चुलत भावंडं यांपैकी कोणाचीच मान लाजेने खाली गेली नाही.  सातवीचा रिझल्ट(रिझल्टच म्हणायचंय…निकाल नाही) लागला रे लागला की ताबडतोब धावत जाऊन संस्कृत क्लासला प्रवेश घ्यावा लागे. शास्त्र असतं ते ! माझ्याही भावंडांनी आधीच माझे नाव सांगून ते पुण्यकर्म करुन ठेवल्याने लगेचच क्लासमध्ये प्रवेशही मिळाला.  तेव्हा काही आधीच फॉर्म/फी वगैरे भरावी लागत नसे. नुसतं आपलं तोंड दाखवून आलं की झालं. ते क्लासही वंशपरंपरागत पद्धतीने ठरलेले असत. त्यामुळे मला संस्कृत मिळण्याच्या आधीच माझा क्लास ठरला होता. ठाण्यातील पद्माताई जोशींचा क्लास.

आणि शाळेबरोबरच इथेही संस्कृत शिकणे सुरु झाले. ह्या बाई मला बघितल्या बघितल्याच खूप आवडल्या होत्या. नऊवारी साडी नेसून बसायच्या. हल्ली शांताबाई शेळक्यांचा फोटो बघितला की मला त्यांची आठवण हटकून येतेच. बाईंचे व्यक्तिमत्त्वही तसेच होते. शांताबाईंसारखे. स्वभावानेही अतिशय प्रेमळ. आवाजाची पट्टीसुद्धा कधी वाढत नसे. आमच्या शाळेच्या मागेच त्यांचा “माऊली” नावाचा बंगला होता. तिथेच ही माऊली राहत असे. विषय नवीन होता पण त्याचा ताण कधी आला नाही. कारण आमच्या या बाई मला माझ्या आजीसारख्या वाटत. त्यांचा विषयाचा व्यासंग खूप मोठा होता, ठाण्यातील एका नामांकित शाळेतून त्या प्रिन्सिपॉल म्हणून रिटायर्ड झाल्या होत्या.

त्यांची शिकवण्याची पद्धत खूप गोड होती. कोणताही धडा घ्यायच्या आधी ती गोष्ट सांगायच्या. मग धडा सुरू करीत. त्यांची एक खासीयत मला अजून आठवतेय. त्या आम्हा मुलांच्या हातातच डिक्शनरी देत. आणि नवीन शब्द आला की आम्हालाच शोधायला लावीत. “मला बारीक अक्षरं दिसत नाहीत रे”…असं म्हणायच्या. मग काय… शब्द शोधण्यासाठी आमच्यात नंबर लागायचे. अपठित गद्य -पद्य असे करायचे असले की निरनिराळी पुस्तकंच हातात द्यायच्या आणि तुम्हाला आवडेल ते लिहा ..असे सांगायच्या. बाईंच्या या कृतीने एकाच्या जागी दहा गोष्टी आपोआपच नजरेखालून जात. दहावीपर्यंत असेच छान हसत खेळत संस्कृतचे शिक्षण झाले, संस्कृतमध्ये भरपूर गुण मिळवून मीही माझे इतिकर्तव्य पार पाडले.

पुढे संस्कृतच घेऊन काहीतरी करण्याची इच्छा होती. कारण “आकड्यांशी वाकडं” असणार्या माझ्यासारखीला तो ओळखीचाच रस्ता सोपा वाटत होता. संस्कृत जमेल असा आत्मविश्वासही होता. पण दैवाला ते मान्य नव्हतंच. मी शेवटी चारचौघींसारखीच वाणिज्य शाखेला गेले. पण त्या अभ्यासाशी सूर जुळलेच नाहीत कधी. शाळेत खूप आवडणारा अभ्यास आता का आवडत नाहीये आपल्याला …असे सारखे मनात येई. शाळेतल्या मराठी कविता,निबंध, सुभाषितं, मराठी-हिंदी-संस्कृत व्याकरणं,लेखन, इतिहास या गोष्टी निघूनच गेल्या एकदम. रस्ता चुकलाच होता. पण तेव्हा मागे फिरण्याची मुभा नव्हती. काहीही करून पदवी गळ्यात पाडून घेणे …हाच पालकांचाही उद्देश असे. पण “पदवीपर्यंत पुरे झालं…आता यापुढे यात काही करायचे नाही” हे मी निक्षून सांगितले. त्या शिक्षणाच्या जोरावर नोकर्या मिळवल्या. Shorthand,typing सारख्या गोष्टी शिकून सेक्रेटरी झाले. चांगल्या कंपनीत चांगल्या पगाराच्या नोकर्याही केल्या. पण काम करताना सतत वाटत राही…ही आपली जागा नाही.

पुढे लग्न झाले. संसार सुरु झाला. गरोदरपणात, होती नव्हती ती नोकरीही सोडावी लागली. पूर्णवेळ गृहिणी झाले. चूल आणि मूल यातच वेळ जात होता. पण तिथेही मन लागत नव्हते. वेळ जाण्यासाठी आणि एका मैत्रिणीच्या मुलीला गरज होती म्हणून दुपारच्या वेळात संस्कृत शिकवायचे. तेव्हा लक्षात आलं ..अरे आवडतंय की हे आपल्याला आणि जमतंयही छान.. मग संस्कृतचे क्लासेस घ्यावे असा एक विचार झाला. पण हातात योग्य ते शिक्षण असल्याशिवाय कोणाच्या भविष्याशी खेळायचे नाही यावर मी ठाम होते. मग नवरा म्हणाला-“असे वाटत असेल  तर शीक ना तुला काय हवे ते…”हा विचार तर मला झेपलाच नाही . हातात दीड-दोन वर्षांचे मूल आहे…संस्कृतची कसलीही पार्श्वभूमी नाही मग कोण देणार मला प्रवेश आणि तोही कुठे…असे नानाविध प्रश्न मनात होते.  खूप ठिकाणी चौकशी करत होतो पण काहीच झाले नाही. माझी वाणिज्य शाखेची पदवी सतत आड येत होती. मग एक दोन वर्षांनी मुंबई विद्यापीठाच्या संस्कृत कोर्सेसविषयी जाहिरात वाचली. ताबडतोब गेले आणि प्रवेश घेऊनच आले. आणि त्याच शनिवारपासून संस्कृतच्या शिक्षणाला पुन्हा एकदा सुरुवात झाली.

त्या काळात शनिवारच्या त्या लेक्चर्सची मी खूप आतुरतेने वाट बघत असे. “संस्कृत भवनच्या” त्या इमारतीत शिरलं रे शिरलं की माझं जगच बदलून जात असे. संस्कृत शिकणं मला खूप ताजंतवानं करीत होतं. एक छान होतं…. इथे अपयशाची भीती नव्हती की यश मिळवण्याची जबरदस्ती नव्हती. मला नाही जमलं तर हसणारं कोणीच नव्हतं. आणि म्हणूनच या सहजतेमुळेच ते  छान जमू लागलं. तो काळ मी अक्षरश: “आजचा दिवस माझा” हे लक्षात ठेऊनच जगले. हा शनिवार पदरात पडलाय तो घ्यायचा..पुढच्या शनिवारचं माहिती नाही…कारण … “मुलाला टाकून एवढं करण्याची काही गरज आहे का ?? ” असे आवाज कानावार कुठून कुठून सतत येत राहायाचे.पण मग मीसुद्धा ठाम राहिले. मुलाला अगदी टाकून नाही पण काही काळ बाजूला सारून हे करणं आवश्यक आहे असे माझ्या मनाला समजावले. आणि अक्षरश: संस्कृत भवनातला त्या तीन वर्षांमधला एक एक शनिवार गोळा करुन माझ्या झोळीत टाकत सुटले. तीन वर्ष पूर्ण केल्यानंतर आता finally मी M.A. (संस्कृत) करण्यासाठी  लायक ठरले होते. खरं सांगते, तो दिवस अगदी मी संस्कृत M.A. पूर्ण केले त्या दिवसापेक्षाही जास्त आनंद देणारा होता. ठरवल्याप्रमाणे M.A. पूर्ण करुन झाले. आणि I am actually misplaced ही मनातली सल हळूहळू दूर होऊ लागली.

M.A. पूर्ण होऊनही आता 3 वर्षे होत आली आहेत. हातात प्रशस्तिपत्रकही पडले नसताना डॉ.आसावरी बापट मॅडमनी त्यांच्या संस्थेत संस्कृत शिकवण्याची संधी दिली. या गोष्टीने खूप आत्मविश्वास दिला. शिकवण्यामुळे संस्कृतचा अभ्यासही चालू राहिला. ज्या शिक्षकांनी मला विद्यापीठात संस्कृतचे धडे दिले असे डॉ. आसावरी भट, स्वत: बापट मॅडम श्री.अजय पेंडसे , यांच्याबरोबरीने शिकवायला उभं राहताना सुरुवातीला खरंच दडपण आलं पण ते काही फार काळ टिकलं नाही. उलट , काही अडलं तर हक्काने विचारता येईल अशी माझी माणसं मिळाली. आमच्या ज्ञानप्रभा परिवाराची मी एक सदस्य कधी बनले ,कळलंच नाही.

संस्कृत शिकायला सुरुवात केली त्या वर्षापासून  घरी संस्कृतचे वर्ग घ्यायला सुरुवात केली. स्वत:च्या कष्टाचा पैसा माणसाला एक वेगळाच आत्मविश्वास देऊन जातो. खूप वर्षांनी तो परत मिळवला. आता साठ्ये महाविद्यालयात संस्कृत शिकवण्याची संधी मिळाली आहे. तरुणाई बरोबरचा तो वेळ मला खूप ताजंतवानं करुन जातो. त्यांच्याबरोबर वावरताना  तुम्हालाही तुमचं ज्ञान अद्ययावत ठेवावं लागतं. ते करता येतंय. काही समवयस्क सहकारी मिळालेत. डॉ. अतुल ठाकूरांसारख्या सुह्रदाने वृत्तवल्लरीला माझ्यावर सोपवलंय. ते काम खुणावतंय. कुठलाही Form भरताना आता Educational Qualification या मथळ्याखाली टेचात M.A. Sanskrit असं लिहिता येतंय..( जी माझी  खूप आधीपासूनचीच सुप्त इच्छा होती.), मी काय शिकलेय आणि आता मी काय करते हे कोणी विचारल्यावर आता सांगण्यासारखं माझ्याकडे खूप काही असतं, संस्कृतचा महिमाच असा आहे की संस्कृत  हा शब्द ऐकताच समोरच्याच्या नजरेत एक कौतुकाची रेघ उमटते,  आता ती मला दिसते आणि खूप काही देऊन जाते, मी संस्कृत शिकते म्हटल्यावर माझ्या नवर्याच्या कंपनीतील एक वरिष्ठ अधिकारी,फार मोठ्या पदावरची, संस्कृतचा गाढा अभ्यास असणारी व्यक्ती माझ्याशी बोलण्यात रस दाखवते, मला मानसन्मान देते, संस्कृतशी संबंधित चर्चा करते, आणि अतिशय कडक सोवळ्याच्या देवघरात मला प्रवेश देते…माझा अडनिड्या वयातला मुलगा त्याच्या मित्रांना, शिक्षकांना माझी आई संस्कृत शिकवते असं अभिमानाने सांगतो….

संस्कृत- शिकताना आणि शिकवताना मला हे सारं मिळालंय.आज वयाच्या चाळीशीत का होईना आपण आता योग्य जागी आहोत हे आभाळाएवढं समाधान दिलंय…यश , पैसा , यांचे हिशेब मला आत्ता करायचेच नाहीत..माझं आवडतं काम करण्याची संधी नशिबाने मला आणून दिली आहे आणि मी आता फक्त त्या संधीचा पुरेपूर उपभोग घेण्याचे ठरवले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*